शंकासुरांचे उपद्व्याप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 05:04 AM2018-02-09T05:04:13+5:302018-02-09T05:04:21+5:30
मुंबई पोलिसांची तुलना एकेकाळी स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांबरोबर केली जायची. त्या वेळी ठाणे पोलिसांची तुलना मुंबई पोलिसांबरोबरही करण्याची हिंमत कुणी दाखवत नसेल.
मुंबई पोलिसांची तुलना एकेकाळी स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांबरोबर केली जायची. त्या वेळी ठाणे पोलिसांची तुलना मुंबई पोलिसांबरोबरही करण्याची हिंमत कुणी दाखवत नसेल. पण, गेल्या काही महिन्यांत ठाणे पोलिसांनी वेगवेगळ्या प्रादेशिक, राष्ट्रीय इतकेच काय आंतरराष्ट्रीय प्रकरणांचा छडा लावून गुन्हेगारांबरोबरच पोलीस दलातील प्रतिस्पर्ध्यांचीही झोप उडवली आहे. गेले काही दिवस गाजत असलेले कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) विक्रीचे प्रकरण हे त्याच पठडीतील आहे. देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना सध्या याच प्रकरणात पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. गुन्ह्यांचा तपास लावण्याकरिता पोलीस उपायुक्त अथवा पोलीस अधीक्षक हे त्यांच्या कार्यालयीन ई-मेलद्वारे मोबाइल कंपन्यांशी संपर्क करून कुठल्याही व्यक्तीचा सीडीआर मागवू शकतात. एकदा एखाद्या व्यक्तीचे सीडीआर प्राप्त झाले की, ती व्यक्ती कुणाकुणाच्या संपर्कात होती, तिने कुणाला कधी, किती वेळा फोन केले वगैरे माहिती उपलब्ध होते. मोबाइलवरून लोकेशन समजते. त्यामुळे गुन्ह्याचा तपास लावणे सोपे झाले. तंत्रज्ञानाची ही सकारात्मक बाजू झाली. मात्र, ज्या मोबाइलमुळे सध्या घरातील लोकांचा, नातलगांचा, मित्रमंडळींचा थेट संवाद जवळपास बंद होऊन कृत्रिम संवाद उरला आहे, अशा व्यक्तींना संशय, शंकाकुशंकांनी बेजार करणे स्वाभाविक आहे. पतीचा पत्नीवर, वडिलांचा मुलावर, भागीदारांचा परस्परांवरील विश्वास संपल्यावर मग त्यांनी एकमेकांची माहिती मिळविण्याकरिता खासगी गुप्तहेरांची मदत घेतली. पोलिसांना नियमानुसार मिळणारे सीडीआर गुप्तहेरांना बेकायदा पुरविण्याकरिता दिल्लीतील सौरव साहूसारखे दलाल जन्माला आले. सर्वसामान्य माणसांवर हे गुप्तहेर जाळे फेकत होते, तोवर ठीक होते. मात्र, जेव्हा त्यांनी काही राजकारणी व लब्धप्रतिष्ठितांवर त्याचा प्रयोग केला, तेव्हा परस्परांवर डोळा ठेवून असलेल्या गुप्तहेरांकडून ही माहिती फुटली आणि त्यातून पोलिसात तक्रार झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निकटचा संबंध असलेल्या रजनी पंडित यांच्यासारख्या हाय-प्रोफाइल गुप्तहेराला झालेली अटक, ही हे प्रकरण किती गंभीर आहे आणि त्यामध्ये कसे बडे मासे गुंतलेले आहेत, हे सांगण्यास पुरेशी आहे.या प्रकरणातील मूळ तक्रारदाराबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे, हेही तीच बाब अधोरेखित करते. झटपट मोठे होण्याकरिता शॉर्टकटचा केला जाणारा वापर, गुन्हेगारी कृत्ये करण्यास सहज तयार होणारी माणसे, अनैतिक संबंध व पैशांचा हव्यास यात गुंतलेल्या शंकासुरांचे उपद्व्याप उघड झाले आहेत.