ऐसे कैसे झाले भोंदू?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 09:26 AM2022-06-29T09:26:33+5:302022-06-29T09:27:32+5:30
वनमोरेंची भावकी, शेजार-पाजाऱ्यांकडे कानोसा घेतल्यावर पोलिसांना धागेदोरे मिळाले. गुप्तधनाच्या लालसेतून उच्चशिक्षित आणि महिन्याला दोन लाखांवर उत्पन्न असलेले हे कुटुंब मांत्रिकांच्या नादी लागले.
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये २० जूनला एकाच कुटुंबातील नऊ जणांचा विष प्यायल्याने मृत्यू झाला. संवेदनशील मनांना सुन्न करणारा, चक्रावून सोडणारा हा प्रकार. आता आठवड्यानंतर त्या आत्महत्या नसून, थंड डोक्याने केलेले हत्याकांड असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गुप्तधनाच्या प्रकरणातून मांत्रिकाने घडविलेले हे हत्याकांड असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे या उच्चशिक्षित भावांचे हे कुटुंब. दोघा भावांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यांतून त्यांनी मोठे कर्ज उचलल्याचे दिसून आले. त्यांना कर्ज देणाऱ्या पंचवीस जणांवर गुन्हे दाखल करून १९ जणांना अटक झाली. पण, हे कर्ज कशासाठी घेतले, याचा उलगडा आता होत आहे.
वनमोरेंची भावकी, शेजार-पाजाऱ्यांकडे कानोसा घेतल्यावर पोलिसांना धागेदोरे मिळाले. गुप्तधनाच्या लालसेतून उच्चशिक्षित आणि महिन्याला दोन लाखांवर उत्पन्न असलेले हे कुटुंब मांत्रिकांच्या नादी लागले. गुप्तधन काढून देण्याची बतावणी उघड होऊ लागल्याने मांत्रिकाने अख्ख्या कुटुंबाला जेवणातून विष दिले. पुरोगामी महाराष्ट्रात आजही शिकले-सवरलेले लोक भोंदूंना बळी पडतात, याचे हे जळजळीत उदाहरण. सिंधुदुर्गजवळ नांदोस येथे २००३ मध्ये असेच हत्याकांड घडले होते. पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या कुटुंबांतील १० जणांचे बळी घेण्यात आले होते. त्या प्रकरणात चौघांना फाशीची शिक्षा झाली होती. त्याची पुनरावृत्ती म्हैसाळमध्ये घडली असताना, याच आठवड्यात पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषातून गंडा घालण्याचे दुसरे प्रकरणही सांगलीत उघडकीस आले आहे.
सांगली-मिरजेच्या परिसरात देव-देवस्की, तंत्र-मंत्र, करणी-भानामतीचे प्रकार सर्रास चालतात. ही गावे सधन, पण अज्ञान आणि अगतिकतेतून पसरलेल्या अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर न आलेली. त्यामुळे गंडा घालणाऱ्या मांत्रिक-देवऋषींच्या टोळ्या त्यांना पद्धतशीर फशी पाडतात. त्यात अशिक्षितांसोबत शिक्षितांचीही संख्या जास्त. पैसे-संपत्ती, अपत्यप्राप्तीसह अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बुवा-बाबा, मांत्रिक-देवऋषींच्या भूलभुलैय्याला ते भुलतात, बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञाननिष्ठा बाजूला सारतात, अघोरी प्रकारांत अडकतात. यातून पश्चातापाशिवाय हाती काहीच लागत नाही. मानसिक खच्चीकरण होते. काहीजण जिवालाही मुकतात.
विशेष म्हणजे अशा कुटुंबांना सावध करणारे, त्यापासून परावृत्त करणारे जवळचे कोणीच नव्हते का, हा प्रश्न नंतर अस्वस्थ करून सोडतो. मग समाजमन ढवळून निघते, मती गुंग होते, सर्वदूर चर्चा झडतात, पण अंधश्रद्धा मुळासकट उखडून टाकणे आजअखेर शक्य झालेले नाही. तुकोबांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे.. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनि म्हणती साधु, अंगी लावुनिया राख, डोळे झाकुनी करिती पाप, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती.. - तरीही बुवाबाजीच्या मागे लागलेला समाज महाराष्ट्रभर दिसतोच आहे. महात्मा फुले, लोकहितवादी देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे ते नरेंद्र दाभोलकरांपर्यंत तमाम द्रष्ट्या समाजसुधारकांनी दिलेले प्रबोधनाचे, जनजागृतीचे धडे यांच्यापर्यंत पोहोचलेच नसावेत का, असा प्रश्न या घटनांमध्ये पुढे येतो.
भोंदू बुवा-बाबा, मांत्रिकांवर अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हे दाखल केले पाहिजेत. व्यापक समाज परिवर्तनाचा मुख्य भाग म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाला बळ द्यायला हवे. शिक्षण, राजकारण आणि प्रसारमाध्यमे या प्रमुख साधनांचा वापर समाजपरिवर्तनासाठी केला पाहिजे. ‘माणूस’ केंद्रस्थानी ठेवून त्याच्या जाणिवा कुटुंब, शिक्षण व्यवस्था आणि समाजव्यवस्था या संस्थांमधून बळकट व्हाव्यात. जिज्ञासा वाढवून चिकित्सक वृत्ती तयार व्हावी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपासला जावा, असे निकोप वातावरण या तिन्ही संस्थांमध्ये जाणीवपूर्वक तयार झाले, तर अशा जोखडात अडकलेला समाज पहिल्यांदा कार्यकारणभाव तपासेल, तर्कशुद्ध दृष्टीने अशा घटनांकडे बघेल... आणि फशी पाडणाऱ्यांना विरोध सुरू करेल. त्यांच्यावर आसूड ओढायला लागेल.