डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीतून बाद, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 08:55 AM2023-08-29T08:55:59+5:302023-08-29T08:56:31+5:30

ट्रम्प यांच्याविरुद्धच्या खटल्यांचे काहीही होवो, त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी स्वीकारणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे!

Donald Trump out of the election, because.. | डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीतून बाद, कारण..

डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीतून बाद, कारण..

googlenewsNext

- वप्पाला बालचंद्रन
राष्ट्रीय सुरक्षा विशेषज्ञ

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीचे प्रायमरी डिबेट विस्कॉन्सिन मिलवॉकी येथे २३ ऑगस्टला झाले. अमेरिकन घटनेच्या कलम दोन (१) मध्ये अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेचा तपशील दिला आहे; परंतु नाम निर्देशन कसे केले जाईल याचा त्यात उल्लेख नाही. अध्यक्षपदाचा उमेदवार तळागाळातल्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचार करील, अशी एक प्रथा १९१२ सालापासून पडलेली आहे. पक्ष प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवणे हा त्यामागचा हेतू असतो. अंतिम उमेदवार निवडताना राष्ट्रीय परिषदेमध्ये हे प्रतिनिधी मतदान करतात. रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रीय परिषद १५ जुलै २०२४ रोजी होत आहे.

२३ ऑगस्टला झालेल्या वादविवादात आठ संभाव्य उमेदवारांनी भाग घेतला. त्यात दोन भारतीय वंशाचे होते. पहिल्या निक्की हेली (रंधावा) या दोन वेळा साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर होत्या. त्यानंतर संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केले. 
दुसरे होते विवेक रामस्वामी. स्थलांतरित कुटुंबात ते जन्माला आले असून मूळचे केरळमधले आहेत. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात उपाध्यक्ष असलेले माइक पेन्स हेही या डिबेटमध्ये सामील झाले होते.

अध्यक्ष जो बायडेन यांनी २०२४ मध्ये पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली असली तरी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राइमरी डिबेट्समध्ये ते भाग घेणार नाहीत. हे प्रथेनुसारच होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा निवडणूक लढवली तेंव्हा २०२० मध्ये रिपब्लिकन पक्षाने प्राइमरी डिबेट घेतले नव्हते. जेराल्ड फोर्ड यांच्यापासून ही प्रथा चालत आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष प्राइमरी डिबेटमध्ये सहभागी होत नाहीत. बराक ओबामा यांच्या बाबतीतही ती प्रथा पाळली गेली. डेमोक्रॅटिक राष्ट्रीय परिषदेत पक्षाचा उमेदवार ठरवला जाणार असला तरी त्या बैठकीची तारीख अजून ठरलेली नाही.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे पोलिस दप्तरी गुन्हेगार ठरलेले अमेरिकेचे पहिले अध्यक्ष ठरले. २४ ऑगस्ट रोजी त्यांना जॉर्जियातील फुलटर्न परगण्यातील कारागृहात पाठवण्यात आले. रॅकेटीयर इन्फ्लुअन्स्ड अँड करप्ट ऑर्गनायझेशन ॲक्ट तथा रिको या कायद्याखाली त्यांच्यावर १३ गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले. जॉर्जियातील अध्यक्षीय निवडणूक प्रक्रियेत २०२० साली हेराफेरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय तीन गुन्हेगारी स्वरूपाचे खटले त्यांच्यावर भरण्यात आलेले आहेत. त्यात ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेच्या संसदेवर झालेला हल्ला; तसेच फ्लोरिडामधील आपल्या खासगी निवासस्थानी गुप्त कागदपत्रे अनधिकृतरीत्या ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शिवाय मॅनहटनमधील संशयास्पद आर्थिक व्यवहाराचेही प्रकरण ट्रम्प यांच्याविरुद्ध दाखल असून काही मुलकी स्वरूपाची प्रकरणेही आहेत.

ट्रम्प निवडणूक लढवू शकतील काय? - २३ ऑगस्टला ‘द न्यूयॉर्कर’ने एक लेख प्रसिद्ध केला आहे. विल्यम बावडे आणि माइकल स्टोक्स पॉलसन या कायद्याच्या प्राध्यापकांनी तो लिहिला असून अमेरिकन घटनेच्या १४ व्या दुरुस्तीच्या तिसऱ्या कलमानुसार ट्रम्प हे निवडणूक लढविण्यास अपात्र आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या घटनेशी बांधील राहण्याची शपथ ज्याने आधी घेतलेली आहे त्याने बंड किंवा उठाव केला तर त्याला कोणत्याही पदावर राहता येणार नाही, असे ही दुरुस्ती सुचवते.

ही दुरुस्ती रद्दबातल करणे काँग्रेसला २/३ बहुमतानेच शक्य होणार आहे. ‘द अटलांटिक’मध्येही असेच मत प्रदर्शित करण्यात आले आहे. कायद्याचे प्राध्यापक लॉरेंस ट्राइब आणि अमेरिकेतील अपिलीय न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकेल ल्यूटिन यांनी हे मत व्यक्त केले आहे. २०२० सालची अध्यक्षीय निवडणूक उधळण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केलेला असल्यामुळे त्यांना उमेदवारीची अनुमती मिळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. माजी उपाध्यक्ष पेन्स यांनी सिनेटमध्ये निवडणूक निकाल अंतिमतः प्रमाणित करू नयेत यासाठी ट्रम्प यांनी त्यांच्यावर दडपण आणले असता त्यांनी न्यायमूर्ती ल्यूटिन यांचा सल्ला मागितला होता, असे म्हटले जाते. 

त्यांच्या मते, १४ व्या घटनादुरुस्तीचे तिसरे कलम ‘स्वयं अंमलबजावणी’स पुरेसे आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्यात दोषी ठरणे किंवा दुसरी कुठलीही न्यायालयीन कारवाई होण्याची त्यासाठी गरज नाही.ट्रम्प यांच्याविरुद्ध भरल्या गेलेल्या खटल्यांचे काहीही होवो, ते उमेदवारी अर्ज भरायला जातील तेव्हा निवडणूक अधिकारी तो अर्ज स्वीकारणार नाहीत, असाच या सगळ्याचा अर्थ निघतो.
 

Web Title: Donald Trump out of the election, because..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.