बुडत्याचा पाय खोलात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 10:20 AM2023-05-17T10:20:15+5:302023-05-17T10:20:55+5:30
आज इम्रान सहानुभूतीच्या लाटेवर स्वार आहेत. ती लाट तयार करण्याचे श्रेय त्यांच्या विरोधकांकडेच आहे. पाकिस्तानात लष्कर शक्तिशाली असते, असा समज आहे.
शत्रूला मैदानावर ललकारणे हा इम्रान खान यांचा स्वभाव आहे! आता त्यांनी थेट लष्कराला अंगावर घेतले आहे. मला दहा वर्षे तुरुंगात टाकण्याचा डाव लष्कराचा आहे, असे सांगून त्यांनी देशभरात सहानुभूतीची लाट तयार केली आहे. आजवर एकाही राजकीय नेत्याला जमले नाही, ते इम्रान यांनी केले आहे. इम्रान हे किती कडवे धर्माध आहेत आणि त्यांचे राजकारण भारतद्वेषावर कसे उभे आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांना अर्थकारणाचे आकलन नाही आणि सूडभावनेने राजकारण करणे ही त्यांची जुनी खोड आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत इम्रान निवडून येणे ना पाकिस्तानच्या हिताचे आहे, ना भारताच्या. पण, आज इम्रान सहानुभूतीच्या लाटेवर स्वार आहेत. ती लाट तयार करण्याचे श्रेय त्यांच्या विरोधकांकडेच आहे. पाकिस्तानात लष्कर शक्तिशाली असते, असा समज आहे.
आपल्या सोईच्या नेत्याला खुर्चीवर बसवायचे आणि काम आटोपले की त्याचा खेळ संपवून टाकायचा, ही तिथल्या लष्कराची कार्यपद्धती. सध्या मात्र पाकिस्तानात कोणीच शक्तिशाली नाही. राजकीय नेतृत्व तर सक्षम नाहीच, पण लष्करही कमकुवत आहे. लष्करामध्येच दुफळी आहे. सध्याच्या लष्करप्रमुखांना इम्रान नको असले तरी लष्करातील एका मोठ्या गटाला लष्करप्रमुख मुनीर हेच नको आहेत. सत्तेत असलेले आघाडी सरकार अशक्त आहे, तर सर्वोच्च न्यायालयातही अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. 'नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्युरो' अर्थात 'नॅब'चा वापर सगळेच सत्ताधीश करत असले तरी, किंबहुना त्यामुळेच ती संस्थाही आता दुबळी झाली आहे. भारतद्वेषाने पछाडलेल्या आणि भारतालाच केंद्रस्थानी मानणाऱ्या अशा या पाकिस्तानात सध्या अर्थातच अराजकाची स्थिती आहे.
पाकिस्तानात सुरू असलेल्या इम्रान विरुद्ध लष्कर विरुद्ध न्यायव्यवस्था विरुद्ध सरकार असा नवा संघर्ष हा त्याचाच पुरावा आहे. वस्तुत: पाकिस्तानची क्षमता मर्यादित, पण फुशारक्या जास्त. त्यामुळे या देशात वास्तवाचे भान असलेले राजकारण कधीच विकसित होऊ शकले नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र होऊनही पाकिस्तान हा जबाबदार, स्वयंप्रज्ञ देश म्हणून कधी उभा राहिला नाही. पाकिस्तानचा वापर करून घ्यायचा आणि तो करून घेतला की त्याला वाऱ्यावर सोडायचे, असेच आजवर महासत्तांनी केले. अमेरिकेनंतर आता चीनही फार वेगळे काही करताना दिसत नाही. या महासत्तांच्या खेळांमध्ये पाकिस्तानी जनता भरडली जात असली, तरी त्याचे फारसे सोयरसुतक कुणाला नाही. पाकिस्तानात आर्थिक संकट भीषण आहे. कोरोना, युक्रेन युद्धानंतर ते गहिरे झाले आहे. पीठ, मीठ घेण्यावरून येथे मारामाऱ्या झाल्या. त्यात काही माणसे दगावली. अशी स्थिती असताना सत्तासंघर्षाचे 'महानाट्य' सुरू आहे. विद्यमान संघर्षात एकीकडे इम्रान खान आणि त्यांचा पक्ष 'पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ', तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान शाहबाज शरीफ आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश उमर अता बांदियाल हे एकीकडे, तर दुसरीकडे विद्यमान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आहेत. न्यायव्यवस्थेत इम्रान खान यांच्या बाजूचा एक प्रभावी गट असून, इम्रान हे न्यायालयाचे लाडके आहेत, असा आरोप इम्रान यांचे विरोधक करीत आहेत.
या नाट्याचा पूर्वार्ध इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटविण्यापासून सुरू होतो आणि शेवट आता होऊ घातला आहे, असे दिसते. इम्रान लष्करासमोर किती टिकतात, यावर सगळे अवलंबून आहे. लष्करासमोर आजवर भल्याभल्यांनी नांगी टाकली आहे आणि ज्यांनी लष्कराला जुमानले नाही, त्यांना संपविण्यातही आले आहे. लष्कराच्याच हाती सत्ता राहील, याची काळजी लष्कराने आतापर्यंत पुरेपूर घेतली आहे. क्रिकेटपटू ते राजकारणी असा इम्रान खान यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहता इतर नेत्यांप्रमाणे लष्करामुळेच ते सत्तेत आले होते आणि लष्करामुळेच त्यांचे पद गेले. पण, आपण लष्कराला आव्हान देऊ शकतो, असे भासवून आज तरी ते दंड थोपटून उभे आहेत. पाकिस्तानच्या या संघर्षाला सध्याच्या आर्थिक स्थितीची पार्श्वभूमी आहे. जनतेचे लक्ष दुसरीकडे जावे आणि दैनंदिन कचाट्यात सापडलेल्या जनतेने बंड करून उठू नये, असेही कारस्थान यामागे असू शकते. पाकिस्तानातील सध्याचा पेच निवडणुकांतून सुटू शकतो, असे तेथील अभ्यासकांना वाटते. तशी मागणी इम्रानही करताना दिसत आहेत. निवडणुका कितीही लांबवल्या, तरीही घोडामैदान फार दूर नाही. त्यात काय होईल, ते येणाऱ्या काळात समजेलच, अर्थात, त्यामुळे है अराजक संपेल, असे मात्र नाही.