उपहास ठीक, वृत्तवाहिन्यांचे कामही नाकारणार?

By admin | Published: May 1, 2015 12:13 AM2015-05-01T00:13:53+5:302015-05-01T00:13:53+5:30

वृत्तवाहिन्यांवर आरोप करणे आता नित्याचेच झाले आहे. काहींचा तर तो व्यवसायच झाला आहे.

Drama right, will the work of TV channels be rejected? | उपहास ठीक, वृत्तवाहिन्यांचे कामही नाकारणार?

उपहास ठीक, वृत्तवाहिन्यांचे कामही नाकारणार?

Next

वृत्तवाहिन्यांवर आरोप करणे आता नित्याचेच झाले आहे. काहींचा तर तो व्यवसायच झाला आहे. राजकारणी आमच्याविषयी अपशब्द वापरतात, सोशल मीडियात आमच्या विरोधात संतापाची लाट असते आणि माध्यमांचे हितकर्ते आमच्या वृत्तनिवेदकांना घृणास्पद रीतीने बघत असतात. खरं तर वृत्तवाहिन्यांसाठी हाच काळ चांगला आणि वाईटही आहे. आपण आताही बातमी सगळ्यात आधी देतो, पण आपली विश्वासार्र्हता कमी होत चालली आहे. गेल्या आठवड्यात आपण ज्या दोन बातम्या बघितल्या, त्यातली एक विद्रूप तर दुसरी चांगली होती.
खळबळजनक बातमी अल्पावधीत कशी सर्वदूर पसरते, हे गजेंद्रसिंहच्या आत्महत्त्येच्या वृत्तांकनातून सिद्ध झाले. संसदेच्या बाहेर ‘आप’ची भूसंपादन कायदा विरोधी सभा चालू असताना गजेंद्रसिंहने फास लावून आत्महत्त्या केली. पण या आत्महत्त्येनंतर आपमधून आलेल्या प्रतिक्रियांनी त्या पक्षाच्या नेत्यांचा उद्धटपणा आणि अपरिपक्वता उघड केली. पण मुळात जी बातमी दिली गेली, तिचे काय?
सत्य नेमके काय आहे याची पडताळणी न करताच या बातमीच्या दृश्यांमध्ये टीआरपी वाढवण्याची संधी शोधली गेली. शवविच्छेदन अहवाल येण्याच्या आधीच आत्महत्त्येच्या कारणाचा ऊहापोह केला गेला. गजेंद्रसिंह कोण, आत्महत्त्येमागील त्याचे कारण आणि प्रेरणा काय याच शोध घेण्याआधीच पटकन निष्कर्ष काढला गेला की, तोही एक कर्जबाजारी शेतकरी आहे. याचा अर्थ टीआरपीची स्पर्धा निरंकुश आणि सदोष वृत्तांकनाकडे घेऊन चालली आहे. हे सगळे एकतर सोशल मीडियाचे वा अन्य घटकांचे अनुकरण असावे. सध्या सोशल मीडियात ‘आप’कडून झालेला खून अग्रस्थानी आहे !
शेती व्यवसायातील प्रतिकूल परिस्थितीमुळे गेल्या दोन दशकात दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. एकट्या महाराष्ट्रातच या काळात ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. आणि चालू वर्षाच्या सुरु वातीपासून आत्तापर्यंत २५०हून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली आहे. मेगॅसेसे पुरस्कार विजेते पी.साईनाथ आणि इतर मोजके पत्रकार सोडले तर पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातील खूप थोड्या पत्रकारांनी या दाहक सत्याचा विविध अंगांनी ऊहापोह केला आहे. कदाचित नीमच किंवा बीड येथील अज्ञात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येमध्ये नाटकीय आशय नसेल, पण आता जेव्हा ही शोकांतिका संसदेच्या आवरापर्यंत येऊन पोहोचली आहे तेव्हा कुठे आपण आपली कुंभकर्णासारखी झोप सोडून या विषयाला प्राइम टाइमच्या कालावधीत जागा देत आहोत.
सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्येसुद्धा या संकटाच्या मुळाशी असलेल्या कारणांना खूप कमी वाव देण्यात येतो आहे. चर्चेत नेहमीच्याच पक्ष प्रवक्त्यांना बोलावले जाऊन गजेन्द्रच्या मृत्यूची चौकशी केली जाते आहे. या गोंधळानही बातमीची जागा घेतली आहे. रंजीस आलेले असंख्य पण अज्ञात शेतकरी आणि मजूर माध्यमांच्या नजरेतून कसे सुटत आहेत, याचेच हे द्योतक आहे. कामगारांचा असंतोष आणि शेतकऱ्यांच्या व्यथा यांना सहसा पहिल्या पानावर स्थान नसते. युरियाच्या वाढत्या किमतींमुळे देशातल्या काही भागात दंगली उसळल्या तेव्हा त्यात राष्ट्रीय स्तरावरील बातमीचे मूल्य दिसले नाही. कंत्राटी कामगार पद्धतीमुळे बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये कामगार कपात झाली, पण त्या कपातीला बातमीचे किंवा चर्चेचे स्थान लाभले नाही. फारच थोड्या वृत्तवाहिन्यांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये पूर्णवेळ कृषी आणि कामगार पत्रकार आहेत. पण मनोरंजन आणि जीवनशैली (लाइफस्टाइल)साठी भरमसाठ पत्रकार दिसतात. ‘पेज थ्री’ने आता पहिल्या पानाची जागा घेतली आहे तर शेतकरी आणि कामगार ‘दो बिघा जमीन’ वा ‘मदर इंडिया’ चित्रपटातील कृष्ण-धवल छायाचित्रांसारखे मागे पडले आहेत.
माध्यमांच्या उजळ बाजूचा विचार करता, नेपाळातील भूकंपाचे उदाहरण घेता येईल. या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि कित्येक बेघर झाले. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या नैसर्गिक आपत्तीचे वेगाने छायाचित्रण आणि वार्तांकन करून ते प्रसारित केले. या वेगवान प्रसारणामुळे केंद्र आणि राज्य सरकारे वेगाने कामाला लागली. वायुदलाने आणि सशस्र बलाने त्वरेने मदत कार्याला सुरुवात केली आणि तेवढ्याच वेगाने ‘एनजीओ’सुद्धा मदतीला धावल्या. मानवीमूल्यांनी भारलेल्या वृत्तांमुळे मदतीचा ओघ सर्व बाजूंनी सुरू झाला. काही क्षणातच शेजारी राष्ट्रातील आपत्ती राष्ट्रीय आपत्ती झाली. हेच आपण २०१३च्या ओडिशा आणि उत्तराखंडातील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी व मागील वर्षी काश्मीरमध्ये बघितले होते. आपत्तीमुळे घडलेल्या जीवित तसेच वित्तहानीच्या वृत्तांनी लोकांना परस्परांच्या अधिकच जवळ आणले. एकत्र बांधले होते.
गजेन्द्रसिंह प्रकरणात मात्र चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्यांची यंत्रणा कोलमडून पडली होती. १९९३ साली लातूर येथील भूकंपात १० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. खेडीच्या खेडी भुईसपाट झाली होती. त्या हानीची माहिती प्रसारित करण्यासाठी त्यावेळी सॅटेलाइट ‘ओबी’ वाहने नव्हती. आमच्या मुंबई कार्यालयातून हजारो मैलावरची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला अस्पष्ट आवाजाची दूरध्वनी यंत्रणा, टेलेक्स मशीन यांची मदत घ्यावी लागत होती. भूकंपाच्या तब्बल एक आठवड्यानंतर ती बातमी जागतिक स्तरावर प्रसारित झाली होती आणि आज त्यासाठी फक्त काही तास लागतात, त्यामागे मेहनत आहे अभियंते, व्हिडीयोग्राफर आणि आधुनिक यंत्रांनी सज्ज अशा प्रतिनिधींची.
नेपाळ भूकंपाच्या वार्तांकनातही काही असंवेदनशील प्रकार घडले. (जीवितहानी व वित्तहानीचे वृत्त एक्स्लुजीव्ह असू शकते?) तरीही एकूण वार्तांकन कौतुकास्पद होते. एक जोडपे ढिगाखाली अडकलेल्या मुलांसाठी शोक करत होते, या एका बातमीने तातडीने त्यांना मदतकार्य लाभण्यास मदत झाली होती.
ताजा कलम : काही वर्षांपूर्वी मी ‘पिपली लाईव्ह’ हा चित्रपट पाहिला होता. त्यात वृत्तवाहिन्यांचा उपहास करण्यात आला होता. चित्रपट बघून मला मुळीच हसू आले नव्हते. तेव्हा आणि आताही मी असा विचार करतो, की वृत्तवाहिन्यांचा उपहास करण्याने संकटाचे मूळ नाहीसे करता येईल? आणि जर बातमीला वृत्तवाहिन्यांनी मुरड घातली, तर ते चांगले होईल?

राजदीप सरदेसाई
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)

Web Title: Drama right, will the work of TV channels be rejected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.