दुटप्पी पाकिस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:00 AM2019-02-28T06:00:13+5:302019-02-28T06:00:21+5:30

भारतीय विमानांना २१ मिनिटांत पाककडून काहीच प्रतिकार झाला नाही. पाकिस्तानी लष्कर व वायुदलातील शैथिल्य त्यातून समोर आले. ही बाब अतिशय लाजिरवाणी असल्याने पाकिस्तानी लष्कर व वायुदल काहीतरी चमकदार कृती तातडीने करण्याची धडपड करीत आहे.

Duppi Pakistan | दुटप्पी पाकिस्तान

दुटप्पी पाकिस्तान

Next

बालाकोटच्या प्रतिहल्ल्यांनतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. भारतानेही सर्वत्र अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत. विशेषत: पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील सर्व नागरी हवाईसेवा पुढील काही तासांसाठी बंद केल्या आहेत. यावरूनच सीमेवरील आकाशात केवढा प्रचंड तणाव आहे, याची कल्पना येते. बुधवारी दोन्ही देशांकडून परस्परांची विमाने पाडल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने काश्मीर व पंजाबच्या आकाशात अचानक हालचाली सुरू केल्या.

भारताचे विमान पाडल्याचा व दोन भारतीय वैमानिकांना पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला. त्याची चित्रेही व्हायरल केली. ही चित्रे मुळात कर्नाटकमध्ये २0१६ मध्ये कोसळलेल्या मिग विमानाची होती, असे इंडिया टुडेने दाखवून दिले. पाकिस्तानने व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये कन्नड भाषेत झालेले संभाषण ऐकू येते. मात्र, पाकिस्तानच्या दाव्याचा स्पष्ट इन्कार भारताने केलेला नाही. भारतीय हद्दीत घुसून हल्ला केल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. मात्र, नागरी वस्त्यांवर हल्ला केला नाही, असेही म्हटले आहे. उलट आपले सर्व पायलट सुरक्षित असल्याचे वायुदलातील सूत्रांनी म्हटले आहे, तसेच बडगाम भागात पडलेल्या हेलिकॉप्टरमागे तांत्रिक कारण होते, पाकिस्तानचा मारा नव्हे, असा खुलासा केला आहे. भारताने पाकिस्तानचे एफ-१६ विमान जमीनदोस्त केले. याच कारवाईदरम्यान भारताचे एक विमान कोसळले, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. अर्थात, पाकिस्तान प्रतिहल्ला करणार हे निश्चित व त्यामध्ये भारताचे नुकसानही होऊ शकते. भारताने हवाई हल्ला केला, तेव्हाच ही बाब स्पष्ट झाली होती, परंतु पाकिस्तान इतक्या लवकर सक्रिय होण्याचे कारण समजून घेतले पाहिजे. पाकिस्तान सरकार व लष्कर यांना आपल्या नागरिकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काहीतरी तातडीने करून दाखविणे गरजेचे आहे. भारताचा हवाई हल्ला ही पाकिस्तान लष्करासाठी फार मोठी नाचक्की होती.

पाकिस्तानसाठी चिंतेची बाब म्हणजे, भारतीय विमानांना २१ मिनिटांत पाकिस्तानकडून काहीच प्रतिकार झाला नाही. पाकिस्तानी लष्कर व वायुदलातील शैथिल्य त्यातून समोर आल्याने पाकिस्तानी लष्कर व वायुदल काहीतरी चमकदार कृती तातडीने करण्याची धडपड करीत आहे. याचबरोबर, भारताबरोबरचा संघर्ष तातडीने आंतरराष्ट्रीय स्तरावर जावा आणि आणखी हल्ले किंवा सर्जिकल स्ट्राइक करण्यापासून भारताला रोखण्यासाठी जगातील महासत्तांनी लगेच हस्तक्षेप करावा, ही पाकिस्तानची इच्छा आहे. कारण भारताने खरोखर युद्ध पुकारले, तर पाकिस्तानी लष्कर काही काळ कडवा प्रतिकार करेल वा भारताचे मोठे नुकसानही करेल, परंतु हे काही दिवसच चालू शकेल. पाकिस्तानची सध्याची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. पाकिस्तान लहान तिखट हल्ले करू शकतो वा दहशतवाद्यांना हाताशी धरून आणखी हल्ले करू शकतो, परंतु सर्वंकष युद्ध करण्यासाठी लागणारा पैसा सध्या पाकिस्तानकडे नाही. युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप हवा आहे. त्यासाठी वातावरण तापले पाहिजे. हे केवळ दोन देशांमधील युद्ध नसून, दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील युद्ध आहे, हे पाकिस्तानला जगाच्या लक्षात आणून द्यायचे आहे. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप झाला, तर पाकिस्तानला युद्धापासून स्वत:ला वाचविता येईल आणि भारतालाही चाप बसविता येईल. या उद्देशानेच पाकिस्तान तातडीने हल्ले करीत आहे. त्याला जगाचे लक्ष वेधून घ्यायचे आहे आणि इस्लामिक राष्ट्रांमध्येही भारताबद्दल मत कलुषित करायचे आहे.

पाकिस्तानने तत्परतेने केलेल्या आजच्या प्रतिहल्ल्यामागे ही योजना आहे. एकीकडे हल्ले सुरू ठेवायचे आणि त्या वेळी शांततेची बोलणी करण्यासाठी आमंत्रण द्यावयाचे, अशी दुटप्पी खेळी पाकिस्तान खेळत आहे. युद्धात दोन्ही देशांचे नुकसान होणार यात शंका नाही, परंतु गेली कित्येक दशके चिघळलेला काश्मीरचा प्रश्न या तातडीच्या चर्चेतून सुटणार का, हा प्रश्न कायम राहतोच. सध्या तणाव उच्च कोटीवर पोहोचला आहे. भारतीयांच्या भावनाही तीव्र आहेत. त्यामुळे इम्रानच्या शांततेच्या आमंत्रणाला भारत भीक घालणार नाही, असे तूर्त चित्र आहे. भारताच्या भूमिकेवरच पुढील स्थिती अवलंबून राहणार, यात शंका नाही.

Web Title: Duppi Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.