बुरा न मानो... होली है !
By सचिन जवळकोटे | Published: March 9, 2020 06:55 AM2020-03-09T06:55:59+5:302020-03-09T06:58:03+5:30
लगाव बत्ती...
- सचिन जवळकोटे
सोलापूरच्याराजकारणाला ‘शिमगा’ तसा नवा नाही. इथं नेहमीच पेटते आरोप-प्रत्यारोपांची ‘होळी’. टीकेची ‘धुळवड’ खेळण्यासाठी सारेच कसे असतात आसुसलेले. मग याच ‘होळी’दिनी पांढ-या खादीला ‘रंगीत बत्ती’ लावण्याची संधी आम्ही पामर तर थोडीच सोडणार आहोत ?.. मग चला तर... एक काल्पनिक स्टोरी समजून घ्यायला... बुरा न मानो होली है !
स्थळ : सात रस्त्यावरचा बंगला. भोवताली पोलिसांच्या गाड्या. अजूनही भूतकाळात रमलेल्या मंडळींना कदाचित हा ‘इंडी’च्या ‘पाटलां’चा बंगला वाटेल; मात्र हा आहे वर्तमानकाळातल्या विद्यमान आमदारांचा. अर्थात ‘तार्इं’चा. खरंतर, या बंगल्यातल्या कर्त्या पुरूषाला पोलिसांच्या वर्दळीची सवय कित्येक दशकांपासून. कधी-काळी इथल्या ‘लाल बत्ती’चा आदर करण्यासाठी ताटकळत थांबणारी हीच खाकी ‘बनसोडे वकिलां’च्या खासदारकीनंतर पांगलेली; मात्र आता पुन्हा ‘तार्इं’च्या ‘वाक्चातुर्य’ कर्तुत्वापायी ही ‘खाकी’ पुन्हा इथं घुटमळू लागलेली. ‘ताई’ नेहमीप्रमाणं पुन्हा काही फाडकऽऽन बोलतील अन् सोलापुरात परत वातावरण तंग होईल, याची शाश्वती नसल्यानंच पोलिसांनी म्हणे या परिसरात कायमस्वरुपी तंबू ठोकण्याचा निर्णय घेतलेला. ज्यांनी आयुष्यभर एकेक शब्द तोलून-मापून उच्चारण्याची खुबी अवलंबिलेली; त्याच ‘सुशीलकुमारां’च्या ‘सुपुत्री’ अधूनमधून वादग्रस्त ‘शब्दास्त्र’ फेकण्यासाठी मशहूर ठरलेल्या. ‘बनसोडें’च्या वेळी खुद्द ‘पप्पां’नी पुण्यात सारवासारव करून विषय मिटविलेला. आता ‘बाळासाहेबां’च्या वेळी कसब्यातल्या ‘वालें’नी पत्रक-बित्रक काढून ‘तार्इंना तसं म्हणायचं नव्हतं’ची मखलाशी केलेली. आता ‘पुढच्या वेळी खुलासा करण्याची वेळ आपल्यावर येतीय की काय ?’ या विचारांनी म्हणे ‘चेतनभाऊ’ आत्तापासूनच टेन्शनमध्ये आलेले. असो. बंगल्याबाहेर ‘खाकी’ची गर्दी पाहून होळीचा रंग लावायला कुणी फिरकलाच नाही तर ? ताईऽऽ हॅप्पी होलीऽऽ
स्थळ : ‘काळजापूर मारुती’जवळच्या देशमुखांचा बंगला. ‘पालकत्व’ गेल्यापासून गर्दी तशी कमी झालेली; नाही म्हणायला मार्केट कमिटीच्या कर्मचाºयांचे हेलपाटे वाढलेले. हजर नसलेल्या मिटींगची उपस्थिती दाखविण्यासाठी लागणारी सही असो की सेस न भरताच गुपचूपपणे लाखो रुपयांचा माल विकणा-या कैक व्यापा-यांची लिस्ट असो. ही सारी कामं म्हणे बंगल्यातूनच चालतात. नाही म्हणायला चेकवरच्या सह्यांची जबाबदारी आमदारांनी पद्धतशीरपणे ‘नरोळें’वर टाकलेली. म्हणजे भविष्यात चुकून-माकून लोच्या झालाच तर ‘श्रीशैलअण्णा.. होगरी निवेऽऽ’ (म्हणजे तुम्हीच आत जा.. तुम्हीच निस्तरा).. मात्र भविष्यातील ‘लोच्या’ आत्ताच होण्याची चिन्हं दिसू लागलीत. या सभापती आमदारांच्या विरोधात पुराव्याची लाकडं गोळा करण्याची तयारी ‘हसापुरें’नी सुरू केलीय. सोबतीला आतून गुपचूपपणे ‘बंडगर’ असतीलच म्हणा. आता ‘बत्ती’ लावली की मार्केट कमिटीतल्या कारभाराची ‘होळी’ पेटलीच समजा. मार्केट कमिटीचं उत्पन्न बुडवून बोगस पावतीतून करोडो रुपयांचा माल उचलणा-या व्यापाºयांकडून मिळणारी ‘दलाली’ असो की बाहेरच्या गाळ्यांमध्येही मारलेला ‘गाळा’ असो...‘शिमगा’ करायला ‘हसापुरे’ आसुसलेत. बघू या... आता किती जाळ उडतो... तोपर्यंत देशमुखांना हॅपीऽऽ होलीऽऽ.
स्थळ : पंढरपुरातील ‘भालकेनानां’चा बंगला. आजकाल इथं कार्यकर्त्यांपेक्षा गारमेंट कंपन्यांच्या कर्मचाºयांचीच गर्दी वाढलेली. कुणी नव्या पॅन्टींचं डिझाईन दाखवायला आलेलं तर कुणी शर्टाचं माप बघायला जमलेलं. तिकडं ‘विठ्ठल’चं जुनं बिल मिळेल की नाही, याची शेतक-यांना गॅरंटी नसली तरी ‘इथं मात्र ‘नानां’कडून दोन-तीन डझन नक्कीच नव्या ड्रेसची आॅर्डर मिळेल, अशी खात्री या मार्केटिंगवाल्यांना वाटू लागलेली. मात्र या साºयांना ‘नानां’नी सवयीप्रमाणं बाहेरच घुटमळत ठेवलेलं. आता ‘नानां’ची ही खुबी केवळ ‘सुळें’च्या ‘संतोष’लाच माहीत. समोरचा माणूस आपल्या फायद्याचा नसेल तर त्याला ताटकळत ठेवणारे ‘नाना’ त्याचा फोनदेखील घेणार नाहीत; मात्र गरज पडली तर त्यालाच पंधरा-वीस कॉल करायलाही मागं-पुढं पाहणार नाहीत. वाटल्यास कधीतरी बार्शीच्या ‘राजाभाऊं’ना विचारा. असो. ‘विठ्ठल’च्या मालमत्तेच्या लिलाव होईल तेव्हा होईल...तोपर्यंत ‘नानां’ना हॅपीऽऽ होलीऽऽ
या दोन्ही आमदारांना रंग
लावण्यापूर्वी पाटलांना विचारा !
होळीचा रंग लावण्यासाठी ‘मोहोळ’ अन् ‘माळशिरस’चे कार्यकर्ते त्यांच्या आमदारांना शोधताहेत. त्यांना फोन लावला तर तिकडून मोबाईलवरून म्हणे सांगितलं जातं, ‘आप अगर एमएलए से बात करना चाहते हैं तो पहले पाटीलजी से परमिशन लें !’.. आता हे ‘पाटील’ कोण, हे ‘अनगर’ अन् ‘अकलूज’मधल्या कट्टर कार्यकर्त्यांना माहीत असलं तरी बाकीची नवखी मंडळी गोंधळात पडलीय, त्याचं काय ?
तरीही दोन-तीन मतदारांनी त्यांना त्यांच्या गावी गाठलंच. ‘आम्ही तुमच्या मतदारसंघातून आलोत !’ असं कौतुकानं सांगताच या दोन्ही आमदारांनी अत्यंत विनयानं, विनम्रतेनं अन् आदरानं सांगितलं की, ‘तुम्हाला विकासकामाचं कुठलं पत्र-बित्र पाहिजे असेल तर तिकडं आमच्या साहेबांकडेच जा. बंगल्यावरच लेटरपॅड ठेवलंय,’.. तेव्हा दचकलेले मतदार हळूच त्यांच्या कानात कळवळून म्हणाले, ‘आम्ही तुम्हाला पत्र मागायला नाही.. केवळ होळीचा रंग लावायला आलोय हो ऽऽ...’
...आतातरी हे दोघे उत्साहानं ‘हो’ म्हणतील, असं समोरच्यांना क्षणभर वाटलं; पण हाय... ‘थांबाऽऽ थांबाऽऽ कोणता रंग लावून घ्यायचा, हे पाटीलसाहेबांनाच विचारून येतो,’ असं त्यांनी घाईघाईनं सांगताच बिच्चारे मतदार केविलवाण्या चेहºयानं बाहेर पडले. ‘आपण नेमकं कुणाला निवडून दिलंय ?’ असा प्रश्नही त्यांच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. चला.. दोन्हीही आमदारांसाठी सॉरी पाटलांसाठी हॅपीऽऽ होली.. लगाव बत्ती !
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)