‘सिव्हिल सोसायटी’चा दुटप्पी व अप्रामाणिकपणा

By admin | Published: September 9, 2015 04:15 AM2015-09-09T04:15:42+5:302015-09-09T04:15:42+5:30

कर्नाटकातील विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या धारवाड येथे भरदिवसा गोळ्या घालून करण्यात आलेल्या हत्त्येचा सर्वच थरातून धिक्कार होणे आवश्यक आहे.

Doubtfulness and dishonesty of 'civil society' | ‘सिव्हिल सोसायटी’चा दुटप्पी व अप्रामाणिकपणा

‘सिव्हिल सोसायटी’चा दुटप्पी व अप्रामाणिकपणा

Next

- बलबीर पुंज
( माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा)

कर्नाटकातील विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या धारवाड येथे भरदिवसा गोळ्या घालून करण्यात आलेल्या हत्त्येचा सर्वच थरातून धिक्कार होणे आवश्यक आहे. पण या दुष्कृत्याविरुद्ध वक्तव्य करणारे लोक सामाजिक न्यायाच्या नावाखाली विध्वंसाचा पुरस्कार करणारेच आहेत.
ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील जंगलात स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांचा देह बंदुकीच्या गोळ्या घालून विच्छिन्न करण्यात आला, तेव्हा मात्र त्या घटनेच्या विरुद्ध कुणी आवाज उठविताना दिसले नाही. २३ आॅगस्ट २००८ रोजी स्वामीजी पहाटे स्नान करीत असताना मारेकऱ्यांनी त्यांच्या स्नानगृहाचा दरवाजा तोडून त्यांची हत्त्या केली. स्वामीजींचा गुन्हा कोणता होता? मागासलेल्या भागातील गरीब आदिवासी लोकांसाठी त्यांनी आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य केले. त्यांनी आपल्या पूर्वजांचा वारसा जपून ठेवण्याची आदिवासींना प्रेरणा दिली. विदेशी शक्तींनी भारताविरुद्धच्या युद्धात ज्यांचा इंधन म्हणून वापर केला किंवा भाकरीचा तुकडा देऊन ज्यांचा आत्मा विकत घेण्याचा प्रयत्न केला, त्याविरुद्ध त्यांनी लढा दिला.
८२ वर्षे वयाच्या वयोवृद्ध स्वामींची हत्त्या झाल्यानंतर पाच वर्षांनी ३० सप्टेंबर २०१३ रोजी सात ख्रिश्चनांना हत्त्येसाठी जबाबदार धरण्यात आले. स्वामीजी आणि त्यांच्या संस्था तेथील माओवाद्यांना तसेच चर्चला खटकत होत्या. कारण दोघेही स्वत:चा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करीत होते. दक्षिणेतील एका महत्त्वाच्या इंग्रजी दैनिकाने नुकताच एका मार्क्सवादी लेखकाचा लेख प्रसिद्ध केला असून त्यात स्वामीजींच्या हत्त्येबाबतच्या न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. ज्यांच्यावर हत्त्या करण्याचा आरोप सिद्ध करण्यात आला, त्यांची बाजू घेताना लेखिका लिहिते, ‘त्या लोकांचा एकच गुन्हा होता की ते आदिवासी, दलित आणि गरीब ख्रिश्चन होते!’. स्वामीजींच्या हत्त्येचा आरोप असलेल्यांची मुक्तता करण्याची मागणी आता होत आहे.
सिव्हिल सोसायटीच्या वतीने बोलणारे लोक न्यायालय हे पक्षपाती आहे, असे म्हणू शकतील का? स्वामीजींच्या मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी पूर्ण पोलीस चौकशी झाली होती. तसेच कायद्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे, त्यांना स्वत:चा बचाव करण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती.
कलबुर्गी यांची हत्त्या ही हिंदू विरोधी कृती आहे. ती हत्त्या करणाऱ्यांविषयी कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखविण्याची गरज नाही. कायद्याप्रमाणे त्या गुन्हेगारांना, (ते जे कुणी असतील त्यांना) शिक्षा व्हायलाच हवी. पण अशा हत्त्यांच्या बाबतीत दुहेरी मापदंड कसे असू शकतात? हत्त्या करण्यात आलेल्या व्यक्तीची विचारसरणी आणि हत्त्या करणारे मारेकरी, यांच्यामुळे सिव्हिल सोसायटीने आपली प्रतिक्रिया देताना तिला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये.
अयोध्येतून परत येणाऱ्या ५९ करसेवकांना रेल्वेच्या डब्यात जात्यंधांकडून जेव्हा जाळण्यात आले, तेव्हा कोणत्या तऱ्हेच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या? सुरुवातीला तर या तथाकथित निधार्मिक लोकांनी करसेवकांनाच जळितकांडाबद्दल जबाबदार धरले होते! एका बहुआवृत्तीय इंग्रजी वृत्तपत्राने त्या घटनेवरील संपादकीयात म्हटले होते की, ‘कासेवकांनी अयोध्येला जाण्याची आणि श्रीरामाच्या घोषणा देण्याची प्रक्षोभक कृती केल्याचा तो परिणाम होता’.
मे २००४ मध्ये संपुआ सत्तेत आल्यावर चारच महिन्यांनी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी न्या. उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून गोध्रा प्रकरणाची चौकशी करविली. सरकारच्या निधार्मिक धोरणाची ‘री’ ओढत बॅनर्जी यांच्या समितीने ती आग अपघाताने लागली होती, असा निष्कर्ष काढून ती भयानक घटना घडवून आणणाऱ्यांना निर्दोष सोडले होते.
या तऱ्हेचे दुहेरी मापदंड वापरणारे विचारवंत आणि कार्यकर्ते हे बहुधा डाव्या विचारसरणीचे असतात, जे स्वत:ला निधार्मिकवादी समजत असतात. अशा तऱ्हेचा बौद्धिक अप्रामाणिकपणा दाखविल्यामुळे राजकीय तसेच वैचारिक विरोधकांविरुद्ध होणारा हिंसाचार हा प. बंगाल आणि केरळमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो, कारण तेथे गेली तीन दशके कम्युनिस्टांचे प्राबल्य आहे. निरनिराळ्या रंगाचे डावे पक्ष स्वत:ला निधार्मिक आणि लोकशाहीवादी मूल्यांचे समर्थक समजत असतात. पण त्यांचा याविषयीचा इतिहास अत्यंत काळाकुट्ट आहे. भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी याच कम्युनिस्टांनी जिनांची सोबत केली होती; तसेच पाकिस्तान निर्मितीसाठी ब्रिटिशांना साथ दिली होती.
आता आपण पुन्हा कलबुर्गींच्या खुनाकडे वळू. त्यांच्या खुन्यांबाबत घाईने अंदाज वर्तविणे चुकीचे ठरेल. पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यंत या हत्त्येमागील हेतू समजणार नाही. पण एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नाहीत म्हणून तिची हत्त्या करणे हे भारतीय परंपरेत तसेच तत्त्वज्ञानात बसत नाही. ‘एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका’च्या नव्या आवृत्तीत म्हटले आहे की, ‘केवळ तत्त्वांचा विचार केला तर हिंदू तत्त्वज्ञानाने कोणत्याही विचारांना अस्पृश्य मानले नाही. उलट सर्व विचारांचा समावेश आपल्या तत्त्वज्ञानात केला आहे. भारतात कोणत्याही धर्माचे तत्त्वज्ञान हे मृत होत नाही किंवा त्यावर कुरघोडी करण्यात येत नाही. उलट सर्व विचारांचा त्यात समावेश करण्यात येतो. कोणत्याही तत्त्वज्ञानातील जे पवित्र आहे त्याचा स्वीकार हिंदूंनी केलेला आहे. ते विचारांनी सहिष्णु आहेत. त्यामुळे हिंदू आणि अ-हिंदू हे एकत्र सुखाने नांदत असतात.’
अशा तऱ्हेची बहुआयामी विचारसरणी असलेल्या देशात कोणत्याही प्रकारच्या हिंसेला थाराच नाही. पण इस्लामच्या आगमनानंतर या विचारात विकृती शिरली. (आठव्या शतकात महम्मद बिन कासीम याच्यामुळे) आणि ख्रिश्चन धर्मोपदेशक सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या रूपात १५४२ साली. ते आक्रमक म्हणून या देशात आले. त्यानंतर १९२० साली विदेशी कम्युनिस्ट विचारांमुळे ‘वर्ग विद्वेष आणि युद्ध’ ही विचारसरणी भारतात अवतरली. त्या सर्वांनी असहिष्णुता आणि आत्यंतिक धर्माभिमान या देशात आणला.
गेल्या शतकात जागतिक इतिहास हा स्टालीनवाद्यांनी केलेल्या अतिरेकामुळे रक्तरंजित झाला. स्टालीनवाद्यांनी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणी इतरांवर थोपविण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे नाझी फॅसिस्टांनी वांशिक भूमिकेतून ज्यूंवर अत्त्याचार केले. याप्रकारे इतिहासाची पुनरावृत्ती एक शोकांतिका म्हणून व नंतर फार्समधून होत असते. पण कामगारवर्गाच्या हुकूमशाहीच्या रूपाने किंवा धर्माच्या नावाने होणाऱ्या स्वयंघोषित क्रांतीपासून मिळणारा बोध एकच असतो : तो म्हणजे विविधतेतून निर्माण होणारी एकता आणि त्याविषयीचा आदर हाच टिकाऊ लोकशाहीसाठी आवश्यक असतो.

 

Web Title: Doubtfulness and dishonesty of 'civil society'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.