..उलझन सुलझाओ भगवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:14 AM2023-08-03T10:14:14+5:302023-08-03T10:14:45+5:30

‘लगान’ चित्रपटात तिप्पट लगान द्यायला लागू नये याकरिता संघर्ष करणारा भुवन आपण पाहिला आहे. तीच खंबीरता देसाई यांनी ठेवली असती व त्या पालनकर्त्याकडे ‘हमरी उलझन सुलझाओ भगवन’ अशी प्रार्थना केली असती तर कदाचित देसाई आज आपल्यात असते..

Editorial about Nitin Chandrakant Desai | ..उलझन सुलझाओ भगवन!

..उलझन सुलझाओ भगवन!

googlenewsNext

माधुरी दीक्षित, आशुतोष गोवारीकर आणि नितीन चंद्रकांत देसाई या बॉलिवूडमधील तीन हस्ती मराठी माणसांची मान उंचावणाऱ्या! उत्तरेकडील मंडळींचे वर्चस्व राहिलेल्या बॉलिवूडमध्ये यांनी केवळ यशस्वी कारकीर्दच केली नाही तर आपला स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. यापैकी नितीन देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या मालकीच्या एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने चित्रपटसृष्टी कमालीची हादरली आहे. आत्महत्या आणि बॉलिवूड हे नाते वर्षानुवर्षांचे आहे. या चंदेरी दुनियेत मुळात पाऊल ठेवायची संधी मिळणे हेच कर्मकठीण. समजा, ती संधी मिळाली तर आपले वेगळेपण सिद्ध करून स्टार होणे हे हिमालयाएवढे आव्हान. यदाकदाचित ते साध्य केले तर स्टार म्हणून अढळपद निर्माण करणे अशक्यप्राय. वरील तिघांनी या कसोटीवर उत्तम यश प्राप्त केले होते. 

बॉलिवूडमधील कारकिर्दीत वरील तिन्ही निकषांवर चिरकाल टिकून राहिलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच एकमेव. अमिताभ बच्चन यांनी एका विशिष्ट टप्प्यावर पडता काळ पाहिला. देसाई यांनी कला दिग्दर्शक या नात्याने ऐतिहासिक, पौराणिक चित्रपटांकरिता भव्यदिव्य सेट उभे केले. प्रजासत्ताक दिनी आखीवरेखीव चित्ररथ साकारले. भव्यदिव्य चित्रपटांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी लोकप्रिय मालिका निर्मिली. देसाई म्हणजे भव्यदिव्य असे समीकरण निर्माण केले.  देसाई यांनी उभ्या केलेल्या एनडी स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या चित्रपटांची शूटिंग व्हायची. या स्टुडिओपाशी वॉर्नर ब्रदर्सच्या स्टुडिओसारखी किंवा रामोजी फिल्मसिटीसारखी चित्रनगरी उभी करण्याकरिता त्यांनी जीवतोड मेहनत केली. कोरोना काळात देसाई यांच्या स्टुडिओला आग लागून नुकसान झाले. मात्र त्यानंतर खचून न जाता त्यांनी आपले स्वप्न पुन्हा उभे केले. 

या एनडी स्टुडिओकरिता २०१६ व २०१८ मध्ये त्यांनी तब्बल १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. स्टुडिओ गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाची व त्यावरील व्याजाची रक्कम २४९ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली होती. त्यामुळे कालिना येथील एडलवाइस अँसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्तीकरिता अर्ज केला होता. हा स्टुडिओ हे देसाई यांचे स्वप्न होते व ते स्वप्न भंग पावण्याच्या शक्यतेने आलेल्या तणावातून कदाचित त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असेल. देसाई यांच्या फोनमधील एक ऑडिओ क्लिप पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्यामध्ये चारजणांनी त्यांना त्रस्त केल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी नमूद केल्याचे समजते. कर्जदारांचा बँका व खासगी फायनान्स कंपन्या कसा छळ करतात हे अनेकदा उघड झाले आहे. परंतु देसाई यांच्यासारख्या सेलिब्रिटीशी तसाच दुर्व्यवहार झाला असेल तर ते फारच धक्कादायक आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची पोलिस सविस्तर चौकशी करून आरोपींना जेरबंद करतील. परंतु एवढा भव्यदिव्य पसारा उभा केलेल्या देसाई यांच्यावर अशी वेळ का आली, याचे चिंतन करणे हेही गरजेचे आहे. बॉलिवूड ही अनौपचारिक इंडस्ट्री आहे. येथील अनेक व्यवहार हे विश्वासावर चालतात. मालिका असो की चित्रपट; कथाबीजापासून सुरुवात होते. जे निर्माण होईल, ते दर्शकांच्या पसंतीला उतरेलच, याची कसलीही हमी नसते. लेखक असो की कलाकार, सहदिग्दर्शक असो की स्पॉटबॉय; हातावर पोट असलेले शेकडो लोक एका चित्रपट, मालिकेकरिता काम करीत असतात. त्यांना मानधनाकरिता दिलेला शब्द न पाळणे, कथाबीज चोरणे, एखाद्याच्या मालकीच्या स्टुडिओत मालिका किंवा चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे म्हणून त्याच विषयावरील मालिका अथवा चित्रपट आपण निर्माण करीत असल्याचे माध्यमांना भासवून मूळ निर्मात्याची गोची करणे, आपले नाव झालेय म्हणून नवख्या लेखक, कलाकाराला तू माझ्याकरता काम करतोय यातून तुला भविष्यात संधी मिळणार आहे तर मी तुला पैसे का मोजू, अशी दादागिरी करणे अशा अनेक अपप्रवृत्ती बॉलिवूडमध्ये बोकाळल्या आहेत.

काही काळ लोक कदाचित अशी धटिंगबाजी सहन करतील. मात्र हळूहळू लोक अशा प्रवृत्तींपासून दुरावतात. मात्र देसाई यांच्या स्टुडिओमध्ये शूटिंग होऊच नये याकरिता जर कुणी शक्तिशाली प्रतिस्पर्धी हेतुत: षडयंत्र करत असतील ते गंभीर आहे. ‘लगान’ चित्रपटात तिप्पट लगान द्यायला लागू नये याकरिता संघर्ष करणारा भुवन आपण पाहिला आहे. तीच खंबीरता देसाई यांनी ठेवली असती व त्या पालनकर्त्याकडे ‘हमरी उलझन सुलझाओ भगवन’ अशी प्रार्थना केली असती तर कदाचित देसाई आज आपल्यात असते..

Web Title: Editorial about Nitin Chandrakant Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.