डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशिक्षण संस्थेची ७७ वर्षांची वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 07:23 AM2022-07-07T07:23:30+5:302022-07-07T07:23:47+5:30
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’मुळे हजारो वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. या संस्थेला उद्या ७७ वर्षे पूर्ण होत आहेत...
सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग
पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस) डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केली. ही संस्था ८ जुलै २०२२ रोजी आपल्या अस्तित्वाची ७७ वर्षे पूर्ण करीत आहे. मागासवर्गीयांच्या दयनीय शैक्षणिक परिस्थितीने आंबेडकरांना या वर्गाच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यास प्रवृत्त केले. त्यांनी २९ मे १९२८ रोजी ब्रिटिश सरकारला केलेल्या निवेदनात १७७२च्या ब्रिटिश सरकारच्या कायद्याने मागासवर्गीयांना शिक्षणाचा हक्क नाकारण्याचा प्राचीन व मध्ययुगीन वारसा चालूच ठेवला होता हे निर्देशनास आणून दिले. परिणामी १७७२ ते १८५५ या ८३ वर्षांच्या काळात बहिष्कृत वर्गाला शिक्षणाची दारे बंद होती.
ब्रिटिशांनी शेवटी १८५५ला गरीब बहिष्कृत वर्गासाठी शिक्षण खुले केले. मात्र उच्च जातींच्या प्रखर विरोधामुळे इतर जातींसाठी वेगळ्या शाळा काढल्या. तरीही शैक्षणिक प्रवेशदरात फारशी सुधारणा झाली नाही. १९२३ ला त्यांचा प्रवेशदर जवळपास नगण्यच होता. म्हणूनच १९२० ते १९४४ पर्यंत आंबेडकरांनी बहिष्कृत वर्गाच्या शैक्षणिक विकासासंबंधीच्या धोरणासाठी सतत संघर्ष केला. त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण आणि शिष्यवृत्ती मिळवण्यात आंबेडकर यशस्वी झाले. ७८ वर्षे जुन्या असलेल्या या दोन्ही शिष्यवृत्ती आतापर्यंत सुरू आहेत. मात्र डॉ. आंबेडकर तिथेच थांबले नाहीत. त्यांनी विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. १९४५ मध्ये मुंबईला पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. १९४६ मध्ये प्रथम मुंबईला व नंतर १९५० मध्ये औरंगाबादला महाविद्यालये स्थापन केली. आता पीईएसच्या मुंबई, औरंगाबाद, पुणे, नांदेड, बिहार, बंगळुरू, कोल्हापूर, पंढरपूर व महाड येथे कला, विज्ञान, वाणिज्य, अर्थशास्त्र, कायदा, इंजीनिअरिंग, पॉलिटेक्निक, कॉम्प्युटर, फिजिकल एज्युकेशन अशा ३१ संस्था व १२ वसतिगृहे आहेत. मागील ७७ वर्षांत पीईएसमुळे अगणित विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. मासिक शिष्यवृत्ती, पुस्तके, भत्ते व वसतिगृहे ही अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील यशाचे गमक ठरले.
आंबेडकरांनी त्यांच्या संस्थेसमोर शिक्षणाची विशिष्ट उद्दिष्टेसुद्धा निश्चित केली. त्यांच्या दृष्टिक्षेपातील शिक्षणाचे तिहेरी ध्येय, वैज्ञानिक, व्यावसायिक व नैतिक शिक्षण देणे हे होते. वैज्ञानिक शिक्षण हे व्यक्तीची दृष्टी प्रबुद्ध करेल तर व्यावसायिक शिक्षण रोजगारक्षमता वाढवेल. त्यांनी नैतिक शिक्षणालासुद्धा लोकशाही मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने समान महत्त्व दिले. पीईएसच्या महाविद्यालयांनी दिलेल्या शिक्षणामुळे वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांची आर्थिक प्रगती झाली व जातीवर आधारित असमान समाजात सामाजिक परिवर्तन आणणारी पिढी उभी केली गेली. पीईएसच्या शिक्षणाने मिळवलेली ही सर्वोच्च व उदात्त राष्ट्रीय कामगिरी आहे.
वंचित वर्गाची शैक्षणिक प्रगती मात्र अजूनही कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने पीईएस व त्यासारख्या संस्थांना विशेष साहाय्य दिले नाही. पीईएसला ७७ वर्षे पूर्ण होत असताना ज्या पायाभूत सुविधा सध्या अत्यंत विदारक स्थितीत आहेत, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी सरकारने साहाय्य करण्याची हीच योग्य वेळ आहे. पीईएसला सक्षम बनविण्याची जबाबदारी लोकांचीही आहे, कारण बाबासाहेबांनी तिला लोकांची संस्था म्हणून उभे केले. ‘समाजाला परतावा’ या धोरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पीईएसची पुनर्बांधणी करण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा. पीईएसचा ७७ वर्षांचा प्रवास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाला ही एक मोठी आदरांजली ठरेल.