अवास्तव अपेक्षांचे ओझे नको!

By रवी टाले | Published: February 19, 2020 07:03 PM2020-02-19T19:03:16+5:302020-02-19T19:06:55+5:30

एखादा क्रीडापटू विशेष कौशल्याचे प्रदर्शन करतो तेव्हा त्याला प्रोत्साहन दिलेच पाहिजे; मात्र ते करताना आपल्या अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली तो पिचणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे!

Don't overload expectations! | अवास्तव अपेक्षांचे ओझे नको!

अवास्तव अपेक्षांचे ओझे नको!

Next
ठळक मुद्देकम्बाला शर्यतीत श्रीनिवास गौडा नावाच्या युवकाने १४२.५ मीटरचे अंतर अवघ्या १३.६२ सेकंदात पूर्ण केलेनिशांत शेट्टी या अन्य एका कम्बाला धावपटूने श्रीनिवासपेक्षाही चार सेकंद कमी वेळ घेत, अवघ्या ९.५१ सेकंदातच १०० मीटर धावण्याचा महापराक्रम केला!भले भले वाहवत गेले असले तरी श्रीनिवास गौडाचे पाय मात्र जमिनीवरच आहेत.

जगातील सर्वात वेगवान मानव म्हणून ओळखला जात असलेल्या उसेन बोल्टने विश्वविक्रम केल्यानंतर त्याचे नाव भारतात जेवढे चर्चिले गेले नसेल, तेवढे ते गत दोन दिवसांपासून चर्चेत आहे. त्यासाठी कारणीभूत ठरली आहे, कम्बाला या नावाने ओळखली जात असलेली कर्नाटकातील रेड्यांची शर्यत! ही शर्यत म्हणजे महाराष्ट्रातील शंकरपटाचा कानडी अवतार म्हणता येईल. शंकरपटात बैल धावतात, तर कम्बालात रेडे! शंकरपटात बैलांना हाकणारा गडी गाडीवर स्वार झालेला असतो, तर कम्बालात तो रेड्यांचे कासरे हातात धरून चक्क त्यांच्या मागून धावत असतो.
अशाच एका कम्बाला शर्यतीत श्रीनिवास गौडा नावाच्या युवकाने १४२.५ मीटरचे अंतर अवघ्या १३.६२ सेकंदात पूर्ण केले. म्हणजेच त्याने १०० मीटरचे अंतर केवळ ९.५५ सेकंदात पूर्ण केले. उसेन बोल्टचा १०० मीटर शर्यतीतील विश्वविक्रम ९.५८ सेकंदांचा आहे. त्यामुळे श्रीनिवास गौडाचे सध्या तुफान कौतुक सुरू आहे. जणू काही १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील आगामी आॅलिम्पिक सुवर्ण पदक आता भारताचेच, अशा तºहेचा गदारोळ समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमांमधून सुरू आहे. श्रीनिवास गौडाने पराक्रम केल्याच्या दुसऱ्याच दिवशी, निशांत शेट्टी या अन्य एका कम्बाला धावपटूने श्रीनिवासपेक्षाही चार सेकंद कमी वेळ घेत, अवघ्या ९.५१ सेकंदातच १०० मीटर धावण्याचा महापराक्रम केला!
श्रीनिवास गौडाने नोंदविलेल्या वेळेची दखल शशी थरूर, आनंद महिंद्रा यासारख्या बड्या व्यक्तींनी घेतल्यानंतर सर्वसामान्यांनी त्याला डोक्यावर घेतले नसते तरच नवल! मग केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजुजू यांनीही श्रीनिवासची भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच ‘साई’च्या प्रशिक्षण केंद्रात चाचणी घेण्याची घोषणा करून टाकली. त्यासाठी श्रीनिवासला रेल्वेची तिकिटेही पाठविण्यात आली. तिकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनीही श्रीनिवासला तीन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून त्याचा गौरव केला. श्रीनिवासचे दुर्दैव असे, की त्याला अचानक मिळालेल्या वलयाचा त्याने पुरता आनंद घेण्यापूर्वीच निशांतने प्रसिद्धीच्या झोतावर हक्क सांगितला!
श्रीनिवास अथवा निशांतच्या पराक्रमांचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रश्नच नाही; पण अशा प्रकारे दोन सर्वस्वी भिन्न क्रीडा प्रकारांमधील विक्रमांची तुलना करणे आणि एका प्रकारात प्राविण्य प्राप्त केलेला खेळाडू सर्वस्वी भिन्न अशा दुसºया क्रीडा प्रकारात देशाला पदक प्राप्त करून देईल, अशी अपेक्षा बाळगणे
कितपत योग्य म्हणता येईल? त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच, की भले भले वाहवत गेले असले तरी श्रीनिवास गौडाचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. त्यामुळेच त्याने नम्रपणे चाचणीला नकार दिला आहे. त्यासाठी त्याने भिन्न क्रीडा प्रकार हेच कारण दिले आहे.
भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्येच्या बाबतीत महाप्रचंड असलेला आपला देश क्रीडा स्पर्धांमध्ये मात्र आकाराने लिंबू टिंबू असलेल्या देशांचीही बरोबरी करू शकत नाही, ही खंत प्रत्येक देशाभिमानी नागरिकाला जाणवते. विशेषत: अ‍ॅथलेटिक्समधील भारताचे अपयश तर प्रचंड खुपणारे आहे. त्यामुळे जेव्हा एखादा खेळाडू थोडीशीही चमक दाखवतो, तेव्हा लगेच आपल्याला त्या खेळाडूत संभाव्य पदक विजेता दिसू लागतो.
श्रीनिवास गौडा आणि निशांत शेट्टी ही काही अशा प्रकारची पहिली उदाहरणे नव्हेत! काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमधील एक शेतकरी विना पादत्राणांचा ११ सेकंदात १०० मीटर धावला होता, तेव्हा त्याच्याकडूनही अशाच अवास्तव अपेक्षा करण्यात आल्या होत्या. त्या शेतकºयासाठी एका चाचणी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. त्या चाचणीत तो अत्यंत खराब वेळ नोंदवित शेवटचा आला होता. त्यावेळी किरण रिजुजू यांनीच, प्रसिद्धीच्या झोतामुळे बावचळल्याने तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही, असा त्याचा बचाव केला होता. त्याला नीट प्रशिक्षण देऊन तयार करू, असेही त्यांनी सांगितले होते. तेव्हापासून आजतागायत त्या शेतकºयाविषयी काहीही ऐकायला मिळालेले नाही.
श्रीनिवास आणि निशांतची उसेन बोल्टसोबत तुलना करताना आपण ही बाबही ध्यानात घेत नाही, की ते रेड्यांचे कासरे हातात घेऊन पळत होते. थोडक्यात, रेडे त्यांना अक्षरश: ओढत नेत होते. अशा प्रकारे धावण्याला इंग्रजीत ‘असिस्टेड रन’ संबोधले जाते. त्यामध्ये चुकीचे काही नाही. तो त्या क्रीडा प्रकाराचा भागच आहे; परंतु त्यामुळेच त्या दोघांच्या धावण्याची उसेन बोल्टच्या धावण्यासोबत तुलना करणे, हा त्यांच्यावरील एक प्रकारचा अन्याय ठरतो.
भारताच्या ग्रामीण भागात अजिबात प्रतिभा नाही, असा या विवेचनाचा अर्थ नाही. यापूर्वी ग्रामीण भागातून आलेल्या अनेक क्रीडापटूंनी देशाची मान उंचावली आहे. जेव्हा जेव्हा ग्रामीण भागातील एखादा क्रीडापटू विशेष कौशल्याचे प्रदर्शन करतो तेव्हा त्याला प्रोत्साहन दिलेच पाहिजे; मात्र ते करताना आपल्या अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली तो पिचणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे!















 

Web Title: Don't overload expectations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.