दत्ता ऊर्फ अप्पा गांधी: ब्रिटिश ट्रेझरीवर तिरंगा फडविण्यासाठी ‘सावित्री’च्या महापुरात उडी !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 06:45 AM2022-08-30T06:45:16+5:302022-08-30T06:46:14+5:30

Dutta aka Appa Gandhi: ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात प्राण पणाला लावून झगडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कहाण्या

Dutta aka Appa Gandhi: Jump into the deluge of 'Savitri' to hoist the tricolor on the British Treasury! | दत्ता ऊर्फ अप्पा गांधी: ब्रिटिश ट्रेझरीवर तिरंगा फडविण्यासाठी ‘सावित्री’च्या महापुरात उडी !

दत्ता ऊर्फ अप्पा गांधी: ब्रिटिश ट्रेझरीवर तिरंगा फडविण्यासाठी ‘सावित्री’च्या महापुरात उडी !

Next

- माधवी पाटील
(उपसंपादक, लोकमत, मुंबई
वयाची शंभरी गाठलेले विलेपार्ल्याचे दत्ता गांधी आजही खणखणीतपणे सांगतात नव्या पिढीला प्रेरक असा १९४२च्या भारत छोडो आंदोलनातील मंतरलेल्या दिवसांचा इतिहास! स्वातंत्र्य लढ्याच्या त्या धगधगत्या पर्वाच्या आठवणीत शिरलेल्या अप्पांना अजूनही लख्खपणे आठवते ती ९ ऑगस्ट १९४२ ची तुफान पावसाची रात्र !... 
पुराने बेफाम वाहणाऱ्या सावित्रीच्या काठावरील महाडची निद्रिस्त बाजारपेठ!  मामांच्या घरी झोपलेल्या दत्तूला त्याच्या राष्ट्रसेवा दलातील मित्राची कमलाकर दांडेकरची हाक ऐकू आली. त्याने अप्पांना घराबाहेर काढले. आठ तारखेला गांधीजींनी ब्रिटिशांना निर्वाणीचा इशारा दिला होता, भारत छोडो! त्यांच्या ‘करेंगे या मरेंगे!’ या शब्दांनी लाखो तरुणांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवले होते. त्यापैकीच एक होते पोलादपूरला १५ मे १९२३ ला जन्मलेले अप्पा ऊर्फ दत्तात्रेय गोपीनाथ गांधी. महाडमध्ये मामांकडे शिकायला राहिलेल्या अप्पांनी कमलाकर व अन्य दोस्तांच्या मदतीने शाळा सकाळीच बंद पाडली होती. देशभर मोठ्या नेत्यांची धरपकड झाली होती. 
इकडे  महाडमध्ये नाना पुरोहितांच्या गोटात काही कट शिजत होता. पोलीस फाटा वाढेल, हे समजताच रणनीती आखण्याच्या विचारात अप्पा होते; पण कमलाकरचे रक्त उसळत होते. ‘आपण पल्याडच्या काठावरील ब्रिटिश ट्रेजरीवर तिरंगा लावायचा,’ - कमलाकर म्हणाला, पण पोलिसांचा कडक पहारा होता. दोघांच्या अंगात रग आणि मनात स्वातंत्र्याची धग होती. त्यातूनच त्यांनी पुरात उड्या घेतल्या! दुथडी भरून वाहणाऱ्या सावित्रीच्या प्रवाहात उलट दिशेने पोहत पाच मिनिटांच्या अंतरावरील पैलतीर गाठायला पाऊण तास लागला. पोलिसांची नजर चुकवून मोठ्या शिताफीने त्यांनी ट्रेझरीची पिछाडी गाठली. कमलाकरने चपळाईने वर चढत कौलांच्या बेचक्यात मध्यरात्री तिरंगा रोवला. 
‘वंदे मातरम्’चा नारा पावसात विरतो तोच दोघांनी सावित्रीच्या पाण्यात परत सूर मारला. वेगाने अंतर कापत दोघे ऐलतीरावरील जाखमातेच्या मंदिरात पोहोचले. कमलाकरने चटदिशी खिशातून चाकू काढला आणि करंगळीवर मारला. रक्ताची चिळकांडी उडाली. त्याच रक्ताने दोघांनी कागदावर प्रतिज्ञा लिहिली, ‘देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही.’ 
- त्याच रात्री अप्पांनी मामींना चिठ्ठी लिहिली आणि माणगावजवळील खरवली गाव गाठलं. मोठे बंधू शंकर भाईंच्या भूमिगत गटात ते सामील झाले. अप्पांचे वडील पोलादपुरातील काँग्रेसचे नेते  आणि मोठे बंधू शंकरभाई मिठाचा सत्याग्रह करून दंडाबेडीचा कारावास भोगून आले होते. महाडमध्ये एका सभेत डॉ. आंबेडकरांनी ‘खूप वाच म्हणजे दलितांचे प्रश्न तुला कळतील,’ असे सांगितले होते.
१० सप्टेंबरला महाडला नानासाहेब पुरोहित मोर्चा काढणार होते, तिथे पोलिसांची कुमक पोहोचणार नाही, यासाठी पेण व माणगावपुढील महाडचा रस्ता अडवायचा होता. त्यांनी झाडे, तारायंत्राच्या तारा तोडल्या. घोड नदीचा पूल तोडण्यासाठी रस्त्याचे चिरे उखडताना नेमका विंचू हाताला डसला; पण भाईंच्या साथीदाराने दंश झालेल्या जागेच्या बरोबर वरती कोयत्याचा वार करून रक्त वाहू दिले. करकचून दोरखंड बांधला. अंगात ताप भरला होता. अप्पा तिथेच ग्लानी येऊन पडले. मोर्चा फसला. दुसऱ्या दिवशी महाडला चौकशी केली, तर कळले की, मांढरे फौजदाराने केलेल्या गोळीबारात अप्पांचे प्रिय मित्र कमलाकर दांडेकर शहीद झाले. 
विसापूरचा तुरुंगवास खडतर होता. ब्रिटिश जेलर क्रूर. अन्नात अळी, भाजीत गवत नाहीतर पाला ही नित्याची बाब. भूक हडताल होत असत. त्यावर वाट्याला येई लाठीचार्ज; पण तुरुंगात बौद्धिके होत. अप्पा तब्बल १९४ पुस्तके  वाचू शकले. 
जेलमधून सुटल्यावर अप्पा मेट्रिक तर झाले; पण अच्युतराव पटवर्धन यांनी त्यांना स. प. महाविद्यालयात जाऊन पुढे वकील बनण्याआधी कुलाबा जिल्ह्यात राष्ट्र सेवा दलाचा सर्व वेळ सेवक म्हणून काम करण्यास सांगितले.  १९४४ साली  गांधीजींना भेटण्याचा योग आला. त्यांचा संदेश शिरसावंद्य मानत अप्पांनी गावोगावी कार्य केले. सरदार वल्लभभाईंनी सांगितल्यानुसार सत्याग्रही झाले. 
१९४९ मध्ये साने गुरुजींनी स्वतः अप्पांचा अर्ज भरून त्यांना दादरच्या छबिलदास शाळेत शिक्षक म्हणून रुजू करून घेतले. १९५२ मध्ये ते किशोरी पुरंदरे ऊर्फ आशा गांधी यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्याही राष्ट्र सेवा दलाच्या  कार्यकर्त्या. वंचित समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी विविध संस्थांना गांधी दाम्पत्याने स्वत:च्या भरघोस रकमेसह नेटाने देणग्या मिळवून ९६.५ लाख रुपये गोळा करून दिले. 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अप्पांनाही स्वातंत्र्यसैनिकाचे पेन्शन व इतर लाभ मिळाले असते. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढा देणे हे माझे कर्तव्यच होते, असे म्हणत त्यांनी पेन्शन व ताम्रपटही नाकारला.

Web Title: Dutta aka Appa Gandhi: Jump into the deluge of 'Savitri' to hoist the tricolor on the British Treasury!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई