संपादकीय - शेअर बाजारात कमाई केली ना? - आता जरा थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:10 AM2022-04-01T06:10:02+5:302022-04-01T06:11:25+5:30

गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षात सहज पैसा कमावला. पण ‘जानकारी’ नसेल त्यांनी सध्या बाजारापासून दूर राहावे किंवा गुंतवणूक सल्लागारांची मदत घ्यावी हे बरे.

Earned in the stock market? - Wait a minute! | संपादकीय - शेअर बाजारात कमाई केली ना? - आता जरा थांबा!

संपादकीय - शेअर बाजारात कमाई केली ना? - आता जरा थांबा!

Next

केतन गोरानिया

कोविडनंतरच्या काळात भारतीय शेअर बाजारात नवे गुंतवणूकदार उतरले. बाजाराच्या इतिहासात गेल्या ३० वर्षांत हे असे प्रथमच घडले. मार्च २०२०पासून २२ महिन्यांत निर्देशांक दुपटीहून अधिक वर गेला. त्यात घसरण १० टक्केही झाली नाही. गेल्या दोन वर्षात प्रत्येक घसरणीत खरेदी करणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळाला. यापुढेही ते असेच कमाई करतील की हात पोळून घेतील? जगातल्या सर्व बाजारांना २००९पासून मध्यवर्ती बँकांनी पोसले. अर्थव्यवस्थेत बक्कळ पैसा ओतल्याने शेअर बाजारात तेजी राहिली. कोविडमुळे जागतिक कर्ज वाढले. २२६ ट्रीलियन डॉलर्सपर्यंत  गेले. जागतिक कर्जाचे जी. डी. पी.च्या तुलनेत प्रमाण २००८ साली २८० टक्के होते, ते ३५६ टक्क्यांवर गेले. भारतात हे प्रमाण २००८ साली ७२.८ टक्के होते, ते आता ८८.८ टक्के झाले. 

जगभर चलनवाढ होते आहे. अमेरिकेत ४० वर्षांत प्रथमच ७ टक्के इतका हा दर वाढलाय. मध्यवर्ती बॅंका पतपुरवठा आवळतील, हे आता सगळीकडे स्पष्ट दिसते आहे. जास्त कर्ज आणि कमी व्याजदराच्या काळात जगाचे बरे चालले होते. परंतु, अधिक व्याजदर आणि चलनवाढीच्या काळात अनेक आव्हाने उभी राहतील. जी. डी. पी.च्या तुलनेत जास्त कर्जाच्या काळात व्याजदर वाढणे अर्थव्यवस्थांना जड जाईल. अडचणी उद्भवतील. विशेषत: रशिया-युक्रेन युद्ध लांबले तर चलनवाढ दबाव वाढेल. भारत मोठा आयातदार देश आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. भारतात चलनवाढ अटळ आहे. युद्ध लांबल्यास युरोप व अन्य जगाला होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊन जागतिक अर्थव्यवस्था कोलमडेल. 

- हे सारे लक्षात घेऊन सर्व देशांनी स्वत:ला वाचविण्यासाठी निर्यातीवर बंधने आणण्यासारखे उपाय योजायला सुरूवात केली आहे. खते, गहू, बी- बियाण्यांच्या किमती अतिशय वेगाने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या तेल किमतींचे समायोजन करणे भारत सरकारला कठीण जात आहे. चालू तसेच महसुली खात्यावरील तूट त्यातून मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तेल बॅरलमागे १० डॉलरने वाढले की, चालू खात्यावरील तूट ५ टक्के वाढते. भौगोलिक राजकीय संघर्षामुळे भारताच्या निर्यातीवरही परिणाम होणार आहे. जगात व्याज दर वाढत गेले तर विदेशी संस्थांची गुंतवणूक बाहेर जात राहील. जगभरात तांत्रिक समभाग घसरले तर भारताला स्टार्टअप्समध्ये पैसा खेचणे कठीण जाईल. या सगळ्यातून रुपया घसरून भारतापुढे आर्थिक कटकटी वाढतील.

सध्या २०२२ या आर्थिक वर्षातले नक्त देशांतर्गत उत्पन्न २३६.४४ लाख कोटी आणि बाजाराचे भांडवल २५२ लाख कोटी अपेक्षिण्यात आले आहे. यात जी. डी. पी.चे बाजार भांडवलाशी प्रमाण १.०६ निघते. जे ऐतिहासिक स्तरावर जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळण्याची शक्यता कमीच. १ जानेवारी २०२० ते १२ मार्च २०२२ या काळात विदेशी संस्थांनी तब्बल १३ हजार कोटींची विक्री करूनही भारतीय शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. भारतातील खराब अर्थस्थिती आणि इतर ठिकाणी वाढते व्याजदर यामुळे विदेशी संस्था विक्री चालू ठेवतील. अल्प मुदतीच्या परताव्यावर याचा नक्कीच परिणाम संभवतो. खूप मोठ्या संख्येने नव्याने आलेल्या गुंतवणूकदारांनी मंदीच्या विळख्यातला बाजार किंवा मोठी घसरण पाहिलेली नाही. त्यांनी सावध राहिले पाहिजे. कमी परतावा असला तरी काही वर्षे गुंतवणूक राखण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. बाजार मोठी घसरण दाखवू शकतो किंवा दीर्घकाळ मंदीत राहू शकतो. नव्या गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षात सहज पैसा कमावला. पण त्यांच्याकडे पृथक्करणाचे कौशल्य, शिस्त नाही. त्यांनी एकतर बाजारापासून दूर राहावे किंवा गुंतवणूक सल्लागारांची मदत घ्यावी हे बरे.

(लेखक गुंतवणूक सल्लागार आहेत)

Web Title: Earned in the stock market? - Wait a minute!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.