काठावरचा शहाणा

By admin | Published: September 6, 2015 09:29 PM2015-09-06T21:29:32+5:302015-09-06T21:29:32+5:30

जो प्रत्यक्ष पाण्यात उतरून हातपाय मारण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्यापेक्षा काठावर उभे राहून पाण्यात पडलेल्यास अक्कल शिकवीत राहतो, तो म्हणे शहाणा समजला जातो

Edge wise | काठावरचा शहाणा

काठावरचा शहाणा

Next

जो प्रत्यक्ष पाण्यात उतरून हातपाय मारण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्यापेक्षा काठावर उभे राहून पाण्यात पडलेल्यास अक्कल शिकवीत राहतो, तो म्हणे शहाणा समजला जातो. असे शहाणपण तूर्तास राज ठाकरे यांनी पत्करलेले दिसते. त्यामुळेच राज्यकर्त्यांनी दुष्काळाचे ‘पर्यटन’ थांबवून पीडितांना तत्काळ मदत पुरवावी, दौरे करायची काय गरज, असा सवाल त्यांनी केला आहे. नाशकातील सिंहस्थाच्या निमित्ताने ठाकरे साधुग्रामात गेले होते आणि त्यांना बघून एका दाढीधारी संधिसाधूला अगदी भरून आले होते! मुळात राज यांना तरी या सिंहस्थ पर्यटनाची गरज काय असा सवाल कुणीही विचारू शकतो. पण ठाकऱ्यांना सवाल पुसायचे नसतात. तो मक्ता पूर्णपणे त्यांचा. दुष्काळ वा तत्सम संकटे येतात तेव्हा राज्यकर्त्यांनी तिथे जाणे आणि समवेदना प्रकट करणे हा भले एक रिवाजाचा भाग बनला असला तरी तो उभयपक्षी आवश्यक मानला जातो. आपत्तीची साधी चौकशी करण्याचीदेखील गरज सरकारला भासू नये असा प्रश्न उपस्थित करून सरकारला बदडून काढले जाते. ते टळावे म्हणून आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी परिस्थिती पाहून तिचा नेमका अंदाज यावा म्हणूनही राज्यकर्ते दौरे काढीत असतात. त्याचबरोबर जे आपद्ग्रस्त असतात, त्यांनाही मनोमन कुणीतरी (म्हणजे सरकारने) येऊन आस्थेवाईकपणे आपली चौकशी करावी असे वाटत असते. आपत्ती दुष्काळाची असो की अतिवृष्टीची, लोकांच्या सरकारकडूनच्या अपेक्षा अफाट असतात व त्यांना विराट स्वरूप देण्याचे काम विरोधकच करीत असतात. आपल्या साऱ्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत, हे संबंधितांनाही चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे कुणीतरी आपल्या पाठीशी आहे ही सद्भावनादेखील बऱ्याचदा पुरेशी ठरत असते. त्यासाठीच आवश्यक ठरणाऱ्या दौऱ्यांना कोणत्या शब्दाने संबोधायचे हे ज्याच्या त्याच्या संस्कृतीवर अवलंबून असते.

Web Title: Edge wise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.