ड्रॅगनची भारतात हेरगिरी; देशापुढे नवी ‘तरंगती’ समस्या, श्रीलंकेत आलेल्या चीनी जहाजाचा मागचं राजकारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 07:26 AM2022-08-21T07:26:24+5:302022-08-21T07:31:30+5:30

आर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्यात चीनने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली. चीनची महत्त्वाकांक्षा उत्तरोत्तर वाढलेली आहे.

Dragon espionage in India A new floating problem before the country | ड्रॅगनची भारतात हेरगिरी; देशापुढे नवी ‘तरंगती’ समस्या, श्रीलंकेत आलेल्या चीनी जहाजाचा मागचं राजकारण...

ड्रॅगनची भारतात हेरगिरी; देशापुढे नवी ‘तरंगती’ समस्या, श्रीलंकेत आलेल्या चीनी जहाजाचा मागचं राजकारण...

googlenewsNext

गणेश देवकर
मुख्य उपसंपादक


आर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्यात चीनने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली. चीनची महत्त्वाकांक्षा उत्तरोत्तर वाढलेली आहे. शेजारच्या सर्वच देशांना चीनच्या वर्चस्ववादी आणि विस्तारवादी धोरणाची झळ बसली आहे. भारतासोबत गेल्या काही दिवसांपासून डोकलामच्या निमित्ताने संघर्ष सुरु आहे. सीमा भागात घुसखोरी, गावे वसवणे, मोठे रस्ते आणि पुलांची उभारणी आदी वर्तनामुळे भारताच्या मनात चीनबाबत संशय निर्माण झाला आहे. अशातच चीनने भारताची हेरगिरी करण्यासाठी अत्याधुनिक बनावटीचे स्पाय शिप श्रीलंकेत तैनात केल्याने भारतापुढे नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत.

भारताची चिंता का वाढली?   
- हंबनटोटा तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून ४५१ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारताने
या जहाजावर करडी नजर ठेवली आहे. 
- दक्षिणेतील भारताचे प्रमुख लष्करी व अण्वस्त्र तळ कल्पकम आणि कुडनकुलम हे जहाजाच्या ट्रॅकिंग रेंजमध्ये येतात. 
- केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील अनेक व्यापारी बंदरे याच्या रडारमध्ये येतात. संरक्षण तज्ज्ञांच्या मते भारताचे दक्षिणेतील नौदलाचे तळ आणि आण्विक तळांची हेरगिरी करण्यासाठीच चीनने हे जहाज जाणीवपूर्वक पाठवले आहे. 
- कर्जाच्या बोजामुळे लंका सध्या चीनच्या एकप्रकारे अधीन आहे. याचा फायदा घेत हिंदी महासागरात आपला दबदबा वाढावा, यासाठी चीन जोरदार प्रयत्न करीत आहे. 



शीतयुद्धकाळात वापर वाढला
- १९२० ते १९३० या कालखंडात अमेरिकेच्या वतीने गोल्ड स्टार या स्पाय शिपला जपान, चीन आणि फिलिपिन्स या देशांची हेरगिरी करण्यासाठी पाठवल्याचे आढळते. जपानच्या पर्ल हार्बरवर अणुबाॅम्बचा हल्ला करण्याआधी याच जहाजाने त्या परिसराची इत्यंभूत माहिती पुरविली होती.
- दुसऱ्या महायुद्धानंतर जग अमेरिका व रशिया या २ महासत्तांमध्ये विभागले गेले. या महासत्तांनी एकमेकांना सामर्थ्याची चुणूक दाखवून देण्याची, एकमेकांना जोखण्याची तसेच शह-काटशह देण्याची एकही संधी पुढच्या काळात सोडली नाही. हाच कालखंड शीतयुद्धाचा म्हणून संबोधला जातो. 
- या काळात एकमेकांच्या देशात गुप्तहेर पाठवून हेरगिरी करणे, माहिती चोरण्यासाठी धाडसी मोहिमा आखणे, महत्त्वाकांक्षी उपक्रम हाणून पाडण्यासाठी कट. कारस्थाने रचणे आदी प्रयत्न मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यासाठी स्पाय शिपचा वापरही होऊ लागला. 
- अण्वस्त्र चाचणी, क्षेपणास्त्र चाचणी, संहारक अस्त्राची चाचणी यावर लक्ष ठेवणे, हा हेरगिरीचा प्रमुख उद्देश असायचा. हेरगिरी 
करताना शत्रू देशांच्या व्यापारी तसेच मालवाहू जहाजांसोबत किनारपट्टी आणि महत्त्वाच्या बंदरांवर होणाऱ्या हालचालींच्या नोंदीही ठेवल्या जाऊ लागल्या. 

श्रीलंका हतबल  
जहाजाला इथे येण्यास चीनला परवानगी नाकारणे लंकेच्या हातात नव्हते. चीनकडून घेतलेल्या १.५ अरब डॉलरच्या कर्जाची परतफेड 
न केल्याने चीनने श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर ९९ वर्षांच्या लीजवर नियंत्रणात घेतले आहे. चीनने कोणतेही पाऊल उचलल्यास 
त्याविरोधात आवाज उठवता येईल, अशी स्थिती सध्या श्रीलंकेत नाही.  

नेमके काय आहे?
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संशोधन, माहिती संकलन, माहिती विश्लेषण, शत्रूदेशात हेरगिरी आदी विशेष हेतूने स्पाय शिप तयार केली जातात. याच हेतूने चीनने बनविलेले युआन वांग ५ हे स्पाय शिप मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल झाले. २२ ऑगस्टपर्यंत तिथेच थांबणार आहे. 

हे २९ सप्टेंबर २००७पासून चीनच्या सेवेत आहे. जियांगन शिपयार्डमध्ये याची बांधणी झाली. ५,२२२ मीटर लांब, २५.२ मीटर रुंद
वजनवाहक क्षमता: २५ हजार टन
- शक्तिशाली ट्रॅकिंग शिपवर उच्च क्षमतेचे रडार, पॅराबोलिक ट्रॅकिंग अँटेना तसेच अनेक प्रकारचे सेंसर्स आहेत. 
- ७५० किमी दूर अंतरावरील माहिती हे जहाज गोळा करु शकते. उपग्रह, रॉकेट, क्षेपणास्त्र यांची माहिती अचूकपणे गोळा करू शकते. 
- विशेष मोहिमा सुरु नसताना जहाजे चीन सरकारला अंतराळ संशोधन मोहीम, इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन, दूरसंचार सेवा व संशोधन आदी पातळ्यांवर महत्त्वाची माहिती गोळा करणे, नोंदी टिपणे ही मदत करते, अशी कामे करणाऱ्या विभागाला स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स असे म्हणतात. 

Web Title: Dragon espionage in India A new floating problem before the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.