डॉ. मनमोहनसिंग यांचा अभिनंदन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:02 AM2017-10-14T02:02:51+5:302017-10-14T02:03:55+5:30
१४ आॅक्टोबर २०१७ रोजी दिल्ली येथे डॉ. मनमोहनसिंग यांना ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रस्तुत समारंभाची निमंत्रण पत्रिका मिळाली आणि मला मनापासून आनंद झाला.
१४ आॅक्टोबर २०१७ रोजी दिल्ली येथे डॉ. मनमोहनसिंग यांना ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रस्तुत समारंभाची निमंत्रण पत्रिका मिळाली आणि मला मनापासून आनंद झाला. सदर पुरस्कार महाराष्ट्रातील वनराई फाऊंडेशनतर्फे देण्यात येतो. आतापर्यंत तो पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण अण्णा हजारे आणि पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर ज्यांनी आपल्या देशाचा लौकिक निर्माण करण्यात आयुष्य वेचले अशा व्यक्तींचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. सदर पुरस्कार कुठल्याही राजकीय पक्षाने अथवा सरकारने पुरस्कृत केलेला नाही. साहित्याच्या क्षेत्रात ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार जसा अशासकीय स्वरूपाचा आहे, तसाच हा देशपातळीवरचा ‘वनराई फाऊंडेशन’ या संस्थेने सुरू केलेला अशासकीय पुरस्कार आहे. ‘वनराई’ या प्रकल्पाची सुरुवात डॉ. मोहन धारिया यांनी त्यांच्या हयातीत केली. मोहन धारिया यांच्या अनेक चाहत्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेले हे फाऊंडेशन असून, पक्षनिरपेक्ष पद्धतीने त्यांच्या प्रकल्पाचे कार्य पुढे नेणारे एक महत्त्वाचे फाऊंडेशन आहे. स्वत: मोहन धारिया हे काही काळ भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. स्व. राजीव गांधी यांनी याच प्लॅनिंग कमिशनचे सल्लागार सदस्य म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आपल्या देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत मनमोहनसिंग यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. एका अर्थाने केवळ एका व्यक्तीचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार नव्हे.
आजच्या स्फोटक अशा राजकीय वातावरणात फाऊंडेशनने डॉ. मनमोहनसिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला याचा कुणालाही सहजच आनंद व्हावा, अशी ही गौरवास्पद घटना आहे. आज मनमोहनसिंग निवडणुकीच्या राजकारणापासून काहीसे अलिप्त झालेले आहेत. त्यांच्या राजकीय पक्षालाही या पुरस्काराचा काही लाभ होईल, ही शक्यता नाही. ‘कमजोर’ पंतप्रधान, कमीत कमी बोलणारे पंतप्रधान, स्वत:च्या पदाचा रिमोट इतरांच्या हाती देऊन सत्तेत राहणारे पंतप्रधान अशा अनेक शेलक्या विशेषणांनी त्यांचा त्या काळातील माध्यमांनी ‘गौरव’ केला. काँग्रेस पक्षातील अनेक ‘घोटाळ्या’ना त्यांच्या काळात ऊत आला होता; पण यापैकी कुठल्याही घोटाळ्यात त्यांचा सहभाग नव्हता एवढे त्यांचे चारित्र्य स्वच्छ होते, हे आज आपल्या लक्षात आले आहे. आपल्या देशातील सोने विक्रीला काढले गेले ते यांच्याच काळात; पण असे असले तरी ते तेवढ्याच सामर्थ्याने परत मिळवून आपल्या देशाची अर्थव्यवस्था मूळ पदावर आणली गेली तीही त्यांच्याच काळात. यात त्यांचे ‘व्हीजन’ दिसून येते. अशा या व्हिजनरी माजी पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या धोरणाबद्दल त्याचवेळी राज्यसभेत अवघे १५-२० मिनिटांचे भाषण देऊन जे काही भीषण परिणाम या देशातील सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतील, त्याचा इशारा देऊन ठेवला होता. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतील ‘माहितीच्या अधिकाराचा’ निर्णय हे त्यांचे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाचे योगदान आहे, हे समजून घ्यायलाही काही काळ जावा लागेल. त्यांचा हा गौरव म्हणजे अशा जबाबदार राज्यपद्धतीचा प्रातिनिधिक स्वरूपातील गौरव आहे.
- दत्ता भगत