...संयम सुटू देऊ नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:21 AM2020-06-10T11:21:43+5:302020-06-10T11:22:08+5:30
मिलिंद कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढताना प्राण तर वाचवायचेच आहे, पण त्यासोबतच अर्थचक्र पुन्हा सुरु करायचे आहे, ...
मिलिंद कुलकर्णी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढताना प्राण तर वाचवायचेच आहे, पण त्यासोबतच अर्थचक्र पुन्हा सुरु करायचे आहे, या अर्थाने ‘जान भी, जहॉं भी’ असे आवाहन देशवासीयांना केले. पण ही घोषणा कृतीत उतरवताना सामान्य माणूस ते प्रशासन अशा सगळ्यांचीच तारेवरची कसरत सुरु आहे.
लॉकडाऊनच्या चार पर्वातील ६९ दिवस आणि आता अनलॉक किंवा पुनश्च हरिओमचे १० दिवस म्हणजे संभ्रम आणि गोंधळाचे आहेत. खान्देशचा विचार केला तरी जळगाव आणि धुळे ही दोन्ही शहरे रेडझोनमध्ये मोडली जातात. त्यामुळे अनलॉकचा फायदा या शहरांना फारसा नाहीच. पुन्हा त्यात कंटनमेंट झोनमध्ये अनेक गोष्टींना प्रतिबंध आहे. व्यापारी संकुलामधील दुकानांना परवानगी नाही, मात्र एकल दुकाने सुरु आहेत. केंद्र सरकारने शॉपिंग मॉलला परवानगी दिली, तर राज्य सरकारने दिलेली नाही. केंद्र सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली, पण महाराष्टÑात बंदी कायम आहे. कुठे दारु दुकानांना परवानगी आहे, तर कुठे नाही. केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे सामान्य नागरिक आणि व्यापारी-व्यावसायिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
घरात कोंडून , व्यवसाय बंद राहून ८० दिवस लोटले. आता संयमाची परीक्षा अधिक पाहू नये, अशी भावना व्यक्त होत आहे. नाभिक समाजबांधवांनी तर आंदोलनाचे हत्यार उपसले. जमावबंदी आदेश मोडला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पण, तरीही ते मागे हटले नाही. कुंभार समाजाच्या मंडळींनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. वाजंत्रीवादक, टेन्टचालक या सगळ्यांची उपासमार सुरु आहे. ‘जान भी, जहाँ भी’ म्हणत असताना या मंडळींचा विचार करायला हवी, अशी अपेक्षा रास्त म्हणायला हवी. त्यांच्यासारखे अनेक छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिकांची हीच अवस्था आहे. आता कोरोनाला सोबत घेऊन जगायला शिका, असे सगळे आवाहन करीत असताना बंदीचा आग्रह कशासाठी?
प्रशासनदेखील हतबल आहे. अनलॉक करताच रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मृत्यूदरामध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तिन्ही जिल्हे राज्यात सर्वोच्च स्थानी आहेत. देशाचा मृत्यूदर २.८ टक्के तर राज्याचा मृत्यूदर ३.५ आहे. जळगावचा १०.४, नंदुरबार : १०, तर धुळे ९ टक्के आहे. महाराष्टÑातील ३६ पैकी १३ जिल्ह्यातील मृत्यूदर राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. स्वाभाविकपणे या तिन्ही जिल्ह्यात अनलॉक करताना प्रशासनाला वाढती रुग्ण संख्या आणि वाढता मृत्यूदराची चिंता करीत निर्णय घ्यावे लागणार आहे.
कोरोनापूर्व आणि कोरोनापश्चात हा जो मुलभूत बदल होणे अपेक्षित होते, त्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पूर्वीसारखे जसेच्या तसे आता काहीच नसेल, हे आम्ही स्विकारायला हवे. कोरोनापासून बचावासाठी नागरिक, व्यापारी यांनी पुरेशी काळजी घेऊन अर्थचक्राला गती द्यायला हवी. भावनिक न होता परिस्थितीचे भान ओळखून आम्ही मरण व तोरणदारी जाण्यासाठी पथ्य पाळायला हवे. कोरोनाचा मुकाबला आणि संसर्ग झाला, तर उपचारासाठी पुरेशी यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे. ८० दिवस घरात कोंडून ठेवल्याने वेगळ्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत, बचावाची संधी देऊन लोकांना जगू द्या. उठसूठ लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूला आळा घाला. रुग्ण वाढणार आहेत, अशी तयारी ठेवून आता कामाला लागायला हवे, मात्र तेदेखील पुरेशी खबरदारी घेऊन, हे पक्के लक्षात ठेवायला हवे.
अन्यथा, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रशासन आणि जनतेवर पुरता विश्वास ठेवून धोरणे ठरवतील आणि आम्ही बेपर्वाईने वागून परिस्थिती गंभीर करीत असू तर ‘लॉकडाऊन’ पुन्हा आपल्या माथी राहील, हे लक्षात घ्यायला हवे. पूर्वीसारखे दिवस पुन्हा कधी येतील, हे सांगता येत नाही. पण ते यावयाचे असतील, तर आम्ही सार्वजनिक शिस्त आणि नियम पाळू, असा निर्धार करायची आवश्यकता आहे. प्रशासन आणि जनतेने हातात हात घेऊन, सहकार्य व सामंजस्याची भावना मनी ठेवून पुढे चालत राहीले तर निश्चित या कठीण काळातून सगळे सुखरुप बाहेर पडतील. एकमेकांवर दोषारोप करुन हाती काही येणार नाही, हे लवकर आमच्या ध्यानात आले म्हणजे मिळवले.