भावी संकटाची ही नांदी तर नाही ना..!

By राजेश निस्ताने | Published: July 13, 2024 08:21 AM2024-07-13T08:21:44+5:302024-07-13T08:22:14+5:30

हिंगोली जिल्ह्यात बुधवारी झालेल्या भूकंपाने किल्लारीच्या आठवणी ताज्या केल्या. इथल्या भूकंपाची व्याप्ती वाढते आहे. प्रशासन मात्र अजून शांतच आहे.

Earthquake in Hingoli district brought back memories of Killari | भावी संकटाची ही नांदी तर नाही ना..!

भावी संकटाची ही नांदी तर नाही ना..!

राजेश निस्ताने
वृत्तसंपादक,लोकमत, नांदेड

३० सप्टेंबर १९९३ ची ती रात्र. अनंत चतुर्दशीचा दिवस. पहाटे ३:५६ मिनिटांनी जमिनीला मोठा हादरा बसला आणि संपूर्ण मराठवाडा हादरला. होय.. किल्लारीचा भूकंप. अलीकडच्या काळात अख्ख्या राज्यावर ओढावलेली सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती. ३० सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळी चार भूकंप झाले. त्यातील सर्वांत मोठा ६.०४ रिश्टर स्केलचा. ७९२८ जणांचा मृत्यू, १५,८५४ जनावरे दगावली. १६,००० नागरिक जखमी झाले. १३ जिल्ह्यांतील २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. 

उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील ५२ गावे उद्ध्वस्त झाली. एवढी विदारकता संपूर्ण राज्याने सोसली. हे सर्व आठवायचे कारण म्हणजे हिंगोली जिल्ह्यात बुधवारी १० जुलै रोजीचा भूकंप. 

वेदना कमी झाल्या की उपाय करण्याच्या हालचाली आपसूकच मंदावतात. तसेच आता झाले आहे. किल्लारीच्या कटू आठवणी हळूहळू विस्मृतीत जात असून, भूकंपाच्या हानीपासून बचाव करण्याच्या उपायांना जणू काही पूर्णविरामच मिळालाय. हिंगोली जिल्ह्यात बुधवारी झालेल्या भूकंपाने मात्र किल्लारीच्या भूकंपाच्या आठवणी ताज्या होत आहेत. अंगावर शहारा उभा राहतोय. त्यामुळे आता काही तरी केले पाहिजे, अशीच भावना निर्माण होतेय. त्याला कारणेही तशीच आहेत. 

शास्त्रीय अभ्यास वेगळा असेल, पण सर्वसामान्यांना उघड्या डोळ्यांनी जे दिसतेय त्यात मात्र हिंगोलीच्या भूकंपाची तीव्रता आणि व्याप्ती वाढतच चालली आहे.  हिंगोली जिल्ह्यातील वापटी (ता. वसमत) येथे २०१४ च्या पूर्वीपासून भूगर्भातून आवाज येतात. त्याचे केंद्र पुढे सरकले आणि याच गावापासून काही अंतरावर असलेल्या पांगरा शिंदे (ता. वसमत) येथे २०१७ पासून ग्रामस्थ भूकंपाचे हादरे सोसत आहेत. 
२०१७ पासून २०२३ पर्यंत हिंगोली जिल्ह्याने भूकंपाचे १५ मोठे हादरे सोसले. २०२४ मध्ये २१ मार्च आणि १० जुलै असे दोन म्हणजे आतापर्यंत १७ हादरे जिल्ह्याने अनुभवले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे २०२३ पर्यंतच्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मात्र, २०२४ मध्ये झालेल्या दोन्ही भूकंपांचा केंद्रबिंदू पांगरा शिंदे गावापासून साधारण १० ते १५ किलोमीटर अंतरावरील रामेश्वर तांडा (ता. कळमनुरी) या गावाकडे सरकला आहे. 
२०२३ पर्यंत ३.६ रिश्टर स्केलचा सर्वांत मोठा भूकंप झाल्याची नोंद होती. पण, या वर्षांतील दोन्ही भूकंप ४.५ रिश्टर स्केलचे आहेत. शिवाय भूकंपाची व्याप्तीदेखील वाढू लागली आहे. सुरुवातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यात हे धक्के जाणवत होते. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासह शेजारच्या नांदेड जिल्ह्यापर्यंत त्याची व्याप्ती वाढली. १० जुलै रोजीच्या भूकंपाची व्याप्ती तर मराठवाड्यातील ५ आणि विदर्भातील ४ जिल्ह्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे भूकंपाची तीव्रता, व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. 
हे धक्के भविष्यातील आणखी एखाद्या मोठ्या नैसर्गिक संकटाची नांदी तर नसेल ना, अशी भीती आता व्यक्त होत आहे. त्यामुळेच सामान्य नागरिकांमधील चिंता वाढली आहे. प्रशासकीय पातळीवर मात्र याबाबत अजूनही शांतता आहे. 

२०१८ मध्ये केंद्र सरकारच्या एका पथकाने पांगरा शिंदे येथे भेट देऊन अभ्यास केला होता, पण पुढे काहीच झाले नाही. ‘घाबरून जाऊ नका, पण काळजी घ्या’ असे नेहमीचे आवाहन तेवढे भूकंप झाल्यानंतर प्रशासनाकडून केले जाते. पण, ठोस माहिती, कायमस्वरूपी उपाययोजना, प्रतिबंध, जनजागृती या बाबींवर कोणीच फारसे बोलत नाही. किमान आता तरी सरकार, प्रशासनाकडून हालचाली होतील, ही अपेक्षा. विपरीत काही घडण्याच्या आधीच योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

भौगोलिक स्थिती कशी? 

वसमत, कमळमनुरी, औंढा तालुक्यातील ही गावे मुख्यत्वे डोंगराळ आहेत. अजिंठा डोंगररांगा येथे अस्तित्वात आहेत. वापटी, पांगरा शिंदे, शिरळी, दांडेगाव, रामेश्वर तांडा या पट्ट्यात भूकंपाचा केंद्रबिंदू सातत्याने जाणवतो. या भागात नेहमीच जमिनीतून गूढ आवाज येतात. ३० किलोमीटर अंतराच्या पट्ट्यातील ही गावे असून, या भागात बेसॉल्ट खडक असला तरी मुरुमाचे प्रमाण अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मण तांडा येथे जमिनीतून ज्वालामुखी निघाल्याचेही गावकरी सांगतात. 

लिगो’ वेधशाळेसाठी औंढाच का? 

हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी दुधाळा परिसरात जगातील तिसरी ‘द  लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हीएशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी’ (लिगो) वेधशाळा  ‘नासा’च्या मंजुरीने उभारली जात आहे. ब्रह्मांडातील गुरत्वीय लहरींचा अभ्यास करणारी ही जगातील तिसरी वेधशाळा आहे. यापूर्वी अमेरिकेत वॉश्गिंटन (लिगो हॅनफोर्ड) आणि लुईसीयाना (लिगो लिव्हिंटन) येथे दोन वेधशाळा अस्तित्वात आहेत. तिसऱ्या प्रकल्पासाठी औंढ्याची जागा निवडण्यात आली. त्यासाठी २६०० कोटी रुपयांचा निधी केंद्राने मंजूर केला आहे. निधीचा पहिला टप्पा मिळाला असून, काम प्रगतिपथावर आहे. अमेरिकेच्या विरुद्ध बाजूला वेधशाळा असावी, भूकंपप्रवण क्षेत्र नसावे, रेल्वेस्थानक, विमानतळ,  मानवी वस्ती त्या ठिकाणी नसावी, शक्यतो पठाराची जागा असावी, आदी प्रमुख निकष आहेत. मात्र, नेमक्या त्याच परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने लिगो वेधशाळेसाठी नव्याने सर्वेक्षण व्हावे, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सूर आहे.
 

Web Title: Earthquake in Hingoli district brought back memories of Killari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.