चला, खासगी आयुष्यातल्या विहिरी उपसू या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:32 AM2021-10-20T05:32:21+5:302021-10-20T05:33:35+5:30

औरंगाबादची घटना एका कुटुंबातली; पण एकमात्र नव्हे. जवळच्या नात्यांमध्ये पडत चाललेल्या अशा फटी; हे दुर्दशेचे चिन्ह होय

dr rajan shinde murder case we have to think about mental health and communication with family | चला, खासगी आयुष्यातल्या विहिरी उपसू या...

चला, खासगी आयुष्यातल्या विहिरी उपसू या...

Next

- नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत, औरंगाबाद

पती-पत्नी दोघेही प्राध्यापक, दरमहा सहा आकडी पगार, महाविद्यालयात शिकणारी दोन मुलं, उच्चभ्रू वस्तीत आलिशान बंगला, महागडी चारचाकी वाहनं, सामाजिक - शैक्षणिक वर्तुळात वावर, उच्च मध्यमवर्गीय राहणीमान... वरवर पाहता कोणालाही हेवा वाटेल अशा कुटुंबात एकाएकी असे काय घडले? असा प्रश्न प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या हत्येच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आठ दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर पोलिसांनी प्रा. शिंदे यांच्या हत्येचे गूढ उकलून एका अल्पवयीन मुलास (कायद्याच्या भाषेत, विधिसंघर्षग्रस्त बालक) ताब्यात घेतले खरे, परंतु अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. औरंगाबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. राजन शिंदे यांची गेल्या सोमवारी राहत्या घरी हत्या झाली. प्रा. शिंदे यांच्या हत्येची वार्ता समजताच शहरभर खळबळ उडाली. प्रा. शिंदे हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक. सामाजिक, शैक्षणिक चळवळीत त्यांचा चांगला वावर होता. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असाच आरंभी सर्वांचा समज झाला होता. मात्र, सकृतदर्शनी हाती आलेले पुरावे आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या जबानीतून जी माहिती समोर आली, ती ऐकून पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला. कारण, मारेकरी दुसरा - तिसरा कुणी नसून निकटवर्तीय अल्पवयीन असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. महाविद्यालयात नुकत्याच दाखल झालेल्या एका शाळकरी वयाच्या मुलाच्या हातून हे निर्घृण कृत्य घडले, यावर सहसा कोणाचा विश्वासच बसणार नाही. एखादा सराईत, अट्टल गुन्हेगारदेखील इतक्या निर्घृणपणे कृत्य करणार नाही, तितक्या थंड डोक्याने (कोल्ड ब्लडेड) हे हत्याकांड त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या हातून घडल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाच्या हातून हे कृत्य कसे घडले, याचा छडा पोलिसांनी लावला आहे. पण का घडले? या प्रश्नाचे उत्तर अजून बाकी आहे. 



या हत्याकांडामागे सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबीक नातेसंबंधाचे अनेक नाजूक पदर असल्याने हा गुंता वाटतो तितका सहज सुटणारा नाही. म्हणूनच, कदाचित कायद्याच्या पुस्तकातही या ‘का’चे उत्तर सापडणार नाही. नातेसंबंधाची वीण एकदा का उसवली, की त्यातून कौटुंबीक ताणतणाव वाढत जातो. त्यातून मग हत्या किंवा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते, हे आजवरच्या अनेक घटनांमधून समोर आले आहे. आजकाल एकलकोंडी झालेली मुले सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत. 

कोरोनाकाळात तर सर्वांचीच घरकोंडी झाल्याने कुटुंबातील ताणतणाव विकोपाला गेले. एरवी समाजात उजळ माथ्याने वावरणाऱ्या अनेकांचा खरा ‘चेहरा’ याच काळात उघडा पडला. सोशल मीडियामुळे जगभरचे मित्र-मैत्रिणी जवळ आल्या. पण घरचे दुरावले. संवाद खुंटल्याने नातेसंबंध ताणले गेले. घरातील अशा विसंवादी वातावरणाचा मुलांच्या भावविश्वावर नकळत का होईना परिणाम होतच असतो. दुसरीकडे, संस्काराच्या नावाखाली मुलांवर सतत पाळत ठेवणे, त्यांच्या आवडी-निवडीकडे दुर्लक्ष करून विशिष्ट अभ्यासक्रमासाठी बळजबरी करणे, अभ्यासावरून मुलांना सतत टोमणे मारणे, हे सर्रास होताना दिसते. 



प्रा. शिंदे यांच्या हत्येप्रकरणी बाल न्याय मंडळाने निरीक्षणगृहात रवानगी केलेला विधिसंघर्षग्रस्त मुलगा अशाच कौटुंबीक ताणतणावाखाली होता आणि त्यातून त्याला ओटीटीवरच्या ‘क्राइम सिरीज’ पाहण्याचा छंद लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते खरे असेल तर भयंकर आहे. कारण, हत्या कशी करावी, पुरावे कसे नष्ट करावेत, याचे जणू प्रशिक्षणच त्याने ओटीटीवरून मिळवले होते. मित्र नसल्याने आलेला एकलकोंडेपणा, दुरावलेले नातेसंबंध आणि ओटीटीचे व्यसन अशा चक्रातून त्याला बाहेर पडता न आल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असेल का? 

ही घटना एका कुटुंबातली खरी; पण एकमात्र मात्र नव्हे. समाजासमोर आरसा धरण्याचे काम अशा घटना करत असतात, हे विसरता कामा नये. जवळच्या नात्यांमध्ये पडत चाललेल्या या अशा फटी; हे दुर्दशेचे चिन्ह होय.  कुटुुंब हीच खरी संपत्ती मानून प्रामाणिकपणे नाती जपली तर कोणावरच असा दुर्धर प्रसंग ओढवणार नाही. फक्त त्यासाठी, खासगी आयुष्याच्या विहिरीत साचलेला गाळ उपसावा लागेल. तो उपसण्याची किती जणांची तयारी आहे, हा या निमित्ताने उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न आहे!

Web Title: dr rajan shinde murder case we have to think about mental health and communication with family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.