ट्रम्प यांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 03:10 AM2020-02-08T03:10:07+5:302020-02-08T03:16:06+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगातून सुटका झाल्याने या वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते पुन्हा उभे राहणार, हे नक्की आहे.

Donald Trump was Release | ट्रम्प यांची सुटका

ट्रम्प यांची सुटका

googlenewsNext

डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगातून सुटका झाल्याने या वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते पुन्हा उभे राहणार, हे नक्की आहे. त्यांच्यावरील महाभियोग फेटाळला गेल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्यावर कसा अन्याय करण्यात आला, कशा नरकयातनांना आपणास सामोरे जावे लागले, असे एक भाषण केले. तसेच विरोधकांवर जोरदार टीकाही केली. ट्रम्प यांच्यावरील महाभियोग हा एक खटलाच होता. सभागृहाचा केलेला दुरुपयोग तसेच आपले विरोधक व डेमॉक्रेटिक पक्षाचे नेते जो बिडन यांची बदनामी करण्यासाठी युक्रेनवर आणलेले दडपण आणि त्यासाठी युक्रेनला केलेले अर्थसाह्य हे आरोप ठेवण्यात आले होते. सिनेटच्या सदस्यांनी दोन्ही आरोप मतदानाद्वारे फेटाळून लावले.

अमेरिकेत महाभियोगाचा निकाल आरोप खरे आहे की खोटे आहे, यापेक्षा मतदानाद्वारे होतो. मतदान करण्याचा अधिकार सिनेटमधील सदस्यांना आणि तिथे ट्रम्प यांच्या पक्षाचे बहुमत, यांमुळे महाभियोग फेटाळला जाणार, हे निश्चितच होते. अगदी आरोपांत तथ्य आहे, असे आढळून आले असते तरीही ट्रम्प यांना धोका नव्हता. मात्र ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचेच काही सदस्य महाभियोगाच्या बाजूने मतदान करतील, अशी डेमॉक्रेट्सची अपेक्षा होती. मात्र सत्ताधारी पक्षाच्या केवळ एका सदस्याने महाभियोगाच्या बाजूने म्हणजेच ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केले.

महाभियोग टळल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय वाटचालीला धक्का बसलेला नाही. अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिवमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधातील डेमॉक्रेटिक पक्षाचे बहुमत असल्याने तिथे ट्रम्पवर महाभियोगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष महाभियोगाची कारवाई मात्र ट्रम्प यांच्या पक्षाचे बहुमत असलेल्या सिनेटमध्ये झाली. शिवाय महाभियोगाच्या बाजूने दोन तृतीयांश म्हणजेच ६७ जणांनी मतदान केले असते, तर ट्रम्प यांना जावे लागले असते.

प्रत्यक्षात त्यांच्याविरोधात केवळ ४७/४८ मतेच पडली. मुळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प निवडून आले, तेव्हाच त्यांनी विरोधकांची सोशल मीडियाद्वारे बदनामी करण्यासाठी अन्य देशांची मदत घेतली, तेव्हाच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात काही देशांनी अमेरिकेत मोहीम चालविली, असे आरोप झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचा इन्कार केला. पण हडेलहप्पीपणा व मगरुरीची भाषा यांमुळे हळूहळू त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण होत गेले. कधी इराणला, उत्तर कोरियाला दम दे, कधी निर्बंध घालण्याची भाषा कर, अमक्याशी व्यापार बंद कर, भारतीयांचे व्हिसा कमी कर, अशा प्रकारांमुळे तसे वातावरण निर्माण झाले, ही वस्तुस्थिती आहे. तरीही हे वातावरण या वर्षीच्या अखेरीस राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपर्यंत टिकेल का, हे सांगणे अवघड आहे.

अमेरिकन राष्ट्रवाद, अमेरिका फर्स्ट अशा घोषणांनी ते सातत्याने मतदारांना भुलवतात, अशी टीका त्यांच्यावर सतत होत असते. भारतीय व एकूणच परदेशी लोकांमुळे अमेरिकन तरुणांना आपल्याच देशात नोकºया मिळत नाहीत, अशी स्थानिक वा तेथील भूमिपुत्रांना आवडणारी भाषा ते करतात. पण तसे तंत्रज्ञ, विद्वत्ता असलेले लोक तिथे नसल्याने आणि स्थानिकांना बेकारभत्ता म्हणून हमखास पैसे मिळत असल्याने ते रोजगारासाठी झगडत नाहीत, हे वास्तव आहे. दुसरे म्हणजे सोशल मीडियावर हल्ली लोक फारच विश्वास ठेवू लागले आहेत. त्याचा भरपूर उपयोग ट्रम्प यांनी निवडणुकीत केला.

आपल्याकडेही व्हॉट्सअ‍ॅप आणि तसल्या काही अ‍ॅपवरून अन्य व्यक्ती, संस्था व पक्ष यांच्या बदनामीच्या मोहिमा आखल्या जात असल्याचे सर्वांनी अनुभवले आहे. त्यावर आलेले मेसेज खरे की खोटे हे न पाहता लोक विश्वास ठेवतात आणि ते संदेश दुसऱ्यांना पाठवतात, हे सार्वत्रिक चित्र आहे. अमेरिकेतील जनताही भारतीयांपेक्षा काही वेगळी नाही, हे चार वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिसून आले होते. पण महाभियोगातून सुटका झालेल्या आणि तरीही वादात सापडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना तेथील जनता पुन्हा विजयी करणार का, हे पाहायचे.

बिल क्लिंटन आणि रिचर्ड निक्सन या राष्ट्राध्यक्षांनाही यापूर्वी महाभियोगाला सामोरे जावे लागले होते. ते दोन्ही फेटाळले गेले. पण त्यांनी त्यानंतर निवडणुकीला उभे राहण्याचे टाळले. ट्रम्प मात्र पुन्हा निवडणूक लढवणार असून, तेव्हा त्यांची लोकप्रियता किती आहे, हे कळेल.


 

Web Title: Donald Trump was Release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.