विनेश, तू कधीच जिंकलीस !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 09:49 AM2024-08-08T09:49:32+5:302024-08-08T09:56:08+5:30

ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकी खेळी बघण्यासाठी साऱ्या देशाच्या नजरा तिच्याकडं वळल्या होत्या. एकाच दिवशी तीन अव्वल मल्लांना हरवून ती अंतिम फेरीत लढण्यासाठी सज्ज झाली होती. मात्र...

Editorial about Vinesh Phogat olympics | विनेश, तू कधीच जिंकलीस !

विनेश, तू कधीच जिंकलीस !

विनेशने प्रतिकूलतेला चारीमुंड्या चीत करून आपली पात्रता कधीचीच सिद्ध केली होती. तिला अपात्र ठरवणाऱ्यांची लायकी मात्र अखेर समोर आली. विनेशनं सुवर्णपदक जिंकलं असतं तर ती विजेती झाली असतीच, पण आता मात्र ती महान ठरली आहे! अवघ्या देशाचा आवाज झाली आहे. पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात झुंजणाऱ्या प्रत्येक मुलीची ती ‘आयकॉन’ झाली आहे. ‘देशातल्या हरेक तरुणीने समोर यावं आणि लढावं, यासाठी मी खेळत आहे. माझी ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. माझं करिअर झालं आहे. पण, मी उद्याच्या पिढ्यांसाठी खेळत आहे,’ हे प्रेरणादायी शब्द होते विनेश फोगाटचे. दीर्घ अशा संघर्षातून तिनं स्वतःला घडवलं. ऑलिम्पिकमधील तिच्या लढती पाहून, एकच वाक्य प्रत्येक भारतीयाच्या ओठी आले-  ‘विनेश, तू जिंकलीस!’ विनेशच्या कष्टांचं चीज झालं.

ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकी खेळी बघण्यासाठी साऱ्या देशाच्या नजरा तिच्याकडं वळल्या होत्या. एकाच दिवशी तीन अव्वल मल्लांना हरवून ती अंतिम फेरीत लढण्यासाठी सज्ज झाली होती. मात्र, शंभर ग्रॅम अधिकच्या वजनाने घात केला. ५० किलोगटामध्ये तिचे वजन शंभर ग्रॅम जास्त भरले आणि ऑलिम्पिक स्पर्धेतूनच अपात्र ठरवण्याचा ‘न्याय’ केला गेला. या निर्णयाने सारा देश हळहळला. 

विनेशला काय वेदना झाल्या असतील, त्याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. अंतिम फेरीत जाऊन किमान रौप्यपदक निश्चित झाल्याचा आनंद साऱ्या देशाला होता. पण, आता ती पदकाविना भारतात परत येईल. असे असले, तरी ती जिंकली आहे. कारण, नियमांच्या कचाट्यात कुणी कितीही पकडलं, तरी ‘विनर’ कोण आहे, हे सर्वांना अगदी स्पष्ट कळतं. विनेश तू खरंच जिंकलीस. तू लोकांच्या हृदयात स्थान मिळवलंस. अन्यायाविरोधात आवाज उठविणारी तू रणरागिणी आहेस. हार-जीत कितीही झाल्या, तरी लढत राहायचे, हा संदेश देणारी तू योद्धा आहेस. हरयाणामध्ये कुस्तीगिरांच्या घराण्यातच विनेशचा जन्म झाला. तिचे वडील राजपाल फोगाट, तिची चुलत भावंडं गीता आणि बबिता फोगाट यांचेही कुस्तीमध्ये योगदान आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लहान वयातच मल्लांना लोळवण्याची विनेशची जिद्द साऱ्या देशवासीयांनी पाहिली आहे. 

बॉलिवूडमधील गाजलेला चित्रपट ‘दंगल’ हा विनेशच्या प्रेरणादायी प्रवासावरच आधारित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ती झळकली. कुस्तीमध्ये देशाला तिनं अनेक पदकं मिळवून दिली. देशात महिला कुस्तीगिरांसाठी केवळ प्रेरणाच नव्हे, तर कुस्तीमधील अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून तिचा वावर होता. रिओ आणि टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पदकानं तिला हुलकावणी दिली. रिओ इथं तर तिला गंभीर दुखापत झाली. स्ट्रेचरवरून बाहेर नेण्याची वेळ आली. कुस्ती पूर्णपणे थांबण्याची वेळ आली. मात्र, हार मानेल, ती विनेश कसली? फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तिनं पुन्हा भरारी घेतली. रिओनंतर केवळ टोकियोच नव्हे, तर आता पॅरिस ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाली. तीन ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी विनेश एकमेव महिला ठरली. मंगळवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात जागतिक कुस्तीमध्ये अजिंक्य समजल्या जाणाऱ्या जपानच्या युई सुसाकीला तिनं शेवटच्या नऊ सेकंदांत धूळ चारली. 

युक्रेनच्या ओक्साना लिवाचला लोळवलं. क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध एकहाती विजय मिळवला. काल विनेशनं संपूर्ण देशवासीयांची मनं जिंकली. तिच्या विजयानंतर सर्वांना आठवलं, ते दिल्लीतील तिचं आणि इतर कुस्तीगिरांचं आंदोलन. राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेचे तेव्हाचे अध्यक्ष बृजभूषणसिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. आंदोलन चिघळले. विनेशसह इतर आंदोलकांवर बळाचा वापर झाला. आजही तो खटला न्यायालयात आहे. या आंदोलनानंतरही विनेशनं खेळाकडं दुर्लक्ष केलं नाही. अथक प्रयत्न करून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाली. जिद्दीनं खेळली. शंभर ग्रॅमनं विनेशचं वजन अधिक भरलं, म्हणून तिला अपात्र ठरवलं. तिनं जिंकलेले सामनेही अवैध ठरवले. 

ऑलिम्पिकच्या विश्वासार्हतेवरच त्यामुळं खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वास्तविक, स्पर्धकांचे वजन तपासूनच स्पर्धकांना सामने खेळू दिले जातात. मंगळवारी विनेशने सामने खेळण्यापूर्वी तिचं वजन नक्कीच तपासलं गेलं असणार. अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन वाढल्याचा निष्कर्ष काढला गेला. तिला पदकापासून वंचित ठेवणं हा न्याय होऊ शकत नाही. काहीतरी कारस्थान होऊ शकते, अशी शंका विनेशने यापूर्वीच व्यक्त केली होती. अगदी तसेच घडले. ऑलिम्पिकच्या प्रतिष्ठेचाच हा प्रश्न आहे. याची चौकशी होणे आवश्यक आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काहीही झालं असलं, तरी विनेश, तूच जिंकली आहेस !

Web Title: Editorial about Vinesh Phogat olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.