लालफितीतील यंत्रणेमुळे रस्त्यावर वाहतोय मृत्यू......!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 10:06 PM2018-10-06T22:06:11+5:302018-10-06T22:07:59+5:30
‘वेन्सडे’ नावाच्या चित्रपटात नसिरुद्दीन शहा म्हणतो, आसला पोहोचल्यावर पत्नी दोन तीन वेळा फोन करते. जेवण झाले का? चहा पिला का? असे विचारत राहते. खरे तर तिला जाणून घ्यायचे असते की जिवंत राहिला आहे ना?
- विजय बाविस्कर -
रिक्षातून जाताना अचानक रस्त्याच्या कडेचे होर्डींग कोसळते आणि चार जणांचा बळी जातो, वाहतुकीचे सगळे नियम पाळून रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर उभे असलेल्या एका कुटुंबाला काळ बनून आलेली मोटार धडकून जाते, एक्सप्रेस वे वरून मस्तीत जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन काळाचा घाला पडतो तर कधी कधी रस्त्यावरून जाताना काहीही चूक नसताना एखादे भरधाव वाहन ठोकरून जाते. रस्त्यावरून जणू मृत्यू वाहतोय. सुखरुप घरी पोहोचणारे जणू नशीबवान ठरतात.
‘वेन्सडे’ नावाच्या चित्रपटात नसिरुद्दीन शहा म्हणतो, आसला पोहोचल्यावर पत्नी दोन तीन वेळा फोन करते. जेवण झाले का? चहा पिला का? असे विचारत राहते. खरे तर तिला जाणून घ्यायचे असते की जिवंत राहिला आहे ना? बॉबस्फोटाच्या संदर्भातील धास्ती त्यांना सांगायची आहे. परंतु, मृत्यू येण्यासाठी बॉँबस्फोटासारखचे कारण असू शकत नाही. उलट गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिल्यावर दहशतवादी घटनांपेक्षा रस्त्यावरील अपघातांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अनेक पटींनी जास्त आहे. मात्र, याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. एखादा अपघात घडल्यावर चर्चा होते. मात्र, कायमस्वरुपी उपाययोजना केल्या जात नाहीत.
पुण्यातील होर्डींग कोसळल्याच्या घटनेबाबतही आता आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. चूक रेल्वेची की महापालिकेची याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, केवळ या एका घटनेकडे पाहून चालणार नाही. मध्य रेल्वे प्रशासनाने यासाठी जाहिरात एजन्सीला दोषी ठरवले आहे. परंतु, ज्या जाहिरात कंपनीकडे या होर्डिंगचा ठेका होता. त्यांनी मात्र या दुर्घटनेसाठी मध्य रेल्वेच दोषी असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी यापूर्वी मध्य रेल्वेशी हे होर्डिंग काढण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती पुरावा म्हणून सादर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, या प्रकारातून मध्य रेल्वे प्रशासनाची अनास्थाही समोर आली आहे.
ठेकेदारी हा शब्द बदनाम होण्यामागे या प्रकारच्या घटना कारणीभूत ठरतात. रेल्वे प्रशासनाने होर्डिंग काढण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याचा दावा जाहिरात कंपनीने केला आहे. या ठिकाणचे होर्डिंग काढण्याचे काम आॅगस्ट महिन्यांपासून सुरू करण्यात आले होते. होर्डिंगला आधारासाठी लावण्यात आलेले लोखंडी अँगल ६ आॅगस्टला कापण्यात आले. त्यामुळे हा सांगाडा कमकुवत झाला होता. त्यातच या ठिकाणी असलेली संरक्षित भिंत खोदण्यात आली होती. त्यामुळे होर्डिंगचा पाया अत्यंत कमकुवत झाल्याने हा अपघात झाल्याचा दावा या कंपनीने केला आहे. यापैैकी खरे काय मानायचे?
यंत्रणांचा एकमेकांशी समन्वयच नसल्याचे हे केवळ पहिले प्रकरण आहे, असे नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कालवाफुटी दुर्घटनेतही हेच घडले. महापालिका जलसंपदा विभागाकडे बोट दाखविते. जलसंपदा आपली जबाबदारी उंदीर, घुशींवर ढकलते, हे चित्र पुणेकरांनी पाहिले.मुळात नागरिकांचे जीवनमान सुखासिन ठेवणे हे सगळ्या शासकीय यंत्रणांचे काम. त्यासाठी जिल्हाधिकारी- महापालिका आयुक्त- पोलीस आयुक्त हे वरिष्ठ अधिकारी आहेत. परंतु, या अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या किती बैठका होतात? राजकीय पातळीवरही हेच चित्र दिसून येते. आरोप- प्रत्यारोपाच्या फैैरी झडतात. परंतु, मुळ प्रश्नांकडे दूर्लक्ष होते. रेल्वे दुर्घटनेतील होर्डींगवरच आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर जवळपास सर्व राजकीय पक्षांच्या जाहिरती कधी ना कधी लावल्या गेल्या असतील.
कोसळलेल्या होर्डिंगवर अधिकृतपणे जाहिराती लावण्याचा ठेका १९ जानेवारीपर्यंत होता. त्यानंतर एकही जाहिरात या होर्डिंगवर झळकली नाही, असे रेल्वे अधिकारी ठामपणे सांगतात. पण होर्डिंग काढण्याच्या काही दिवस आधीपर्यंत त्यावर विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम, नेत्यांचे वाढदिवस, कार्यक्रमांच्या जाहीराती उघडपणे लावल्या जात होत्या. पण एवढ्या मोठ्या होर्डिंगवर लावलेले फलक दिसत नसल्याचा आव अधिकारी आणत आहेत. यावरून रेल्वेतील अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे हितसंबंध समोर येतात. रेल्वेप्रमाणेच असा आव आणणारे अधिकारी शासनाच्या सर्वच यंत्रणांमध्ये आहे. ती त्यांच्यापध्दतीने राजरोसपणे काम करतच असते. सत्ता कोणाचीही असो, या लालफितीतील यंत्रणेमुळे मात्र जीव जातात ते सर्वसामान्यांचे.