निर्नायकी विद्रोह
By admin | Published: October 12, 2016 07:25 AM2016-10-12T07:25:27+5:302016-10-12T07:25:27+5:30
लोकशाहीमधील व्यवस्था कोणतीही असो, तिच्या विरोधात संघर्ष करणे वा अगदी विद्रोह आणि द्रोहदेखील करणे लोकशाही शासन व्यवस्था आपल्या नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्याचे जे अधिकार बहाल करते
लोकशाहीमधील व्यवस्था कोणतीही असो, तिच्या विरोधात संघर्ष करणे वा अगदी विद्रोह आणि द्रोहदेखील करणे लोकशाही शासन व्यवस्था आपल्या नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्याचे जे अधिकार बहाल करते, त्यात एकप्रकारे अनुस्यूतच असते. पण अशा संघर्षाचा किंवा विद्रोहाचा कुणी नायक असावा लागतो आणि जेव्हां तो उपलब्ध असतो तेव्हां त्याच्याशी किंवा त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढणे सुलभ जात असते. सामान्यत: व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष तिच्यातील दोषांचे निर्मूलन व्हावे हाच असतो, किंवा असावा लागतो. पण जेव्हां विद्रोह निर्नायकी असतो तेव्हां कशी गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण होते तिचा अनुभव संपूर्ण नाशिक जिल्ह्याने सलग दोन दिवस घेतला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव-अंजनेरी गावातील एका अजाण बालिकेवर झालेला शारीरिक अत्याचार सभ्य समाजाला लाज आणणारा होता यात वाद नाही आणि तो घडून गेल्यानंतर लोकांची तीव्र प्रतिक्रिया उमटणे हेदेखील अनैसर्गिक नाही. अशा जहाल प्रतिक्रियेचा रोख स्वाभाविकच शासन व्यवस्थेच्या विरोधातला असतो. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीचे ऐकूनच घ्यायचे नाही हेदेखील संतप्त जमावाच्या विशिष्ट मानसिकतेला धरुन असते असेही मान्य करता येईल. पण शनिवार रात्रीपासून ठिकठिकाणी ज्या विद्रोहाचे दर्शन घडत होते, तो शांत करण्यासाठी गेलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचे आणि केवळ तितकेच नव्हे तर विविध सामाजिक तसेच ज्ञाती संस्थांच्या नेत्यांचेही ऐकून घ्यायला जमाव तयार होत नव्हता. उलट त्यांच्यावरही आपला संताप व्यक्त करीत होता. असा निर्नायकी जमाव लोकशाहीसमोरील किती मोठा धोका ठरु शकतो, याचेच दर्शन त्यातून घडले. त्याची उकल करताना महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जे शांततापूर्ण मोर्चे निघत आहेत त्यांना बदनाम करण्यासाठीच हे सारे कोणीतरी जाणीवपूर्वक करीत आहे, असे अनुमान काढणे हा फारच बाळबोधपणा झाला.