पर्यावरणस्नेही दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:59 AM2017-10-14T01:59:38+5:302017-10-14T01:59:46+5:30
दीपोत्सव हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. पण यंदाची दिवाळी मात्र दिव्यांच्या झगमगाटापेक्षा फटाक्यांच्या न होणाºया धमाक्यांनीच अधिक गाजणार असे दिसते.
दीपोत्सव हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण. पण यंदाची दिवाळी मात्र दिव्यांच्या झगमगाटापेक्षा फटाक्यांच्या न होणाºया धमाक्यांनीच अधिक गाजणार असे दिसते. सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीत फटाके विक्रीवर घातलेली बंदी आणि त्यानंतर महाराष्टÑातही निवासी भागात फटाके विकण्यावर निर्बंध आल्याचे कळताच राजकारण तापले आहे. फटाक्यांचे विरोधक आणि समर्थक एकमेकांसमक्ष उभे ठाकले आहेत. काहींनी तर आणखी एक पाऊल पुढे टाकत त्याला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न चालविला आहे. दिवाळीतच फटाकेबंदी का? असा त्यांचा सवाल आहे तर दुसरीकडे पर्यावरणवाद्यांची प्रदूषणमुक्त उत्सवासाठी धडपड सुरु आहे. तसे बघता हे चित्र काही नवे नाही. दरवर्षीच उत्सवांचे दिवस आले की अशा चर्चा उफाळून येत असतात. गणेशोत्सवात डॉल्बी आणि जलप्रदूषणमुक्तीचे ढोल बडविले जातात तर दिवाळीत फटाकेमुक्तीच्या लडी लावल्या जातात आणि एकदाका सण साजरा झाला की सर्वांनाच त्याचा विसर पडतो. सोबतच प्रदूषणासारखा गंभीर मुद्दा ज्यामुळे आज साºया देशाचे आरोग्य धोक्यात आले आहे; हवेत विरून जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार सद्यस्थितीत भारतात वायुप्रदूषणाने दरमिनिटाला दोघांचा मृत्यू होतो. त्यातही महाराष्टÑ हे देशातील सर्वाधिक प्रदूषित राज्य असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. शहरांमधील कचºयांचे ढिगारे वायुबॉम्बच्या रूपात लोकांच्या जीवावर उठले आहेत तर दुसरीकडे रस्त्यांवर धावणाºया अगणित गाड्यांनी श्वास गुदमरतो आहे. विकास आणि समृद्धीच्या नादात पर्यावरणाकडे झालेल्या दुर्लक्षाचाच हा परिपाक आहे. पूर्वी दसरा, कोजागिरी पौर्णिमेला थंडीची चाहुल लागत असे. दिवाळीत तर थंडीत कुडकुडत अभ्यंगस्नान व्हायचे. यंदा दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाही थंडीचे कुठे नामोनिशाण नाही. खरे तर आपण साजरा करीत असलेला प्रत्येक सण आणि उत्सवाचा संबंध हा निसर्गाशी, ऋतुचक्राशी जुळलेला आहे. किंबहुना हे सगळे सण निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच साजरे करण्याची जुनी परंपरा आहे. परंतु दुर्दैवाने आज या सणवारांनाही इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने त्यांच्या मूळ उद्देशांपासून आम्ही केव्हाच भरकटलो आहोत. ज्या फटाक्यांवरून एवढी राजकीय आतषबाजी सुरू आहे त्या फटाक्यांचे दिवाळीच्या सणात कुठलेही औचित्य नाही. परंतु फटाके फोडणे म्हणजेच दिवाळी असा गैरसमज अनेकांनी करून घेतला आहे. दिवाळीचा इतिहास धुंडाळल्यास त्यामागील सत्य समोर येईल. आज खरी गरज आहे ती पर्यावरण संवर्धनाची तसेच प्रदूषण वाढविणाºया प्रत्येक गोष्टीवर आळा घालण्याची आणि असे करणेच मानवहिताचे ठरणार आहे.