डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नातू ओवैसीच्या मागे जाणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 03:12 AM2018-10-26T03:12:09+5:302018-10-26T14:45:15+5:30
बाबासाहेब देशभक्त होते, धर्मपरिवर्तन केले तरी त्यांची या देशावरील निष्ठा अभंग राहिली. त्याचमुळे ते देशाचे पहिले कायदामंत्री व घटनेचे शिल्पकार झाले. सर्व जातीधर्मांच्या नागरिकांना मूलभूत अधिकार देण्याचे क्रांतिकारी पाऊलही त्यांनीच टाकले.
प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची युती म्हणजे दलित व मुसलमान यांची युती नव्हे. महाराष्ट्राबाहेरचा दलित समाज जसा आंबेडकरांसोबत नाही तसा हैदराबाद परिसराबाहेरचा मुसलमान समाजही ओवेसीच्या मागे नाही. मुळात या दोघांचेही नेतृत्व व पक्ष प्रादेशिकच आहेत. प्रकाश आंबेडकरांचा पक्ष हा बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या नंतर झालेल्या अनेक शकलांपैकी एक आहे तर ओवेसी यांचा पक्ष निजामाच्या राज्यातील इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाचा अवशेष मात्र आहे. रिपब्लिकन पक्ष पूर्वीही कधी स्वबळावर आपले उमेदवार निवडून आणू शकला नाही आणि ओवेसीच्या पक्षाचा मुस्लीमबहुल क्षेत्राबाहेर प्रभाव नाही. त्यामुळे त्यांची युती ही प्रत्यक्षात प्रादेशिक स्वरूपाची व हैदराबाद आणि महाराष्ट्राचा काही भाग वगळता देशात फार काही करू शकेल अशी नाही. त्यामुळे त्यांचे एकत्र येणेही राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. मात्र या काळात आंबेडकरांवर ओवेसी यांचा पडलेला व वाढत चाललेला प्रभाव चिंताजनक वाटावा असा आहे.
‘भारतातील जनतेवर वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती नको’ हा त्यांचा आताचा अविचारी उद्गार तर त्यांच्याविषयी आस्था असणाऱ्यांनाही अस्वस्थ करणारा आहे. मुसलमान धर्माची एक आज्ञा अशी की त्यांनी अल्लाखेरीज इतरांसमोर नमायचे नसते. तरीही भारतातला मुसलमानांचा मोठा वर्ग राष्ट्रध्वजाला व भारतमातेला वंदन करीतच असतो. त्यामुळे त्यांच्या धर्मश्रद्धेला बाधा येते असे ते मानत नाहीत. मातृभूमीला वंदन करणे किंवा राष्ट्राच्या प्रतीकासमोर नतमस्तक होणे यात धर्म आडवा येत नाही. खरेतर, तो धर्माहून श्रेष्ठ असलेल्या राष्ट्र या संकल्पनेचा गौरव आहे. मुळात ही मागणी ओवेसी यांची आहे. तिला खतपाणी घालण्याचे काम अल्पसंख्याकांचा घाऊक द्वेष करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनीही केले आहे. पण हीच मागणी प्रकाश आंबेडकर करीत असतील तर ते ओवैसीच्याही पुढे व खाली गेले असे म्हणावे लागेल. प्रत्यक्ष घटनाकार असलेल्या बाबासाहेबांचा नातू अशी भूमिका घेत असेल तर तो प्रकार आंबेडकरांच्या थोरवीला व त्यांच्या राष्ट्रभक्तीलाही कमीपणा आणणारा आहे. कारण बाबासाहेब नेहमी म्हणायचे की, मी प्रथम भारतीय आहे़ त्यामुळे ओवेसीच्या घोषणेला पाठिंबा देऊन दलितांचे वर्ग आपल्या पाठीशी येतील असे प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर तोही त्यांचा खुळेपणाच म्हणावा लागेल. आजच्या घटकेला देशातील दलितांचा सर्वांत मोठा वर्ग मायावतींच्या बसपासोबत आहे. त्याची कारणे दलितांमधील जातीभेदांत शोधावी लागत असली तरी मायावतींची बाबासाहेबांवरील निष्ठा संशयातीत आहे. त्यांनी आजवर कधी भाजपाशी तर कधी समाजवादी पक्षाशी युती केली. पण मुस्लीम धर्माचे एकांगी राजकारण करणाºया पक्षांशी वा नेत्यांशी स्वत:ला जुळवून घेणे त्यांना कधी मान्य झाले नाही. ओवैसीचा पक्ष एकेकाळी निजामाच्या राजवटीला पाठिंबा देणारा होता. तो पाकिस्तानची बाजू घेणाराही होता. भारतात दुहीचे राजकारण करण्याच्या हिंदुत्ववाद्यांच्या प्रयत्नांना मुसलमानांच्या बाजूने साथ देणाºयांतही तो आहे. त्यांना मुस्लीम समाजाचे अंधश्रद्ध राजकारण पुढेही चालवायचे आहे. संसदेत व अन्यत्र त्यांनी केलेली भाषणे पाहिली तरी हे लक्षात येण्याजोगे आहे. प्रकाश आंबेडकरांची परंपरा व वारसा तसा नाही.
बाबासाहेब देशभक्त होते, धर्मपरिवर्तन केले तरी त्यांची या देशावरील निष्ठा अभंग राहिली. त्याचमुळे ते देशाचे पहिले कायदामंत्री व घटनेचे शिल्पकार झाले. देशातील सर्व जातीधर्मांच्या नागरिकांना सारखे मूलभूत अधिकार देण्याचे क्रांतिकारी पाऊलही त्यांनीच टाकले. त्यांना राष्ट्रध्वज सन्माननीय वाटला व मातृभूमीही वंदनीय वाटली. या स्थितीत प्रकाश आंबेडकरांनी वंदे मातरम्ला विरोध करणे ही बाब ते बाबासाहेबांहूनही ओवैसीच्या व त्यांना ज्याचा वारसा लाभला त्या इत्तेहादुलच्या जवळ गेले असेच म्हणावे लागेल. त्यांच्यामागे महाराष्ट्रातला दलित समाजही फारसा नाही आणि जो आहे तोही त्यांची आताची भूमिका मान्य करणार नाही. कारण या देशातला दलितांचा वर्गही देशभक्त व मातृभूमीवर श्रद्धा ठेवणारा आहे.