भेजा शोर करता है! ...अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 10:29 AM2023-08-01T10:29:15+5:302023-08-01T10:29:47+5:30

पोलिस व नागरिक यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही. 

editorial about Firing in Jaipur-Mumbai Express | भेजा शोर करता है! ...अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही

भेजा शोर करता है! ...अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही

googlenewsNext

जयपूर या शहराला पिंक सिटी म्हटले जाते. तेथून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाडीत सोमवारी सकाळी लाल रक्ताचे पाट वाहिले. चेतन सिंह या आरपीएफच्या कॉन्स्टेबलने त्याच्याकडील एके ४७ रायफलमधून केलेल्या गोळीबारात त्याचे वरिष्ठ अधिकारी सहायक उपनिरीक्षक टीकाराम मीना तसेच अब्दुल कादर भान पुरवाला, अजगर अब्बास अली व अन्य एक प्रवासी अशा चारजणांचा मृत्यू झाला. प्रवाशांच्या सुरक्षेकरिता तैनात असलेल्या सिंह याने काही प्रवाशांचाच जीव घेतला, हे धक्कादायक व दुर्दैवी आहे. हत्या केल्यानंतर सिंह याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले. रेल्वेमध्ये हत्याकांड घडविल्यानंतर बंदूक हातात घेऊन हा सिंह भाषण करतोय व सोबतचे भयभीत प्रवासी त्याचे ‘भाषण’ ऐकताहेत असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सिंह याने हे टोकाचे पाऊल का उचलले याची चर्चा सुरू झाली आहे. रेल्वेमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी जाहीर झाली आहे. पहाटेच्या सुमारास पँट्री कारमध्ये मीना याच्यासोबत वाद झाल्यामुळे सिंह याने किमान चार ते पाच बोगी त्यांचा पाठलाग करून त्यांची हत्या केली, असे माध्यमकर्मींचे म्हणणे आहे. सिंह याचा वाद जर मीना यांच्याशी होता, तर त्याने तीन प्रवाशांची हत्या का केली? या तिघांनी मीना यांना वाचविण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनाही सिंह याने संपविले किंवा कसे या व अन्य अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. मात्र, या अत्यंत भीषण घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांवरील कामाच्या ताणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने गुन्हे वाढले आहेत, ते लक्षात घेता सध्या जेवढे पोलिस दल सेवेत आहे त्याच्या किमान पाचपट कर्मचारी सेवेत दाखल करण्याची गरज आहे. परंतु, या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पोलिसांचे कामाचे तास, त्यांना सातत्याने सुटी न घेता करावे लागणारे काम, कुठेही होणाऱ्या बदल्या, मिळणारे अत्यल्प वेतन व भत्ते, पोलिसांच्या घरांची दुर्दैवी अवस्था, वरिष्ठांची मनमर्जी राखण्याकरिता करावी लागणारी सौदेबाजी अशा असंख्य समस्यांना तोंड देत पोलिसांना काम करावे लागते.

एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यात दिरंगाई झाली तर माध्यम व समाजमाध्यमांवर पोलिसांना लक्ष्य केले जाते. सिंह हा गेले काही दिवस सुटीवर होता व नुकताच परतला होता. सुटीच्या काळात सिंह याचा काही कौटुंबिक वाद सुरू होता किंवा कसे व त्यातून मानसिक स्वास्थ्य गमावल्याने त्याने हे कृत्य केले का हेही तपासले जायला हवे. सिंह हा तापट स्वभावाचा असल्याचे त्याच्या वरिष्ठांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत सिंह याचे वागणे विक्षिप्त वाटल्याने त्याला सुटीवर पाठविले होते का व या काळात त्याने त्याच्या बिघडलेल्या मानसिक स्वास्थ्यावर उपचार केले किंवा कसे? उपचार पूर्ण होण्यापूर्वीच सिंहला कामावर हजर करवून घेतले किंवा कसे? अशा शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सिंह याने २६-११ च्या मुंबईवरील हल्ल्याबाबत चित्रपट पाहिला होता व त्यामुळे तो अस्वस्थ होता, असेही काही वृत्तात म्हटले आहे. त्याचबरोबर हत्या केल्यानंतर सिंह याने देशातील राजकीय परिस्थिती, विशिष्ट जनसमुदायाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्याचेही बोलले जाते. त्यामुळे या संपूर्ण घटनेला जर धार्मिक विद्वेषाची किनार असेल, तर सोशल मीडियावर गेल्या काही काळापासून दोन्ही बाजूने सुरू असलेल्या विखारी प्रचाराचा हा परिपाक आहे.

सिंह याच्या हल्ल्यात बळी पडलेल्या मीना यांच्या कुटुंबीयांना रेल्वेने भरपाई घोषित केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची जलद गतीने चौकशी करून सिंह याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल होऊन सिंह याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, तरच पीडितांना न्याय मिळाल्याची लोकांची भावना होईल. रजा दिली नाही म्हणून आत्महत्या, आवाज चढवून जाब विचारल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळी झाडली अशा घटना देशात वरचेवर घडत असतात. पोलीस हाही एक माणूस आहे. त्याला कुटुंब आहे, मन-भावना आहेत. व्हीआयपी लोकांचा बंदोबस्त सांभाळण्यासाठी तास‌न‌्तास पोलिसांना उभे केले जाते. पोलिसांनी सॅल्युट मारला नाही म्हणून राजकीय नेते नाराज झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा कुचंबणेचा स्फोट कदाचित अशा पद्धतीने होऊ शकतो. मात्र यामुळे सिंह याने केलेली कृती समर्थनीय ठरत नाही. पोलिसांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहिले तरच ते सर्वसामान्यांचे रक्षण करू शकतात. पोलिस व नागरिक यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा घटना वाढणे समाजहिताचे नाही. 

Web Title: editorial about Firing in Jaipur-Mumbai Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.