डॉ. दाभोलकर हत्येचा तपास संथगतीने; विचारकार्य जोमात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:12 AM2020-08-20T03:12:38+5:302020-08-20T03:12:54+5:30

या प्रकरणातील तपास जलदगतीने पूर्णत्वाला जाईल आणि ह्या हत्येमागील सूत्रधारांना अटक केली जाईल, अशी अपेक्षा होती; पण तपास हा अतिशय संथगतीने सुरू आहे.

Dr. Dabholkar murder probe slow; Thought work in full swing | डॉ. दाभोलकर हत्येचा तपास संथगतीने; विचारकार्य जोमात

डॉ. दाभोलकर हत्येचा तपास संथगतीने; विचारकार्य जोमात

Next

- डॉ. हमीद दाभोलकर
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला आज, गुरुवारी २० ऑगस्टला सात वर्षे पूर्ण होत आहेत. ‘सीबीआय’ने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या डॉ. दाभोलकर यांच्या संशयित मारेकऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर अनेक वर्षे लांबलेल्या या प्रकरणातील तपास जलदगतीने पूर्णत्वाला जाईल आणि ह्या हत्येमागील सूत्रधारांना अटक केली जाईल, अशी अपेक्षा होती; पण तपास हा अतिशय संथगतीने सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी पकडले, सूत्रधार कधी पकडणार? हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम मात्र डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन दुप्पट निर्धाराने चालू आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतर महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा मंजूर झाला. अंधश्रद्धा विरोधी प्रभावी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. केवळ तेवढेच नाही तर या कायद्यांतर्गत ७०० पेक्षा अधिक बुवा-बाबांना तुरुंगाची हवा चाखावी लागली आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर कर्नाटकमध्येदेखील अशा स्वरूपाचा कायदा झालेला आहे. देशपातळीवर अशा स्वरूपाचा कायदा व्हावा, म्हणूनदेखील प्रयत्न चालू आहेत. केवळ जादूटोणाविरोधी कायदा नाही, तर सामाजिक बहिष्कार आणि जातपंचायत यांच्याविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. कोविडच्या कालखंडात सामाजिक बहिष्काराचा त्रास अनेक लोकांना भोगावा लागला. त्या परिस्थितीमध्ये या कायद्याचा अनेक ठिकाणी वापर करून सामाजिक बहिष्काराच्या घटनांमध्ये सकारात्मक हस्तक्षेप करता आला आहे.


प्रख्यात नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रिंगण’ नाटकाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाला धरून ५०० पेक्षा अधिक प्रयोगांचे आयोजन गेल्या सात वर्षांमध्ये झाले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. डॉ. दाभोलकर यांच्या पश्चात विसर्जित गणपती दान आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव या उपक्रमाला राज्यभर वाढता प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी पुण्यातील प्रमुख पाच मानाच्या गणपती मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेशोत्सव मंडळे साधेपणाने उत्सव साजरा करत आहेत. ईदचा सणही साधेपणाने साजरा झाला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मांडलेले विचार समाज स्वीकारतो आहे, ही आश्वासक गोष्ट आहे.
‘अंनिस’ने सुरू केलेली ‘फटाकेमुक्त दिवाळी’, ‘होळी लहान करा-पोळी दान करा’ या स्वरूपाचे कार्यक्रम आज महाराष्ट्र शासनाचे अधिकृत कार्यक्रम झाले आहेत. हीदेखील नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. दाभोलकर यांचे विचार जे पूर्वी मराठी भाषेपुरते मर्यादित होते, ते डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या पुढाकाराने आता हिंदीमध्ये प्रकाशित होत आहेत. २२ आॅगस्टला हिंदीमधील राजकमल प्रकाशनातर्फे आंतरराष्टÑीय वैज्ञानिक डॉ. डी रघुनंदन यांच्या हस्ते ही पुस्तके देशभर प्रकाशित होत आहेत. एका आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने डॉ. दाभोलकर यांचे साहित्य इंग्रजीमध्ये आणायला सुरुवात केली आहे. त्यामुळे केवळ देशभर नव्हे तर जगभर हा विचार पोहोचत आहे.

देशभरातील विज्ञानवादी संघटना २० आॅगस्ट हा दिवस डॉ. दाभोलकर यांची स्मृती म्हणून ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून त्या दिवशी विज्ञानविषयक कार्यक्रम आयोजित करत आहेत. ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर ‘अंनिस’ आणि ‘परिवर्तन’
या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या संस्थांनी शेकडो लोकांना समुपदेशनाची मोफत सुविधा पोहोचवली आहे. यावर्षीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर
स्मृती व्याख्यान प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र
यादव २० आॅगस्टला देणार आहेत. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम थांबावे यासाठी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती; पण प्रत्यक्षात गेल्या सात वर्षांत झालेले काम लक्षात घेता तो मनसुबा अजिबात यशस्वी झालेला नाही. महत्त्वाची नोंद म्हणजे गेल्या सात वर्षांत आपण केलेली सर्व लढाई ही संविधानाच्या चौकटीमध्ये राहून केली गेली आहे. माणूस मारून कधी विचार संपत नाहीत, ही गोष्ट ह्यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
(कार्याध्यक्ष, अंनिस)

Web Title: Dr. Dabholkar murder probe slow; Thought work in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.