अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 08:19 IST2025-03-12T08:19:32+5:302025-03-12T08:19:52+5:30
खरेतर राज ठाकरे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील सूक्ष्म फरक नेमकेपणाने मांडला. त्यावर फार कोणी बोलत नाही.

अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो
प्रयागराजचा बहुचर्चित महाकुंभ आणि तिथून बाळा नांदगावकरांनी आणलेल्या पवित्र गंगाजलाबद्दल परवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बेधडक बोलले. तेव्हा जणू प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हेच नातवाच्या तोंडून बोलत असल्याचा भास झाला. मनाला योग्य वाटेल ते बिनधास्तपणे बोलणारे राज यांचे चुलते बाळासाहेब ठाकरे यांचीही अनेकांना आठवण झाली. गंगेत स्नान केले की पापे धुऊन निघतात, या श्रद्धेपोटी दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त गंगा, यमुना व गुप्त सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केले. काहींनी त्या संगमाचे पवित्र गंगाजल बाटल्यांमध्ये भरून आणले. पक्षाच्या १९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात त्या संदर्भाने बोलताना राज ठाकरे यांनी लोकांना या अंधश्रद्धांमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले. नुकताच कोरोना गेला. त्या दोन वर्षांमध्ये तोंडाला मास्क लावून फिरणारे नंतर गंगेत कसे स्वतःला स्वच्छ करून घेत होते, यावर राज बोलले. थेट गंगेत डुबकी मारण्याची वेळ यावी इतकी पापे करताच कशाला, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
असे बिनधास्त राज ठाकरे लोकांना आवडतात. मधल्या काळातील काही अपवाद वगळता ते बऱ्यापैकी तर्कशुद्ध व वैज्ञानिकही बोलतात. अर्थात त्यांची परवाची विधाने त्यातील मुद्द्यांसाठी गाजलीच नाहीत. कडव्या हिंदुत्ववादी मंडळींनी राज यांचे बोलणे सहन कसे करून घेतले, भारतीय जनता पक्ष किंवा शिंदेसेनेची काही मजबुरी आहे का, अशी थोडीबहुत चर्चा झाली. विरोधी पक्षांचे कोणी नेते असे बोलले असते तर भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी आकाशपाताळ एक केले असते. त्यांच्यासाठी राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे आणि या दोन्ही पक्षांना राज ठाकरे यांच्या मनसेची गरज आहे. म्हणून ही राजकीय सहनशीलता दाखवली गेली असावी. खरेतर राज ठाकरे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील सूक्ष्म फरक नेमकेपणाने मांडला. त्यावर फार कोणी बोलत नाही.
त्या जोडीला गंगेच्या पावित्र्याचा मुद्दा गंभीर आहे. केंद्रातील हिंदुत्ववादी सरकार गेली अकरा वर्षे गंगा स्वच्छ करण्याच्या आणाभाका घेत असताना ऐन महाकुंभावेळी ती अस्वच्छ कशी राहिली, हा खरा प्रश्न आहे. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर जिथे भाविक अपार श्रद्धेने डुबकी मारतात, तिथल्या पाण्यात मानवी विष्ठेचे प्रमाण अत्यंत धोकादायक असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेरच्या स्नानापूर्वी जारी केला. तेव्हा समाजात खोल रुजलेल्या अंधश्रद्धेने त्याचीही वासलात लावली. अंधश्रद्धा खटकण्यासाठी विज्ञानवादीच असायला हवे असे काही नसते. थोडा विवेक जागा असेल तरी श्रद्धा व अंधश्रद्धेतील फरक लक्षात येतो. परंतु, मास हिस्टेरियामध्ये फसलेल्या आपल्या समाजात विवेक उरलाय की नाही, असा प्रश्न पडतो, अशावेळी राज ठाकरे यांच्यासारखा एक प्रमुख नेता स्पष्टपणे बोलतो, श्रद्धेचा आदर करताना अंधश्रद्धेवर प्रहार करतो, हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी उपस्थित केलेला नद्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा हा त्याहून महत्त्वाचा.
नदीला माता म्हणणाऱ्या, तिची पूजा मांडणाऱ्या भारतातील नद्यांचे प्रदूषण आता जगाच्या चिंतेचा विषय आहे. दिल्लीचे राजकारण हलविणारी यमुना, उत्तर प्रदेश व बिहारची लोकवाहिनी गंगा, पंजाब व जम्मू-काश्मीरमधील रावी, आसाममधील भारलू, केरळमधील पेरियार, कर्नाटक-आंध्रातील तुंगभद्रा, तेलंगणातील मुसी, गुजरातमधील साबरमती या सर्वाधिक प्रदूषित नद्या आहेत. याचा अर्थ बाकीच्या स्वच्छ आहेत, असे नाही. महाराष्ट्रात पंचगंगा, गोदावरीचे प्रदूषण अतिधोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. गोदावरीकाठी नाशिकला पुढला सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. तिथेही माणसांनीच नदीचे गटार बनविले आहे. नैसर्गिक प्रवाह बंद झाले आहेत. बारमाही वाहणाऱ्या मोठ्या नद्या आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या उरल्या आहेत. महानगरांमधील सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. ते थांबविण्यासाठी वीस-पंचवीस वर्षे आपले सर्वोच्च न्यायालय निर्वाणीचा इशारा देत आले. आता न्यायालयदेखील थकले. हे सगळे पाहता राज ठाकरे यांच्या विधानाकडे केवळ राजकीय दृष्टीने पाहून चालणार नाही. गंभीर मंथन व्हायला हवे.