अर्थशास्त्रींची देशसेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:00 AM2018-06-22T01:00:19+5:302018-06-22T01:00:19+5:30
मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी मुदतीआधीच ते पद सोडण्याचे जाहीर केल्याने चर्चा आणि शंकाकुशंकांना उधाण आले.
मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी मुदतीआधीच ते पद सोडण्याचे जाहीर केल्याने चर्चा आणि शंकाकुशंकांना उधाण आले. सुब्रमणियन यांना मोदी यांनी सत्तेवर येताच या पदावर नेमले होते. रुळावरून घसरलेला देशाचा आर्थिक गाडा सावरण्यासाठी विश्वासू अरुण जेटलींच्या मदतीला त्यांनी सुब्रमणियन यांना दिले. दोघांचे सूत पक्के जमले. मोदी व भाजपाने राजकारण डोळ्यापुढे ठेवून सरकारचा आर्थिक अॅजेंडा जरूर राबविला. परंतु सुब्रमणियन यांनी त्या राजकारणात न पडता आपली मते व विचार परखडपणे मांडले. सल्लागाराचे काम नेमके तेच असते. यशापयशाची किंवा स्तुती आणि टीकेची चिंता त्यांनी करायची नसते. शेवटी त्यांनी दिलेला सल्ला मानायचा की नाही हे राजकीय नेतृत्व ठरवत असते व त्याचे खापरही त्यांच्याच डोक्यावर फुटणार असते. म्हणूनच सल्लागार व त्याला नेमणारे यांचे नाते प्रगाढ विश्वासाचे असावे लागते. सल्लागाराकडून राजकारणाप्रमाणे इमान अपेक्षित नसते. त्याच्याकडून अपेक्षा असते स्वत:शी प्रामाणिक राहण्याची. शिवाय अर्थशास्त्र हे प्रयोगसिद्ध विज्ञान नाही. त्यामुळे त्यातील प्रत्येक सिद्धांताला दुसरी बाजू असते. या सर्व निकषांवर सुब्रमणियन पुरेपूर खरे उतरले म्हणून त्यांचे कौतुक करायला हवे. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर व त्यातील अपयशावर विरोधकांनी सडकून टीका केली, पण त्यांनी सुब्रमणियन यांना कधी दोष दिला नाही. तरीही सुब्रमणियन यांचा राजीनामा हा सार्वजनिक चर्चेचा विषय झाला. पण शस्त्रक्रियेनंतर घरात विश्रांती घेणारे वित्तमंत्री जेटली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने आपल्या खात्याची खबरबात घेतात व एरवी माध्यमांना सामोरे जाऊन सांगायच्या गोष्टी फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून व्यक्त करत आहेत. सुब्रमणियन यांच्या राजीनाम्याची माहितीही जेटलींनी अशीच दिली. नंतर सुब्रमणियन यांनी त्याची कारणमीमांसा दिली. पुन्हा अमेरिकेत जाऊन लिखाण व संशोधन करायचे आहे. शिवाय सप्टेंबरमध्ये आजोबा होणार असल्याने माझ्यावर वेगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या येणार आहेत. त्यामुळे मीच मुदत संपण्याआधीच पदातून मुक्त करण्याची विनंती केली, असे सुब्रमणियन यांनी स्पष्ट केले. त्यांची कारणे मला पटल्याने मी त्यांना नकार देऊ शकलो नाही, असे जेटलींनी म्हटले. ‘अरविंद’ असा प्रेमळ एकेरी उल्लेख करून त्यांनी सुब्रमणियन यांच्या कामाची स्तुती केली. पण अशी खंत मोदींनी व्यक्त केल्याचे माध्यमांना त्यांच्या नेहमीच्या विश्वसनीय सूत्रांकडूनही कळले नाही. मग या ‘स्टोरी’ला ज्याने-त्याने आपापले रंग दिले. गेल्या चार वर्षांत सुब्रमणियन यांचे सरकारशी केव्हा, कशावरून खटके वा मतभेद झाले याचा पडताळा सुरू झाला. प्रखर बुद्धिमत्तेचे लोक मोदींचे बुडते जहाज आता सोडून जाऊ लागले आहेत, या काँग्रेसच्या टीकेने या राजीनाम्यात राजकीय रंग भरला. सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार हे पडद्यामागचे पद. परंतु नीती आयोगाचे अरविंद पनगढिया, रिझर्व्ह बँकेचे रघुराम राजन व सुब्रमणियन यांची नावे व चेहरे लोकांच्या परिचयाचे झाले. देशाचे आर्थिक धोरण व त्यातील समस्यांचे भलेबुरे चित्र जनतेपुढे मांडण्याचे काम या मंडळींनी केले. पण हे तिघेही निरनिराळ्या परिस्थितीत मोदींना सोडून गेले. त्यामुळे त्यांचे जाणे सरकारच्या अपयशाच्या खात्यात टाकले गेले. असे करणे बरोबर नाही, त्याची गरजही नाही. डॉ. मनमोहन सिंग, पनगढिया, राजन व सुब्रमणियन मंडळींनी परदेशातून परत येऊन आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा देशाला लाभ दिला. आयुष्यातील मोक्याची वर्षे स्वदेशासाठी समर्पित केली. या अर्थशास्त्रींनी केलेली ही देशसेवाच आहे. त्यांचे नक्कीच अभिनंदन व्हायला हवे.