चिनी प्रसारमाध्यमांमधून ड्रॅगनचे फुत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:46 PM2017-08-01T23:46:02+5:302017-08-02T14:23:20+5:30
पीपल्स लिबरेशन आर्मीचा ९०वा वर्धापनदिन चीनने एका भव्य लष्करी संचलनाने साजरा केला. अध्यक्ष शी झिनपिंग यांनी आपल्या लष्कराची कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा मुकाबला करायची तयारी आहे अशी गर्जना केली आहे.
- प्रा. दिलीप फडके
पीपल्स लिबरेशन आर्मीचा ९०वा वर्धापनदिन चीनने एका भव्य लष्करी संचलनाने साजरा केला. अध्यक्ष शी झिनपिंग यांनी आपल्या लष्कराची कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा मुकाबला करायची तयारी आहे अशी गर्जना केली आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचण्या, दक्षिण चिनी समुद्रामधला तणाव असे प्रश्न समोर असताना चीनने भारताबरोबरच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण केला आहे. भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणी चिनी सैनिकांच्या घुसखोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. केवळ अपघाताने किंवा अचानक घडलेल्या या घटना नाहीत. यामागे एक पद्धतशीर योजना आहे. चीनमधल्या प्रसारमाध्यमांमधून चिनी ड्रॅगनचे फुत्कार गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेले आहेत. ग्लोबल टाइम्समध्ये भारताला इशारे देणारे लेख गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने प्रकाशित होत आहेत. डोकलामशी भारताचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तो चीन आणि भूतान यांच्यामधला प्रश्न आहे. आपण भूतानचे रक्षणकर्ते आहोत असे भासवत भारताने या विषयात निष्कारण लक्ष घातले आहे असे सांगत सिलीगुडीच्या प्रदेशातून चीन आपल्यावर हल्ला करू शकतो असे भारताला वाटत असले तरी भारताचा खरा उद्देश भूतानवर कब्जा करण्याचा आहे. जसा सिक्कीम भारताने गिळंकृत केला तसेच भूतानवर भारताला ताबा मिळवायचा आहे असे सु तान आपल्या लेखात सांगत आहेत. चीन-भारत सीमेवर तणाव असूनदेखील चीनमधली जनता, विशेषत:
तरु णवर्ग खूप शांत आहे आणि चिनी नेटीझन्स आपल्या प्रतिक्रि या अतिशय संयत आणि शांतपणाने व्यक्त करीत आहेत अशी माहिती शी मिंग यांच्या लेखात सविस्तरपणाने वाचायला मिळते आहे. जगातले सर्वात मोठ्या दोन देशांमध्ये युध्द व्हावे आणि त्यातून आपला फायदा व्हावा अशी इतर काही देशांची इच्छा आहे पण आपण आपली फसगत करून घेता कामा नये. चीनने अलीकडच्या काळात भारतात प्रचंड गुंतवणूक केली आहे. युद्ध झाले तर त्यामुळे दोन्ही देशांच्या जनतेचे नुकसान होणार आहे. सामंजस्याने स्थिती हाताळण्यातच दोघांचे हित आहे असे तिथल्या जनतेचे मत असल्याचे शी मिंग यांच्या लेखातून सांगितलेले आहे. फुदन विद्यापीठाच्या अमेरिकन अध्ययन केंद्राचे प्रा. झांग झीयाडोंग यांनी केलेल्या विश्लेषणात पश्चिमी प्रसारमाध्यमे चीनबद्दलच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे भारताच्या बाजूला आहेत असे सांगितलेले आहे. एकीकडे हे सांगत असतानाच दुसरीकडे आपल्याला अमेरिका वा इतर देश मदत करतील हा भारताचा भ्रम आहे असे सांगत भारताच्या या तथाकथित गृहितकाची टिंगल करणारी व्यंगचित्रे ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित होत आहेत. एकूणच डोकलाम आणि भारताच्या सीमेवरच्या इतर भागात निर्माण होणाºया तणावाच्या परिस्थितीमध्ये चिनी सरकारचे अधिकृत मुखपत्र असणाºया ग्लोबल टाइम्समध्ये चीनच्या सरकारच्या धोरणाला पूरक असा लेख आणि वार्तापत्रे मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत आहेत. याच वृत्तपत्रात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीवरचा यांग शेंग यांचा लेखदेखील प्रकाशित झालेला आहे. पश्चिम चायना नॉर्मल विद्यापीठामधले भारतावरचे तज्ज्ञ लॉंग शिंगचुंग यांनी तर वेगळाच तर्क मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चीनची भीती दाखवण्यामुळे भारताच्या नेत्यांचा फायदा होणार आहे म्हणून चीनचा खोटाच बागुलबुवा उभा केला जातो आहे. असे केल्यामुळे भारतामधल्या सत्ताधाºयांना अधिक मते मिळवता येतात, लष्करातल्या अधिकारी वर्गाला लष्करीखर्चाचे अंदाजपत्रक वाढवून घेता येते, प्रसारमाध्यमांना आणि लेखकांना काही सनसनाटी व लोकिप्रय विषय मिळत असतात. पण जास्त मोठ्या प्रमाणात चीनविरोधी वातावरण निर्मिती झाली तर मात्र ही युद्धाची भीती खरी ठरू शकेल आणि मग भारतातल्या मान्यवर लोकांची पंचाईत होईल असे सांगायला शिंगचुंग कमी करीत नाहीत. जगामधल्या इतर देशांमधल्या लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भारतामधले काही राजकीय नेते बेजबाबदार वक्तव्ये करीत असून त्यामुळे तणाव वाढतो आहे असा पीपल्सडेलीने आरोप केला आहे. या उलट चिनी नेत्यांनी या विषयावर अतिशय संयमी भूमिका घेतल्याचे सांगून सीमेवरचा हा तणाव चांगला नाही आणि सप्टेंबरमध्ये असणाºया ब्रिक्सच्या शिखर परिषदेच्या अगोदरपर्यंत तो निवळणे आवश्यक आहे असे शांघाय अकादमी आॅफ सोशल सायन्सचे हु झीयोंग यांनी म्हटल्याचेदेखील पीपल्सडेलीने सांगितलेले आहे. चीन-भारत युद्धामुळे कुणाचा लाभ होणार आहे असा प्रश्न विचारून दुसºया एका लेखात शिंगचुंग सांगतात की आशियामधल्या कुणाचाही या युद्धामुळे फायदा होणार नाही. दोन्ही देशांना या युद्धाची जबर किंमत मोजावी लागेल. जपान आणि अमेरिकेसारखे देशदेखील मोठ्याप्रमाणावर चीनच्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. पश्चिमेसह जगातल्या बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर या युद्धाचे प्रतिकूल परिणाम होतील. हे युद्ध झालेच तर त्याचा फायदा अल्पदृष्टी असणाºया, संधिसाधू राजकारण करणाºया आणि ज्यांना लोकांचे भले होण्यात काडीचाही रस नाही अशा केवळ काही राजकीय नेत्यांना होईल, पण त्यामुळे संपन्न आशियाचे स्वप्न विरून जाईल असे त्यांनी म्हटले आहे. हे सारे सांगत असतानाच दुसºया बाजूने चीनने आपल्या लष्करी सामर्थ्याचे दिमाखदार प्रदर्शन केले आहे. हे करतानाच आपले लष्कर शांतताप्रिय आहे आणि चीन ही जगातली एक सकारात्मक आणि विधायक शक्ती आहे असेदेखील शी झिनपिंग सांगत आहेत. चीनच्या प्रसारमाध्यमांमध्ये कधी नव्हे इतकी भारताची आणि डोकलामच्या संदर्भातल्या भारताच्या भूमिकेची तसेच त्यामुळे निर्माण होत असलेल्या तणावाची चर्चा आहे. जगातल्या इतर देशांमधल्या महत्त्वाच्या प्रसारमाध्यमांमध्येदेखील या विषयाची चर्चा होते आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये स्टीव्हन ली मेअर, एलन बेरी आणि मॅक्स फिशर यांचा लेख प्रकाशित झालेला आहे. त्यात चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पाला भारताने केलेला विरोध आणि त्या विरोधाचा झालेला परिणाम तसेच मोदींनी आपल्या भूमिकेला डोनाल्ड ट्रम्प यांचा मिळवलेला पाठिंबा तसेच चीनच्या धमकावण्यांकडे केलेले दुर्लक्ष ही देखील सध्याचा तणाव वाढण्यामागची कारणे असल्याचे सांगितले आहे. आपण कमकुवत नाही हे चीनच्या समोर ठामपणाने उभे राहत भारताने भूतानला आणि जगाला दाखवले आहे. यामुळे आपल्यावर अवलंबून असणाºया इतर देशांना आपण साहाय्य करू शकतो असा विश्वास निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न भारताने केला आहे, याची दखल देखील त्याने घेतली आहे. चीनमध्ये शी झिनपिंग यांना दुसरा कार्यकाळ मिळणार असून आपले नेतृत्व अधिक प्रभावी आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात ते असण्याची शक्यता आहे असेही न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलेले आहे. त्यामुळेच अगदी लगेचच हा तणाव संपेल असे संभवत नाही असा अंदाजदेखील टाइम्सने वर्तवलेला आहे.
-प्रा. दिलीप फडके
(ज्येष्ठ विश्लेषक)