देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात काय जादू केली?; महाजन व मुंडे यांच्यापेक्षाही दोन पावले पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 07:39 AM2022-03-15T07:39:31+5:302022-03-15T07:39:44+5:30

फडणवीस यांनी गोव्यातील बंडकऱ्यांना तर शांत केलेच, पण विरोधी पक्षांची मते विभागली जातील याचीही काळजी घेतली. त्याचा भाजपला फायदा झाला.

Due to various plans of Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis, BJP was able to win in Goa | देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात काय जादू केली?; महाजन व मुंडे यांच्यापेक्षाही दोन पावले पुढे

देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात काय जादू केली?; महाजन व मुंडे यांच्यापेक्षाही दोन पावले पुढे

Next

- सद्गुरू पाटील

मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्याकडे अनेक नेते आहेत, मग तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक नेत्याला कसे सांभाळणार, असा प्रश्न मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या एका गोवा भेटीवेळी विचारला होता. त्यावेळी गोवा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नव्हती; पण पूर्वतयारीसाठी फडणवीस आले होते. मात्र, गोव्यातील भाजपमधील कुरबुरींची, मंत्र्यांमधील स्पर्धेची आणि समाजाच्या काही घटकांमध्ये सरकारविषयी असलेल्या कडवट भावनेची फडणवीस यांना कल्पना होती. आम्ही निवडणुकीला सामोरे जाताना गोमंतकीयांसमोर युनायटेड लीडरशिप ठेवू, असे उत्तर फडणवीस यांनी दिले होते. फडणवीस यांनी आपले तेच सूत्र मग निवडणूक प्रचाराच्या पूर्ण काळात वापरले. 

प्रमोद सावंत हे जरी मुख्यमंत्रीपदी होते तरी फडणवीस यांनी स्वत: व्यासपीठावरून कधीच सावंत हेच यापुढेही मुख्यमंत्री होतील असे ठासून सांगितले नाही. सध्या मुख्यमंत्रिपदी सावंत असल्याने आम्ही सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय असे खासगीत फडणवीस पत्रकारांना सांगायचे. एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर फडणवीस हे एक महिना गोव्यात तळ ठोकून होते. भाजपच्या पूर्ण निवडणूक रणनीतीचे व्यवस्थापन फडणवीस यांनी केले. एक काळ असा होता, १९९० च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन व स्व. गोपीनाथ मुंडे हे गोव्यात भाजपची निवडणूक रणनीती ठरवायचे. त्यांचा प्रभाव त्यावेळी गोवा भाजपाच्या कामावर असायचा. यावेळी फडणवीस यांनी तीच जबाबदारी पार पाडली, पण फडणवीस यांनी महाजन व मुंडे यांच्यापेक्षाही दोन पावले पुढे टाकली. 

यावेळी जे छोटे पक्ष भाजपाच्या विरोधात लढले, त्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी व अपक्षांशी फडणवीस यांनी स्वत:चे व्यक्तिगत संबंध ठेवले होते. निवडणूक निकालानंतर भाजपाला जेव्हा या छोट्या पक्षांची व अपक्षांची गरज पडेल तेव्हा ते आपल्या संबंधांमुळे भाजपासोबत येतील व मग भाजपाची आरामात सत्ता स्थापन होईल हे फडणवीस यांचे गणित होते. हे गणित कामी आले. यावेळी निवडणूक निकाल लागला व भाजपाला एक जागा कमी पडली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने लगेच पाठिंब्याचे पत्र भाजपाला दिले, तसेच तिघा नव्या अपक्ष आमदारांनीही पाठिंब्याची हमी दिली.

भाजपाने स्वबळावर निवडणुका लढविल्या तरी, भाजपाला यावेळी गोव्यात एकूण ३ लाख १६ हजार मते मिळाली. फडणवीस यांच्या रणनीतीला व मुत्सद्देगिरीला याचे श्रेय जाते. विरोधी काँग्रेसची मते तीन-चार पक्षांमध्ये फुटतील, विभागून जातील याची काळजी फडणवीस यांनी घेतली. रिव्होल्युशनरी गोवन्स या संघटनेने काँग्रेसची मते फोडली. यामुळे दहा मतदारसंघांमध्ये तरी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. शिवाय आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनीही काँग्रेसचीच मते फोडली. 

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन उमेदवार तरी, फडणवीस यांच्याच शिफारशीवरून मिळाले. उदाहरणार्थ फिलिप नेरी रॉड्रीग्ज. फिलिप नेरी हे गोव्यातील भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, त्यांचा वेळ्ळी हा पूर्णपणे ख्रिस्तीबहुल मतदासंघ आहे. तिथे भाजपाच्या तिकिटावर फिलिप नेरी जिंकू शकत नसल्याने फडणवीस यांनीच नेरी यांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट घ्या, असा सल्ला दिला.  मुख्यमंत्रिपदासाठी भाजपामध्ये विश्वजित राणे, बाबू कवळेकर, माविन गुदिन्हो असे काही नेते इच्छुक होते. त्यामुळे निवडणूक प्रचार काळात फडणवीस यांनी युनायटेड नेतृत्वावर भर दिला. जे नेते आपल्याला पक्षात महत्त्व मिळत नाही अशी तक्रार करीत होते, त्यांची समजूत फडणवीस यांनी काढली. 

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंड करू नये म्हणूनही फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, उत्पल यांनी फडणवीस यांचे म्हणणे ऐकले नाही. उत्पलने बंड केले व निवडणुकीत उत्पलचा पराभव झाला. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही बंड करू नये म्हणून फडणवीस यांनी गळ घातली होती, पार्सेकर यांनीही फडणवीस यांचे प्रस्ताव फेटाळले. पार्सेकर निवडणुकीत पराभूत झाले. 

प्रमोद महाजन यांच्यानंतर फडणवीस हे अल्पावधीत गोव्यात लोकप्रिय बनले हे नमूद करावे लागेल. ममता बॅनर्जींच्या पक्षाची म्हणजे तृणमूल काँग्रेसची सगळी रणनीती प्रशांत किशोर ठरवत होते, त्या रणनीतीला फडणवीस तंत्राने शह दिला. तृणमूल एकही जागा गोव्यात जिंकू शकला नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे गोव्यातील यश मर्यादित राहील याचीही काळजी फडणवीस यांनी घेतली. आप केवळ दोन जागा जिंकला. फडणवीस तंत्रासमोर शिवसेना नेते संजय राऊत यांची डाळ किंचित देखील शिजू शकली नाही, हेही नमूद करावे लागेल..

Web Title: Due to various plans of Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis, BJP was able to win in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.