अजाण मुलांना ‘गुन्हेगार’ होण्यापूर्वी वाचवता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 07:38 AM2024-08-06T07:38:33+5:302024-08-06T07:39:12+5:30

१६ ते १८ या वयोगटातील मुले संशयित असलेल्या गुन्ह्यांची संख्या देशभरात वाढते आहे. या प्रश्नाबाबत पोलिसांनी संवेदनशील असले पाहिजे.

editorial artical Can unsuspecting children be saved before they become 'criminals'? | अजाण मुलांना ‘गुन्हेगार’ होण्यापूर्वी वाचवता येईल?

अजाण मुलांना ‘गुन्हेगार’ होण्यापूर्वी वाचवता येईल?

प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र

दिल्लीत घडलेल्या निर्भया हत्याकांडासारख्या निर्घृण घटनांच्या आठवणी मनातून कधीच पुसल्या जाऊ शकत नाहीत. दुर्दैवाने देशातील नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही विभागांतून याच स्वरूपाच्या भयानक घटनांच्या वार्ता आजही आपल्या कानावर आदळत आहेत. काही घटनांत एखाद्या असहाय बालिकेवर सामूहिक बलात्कार केलेला असतो किंवा एखाद्या मुलीला आपण कुणी वेगळेच असल्याचे भासवून लबाडीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला असतो. अशा घृणास्पद घटनांचे व्हिडीओही बनवले जातात आणि बळी पडलेली मुलगी जिवंत राहिलीच असेल, तर तिला सतत धमकावत या अमानुष अपराधाची वारंवार पुनरावृत्ती केली जाते. काही घटनांत  बळी पडलेल्या मुलीने बलात्काऱ्याशी लग्न करायला नकार दिला तर  निर्दयपणे तिचा  खून करून निर्जन ठिकाणी तिच्या मृतदेहाची  विल्हेवाट लावली जाते.

तपासातून निष्पन्न झाले आहे की, अल्पवयीनांमधील १६ ते १८ या वयोगटातील मुलांनीच यापैकी अनेक कृत्ये केलेली असतात. सामूहिक किंवा वैयक्तिक बलात्कार, दरोडे आणि खूनच नव्हेतर, अल्पवयीन मुलांनी नशाधुंद अवस्थेत आलिशान गाड्या बेदरकारपणे चालवून निरपराध पादचारी किंवा दुचाकीस्वारांना चिरडून ठार मारल्याच्या घटनाही नोंदविल्या जात आहेत.

अशा हत्या घडल्यानंतर दरवेळी मोठाच हलकल्लोळ माजतो. माध्यमे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी वर्गाला जाब विचारू लागतात. सरकारच्या कार्यतत्परतेबद्दल प्रश्न उपस्थित होतात. लोकांच्या रागाचा पारा अनेकदा एवढा चढलेला असतो की, संशयित आरोपी अल्पवयीन असला तरी त्याला ताबडतोब फासावर चढविण्याची मागणी हमखास केली जाते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या नोंदीनुसार अशा प्रकारच्या गुन्ह्यांत १६ ते १८ या वयोगटातील मुले संशयित असलेल्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. २०१५ च्या बाल न्याय कायद्यानुसार १८ वर्षांखालील प्रत्येकाला अल्पवयीन मानले जाते. तथापि याच कायद्यात निर्घृण गुन्ह्याच्या संदर्भात मात्र १६ ते १८ वयोगटातील अल्पवयीनास प्रौढ समजण्याची तरतूद केली गेली आहे. असे क्रूर गुन्हे म्हणजे किमान सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असणारे गुन्हे होत.

अनेक कारणांमुळे लहान मुले गुन्हेगारीकडे वळतात. विभक्त कुटुंब, वाजवीपेक्षा मोठे कुटुंब, अत्यावश्यक गरजा भागविणेही अशक्य करणारे दारिद्र्य अशा अनेक प्रतिकूल बाबींमुळे आईवडिलांकडून मुलांना  पुरेसे प्रेम व देखभाल न मिळणे हेही त्यातील एक महत्त्वाचे कारण होय. अस्ताव्यस्त नागरीकरण आणि इंटरनेटची विनायास उपलब्धता यामुळे नको त्या गोष्टी मुलांच्या नजरेला पडतात. यातून मुलांना पॉर्न व्हिडीओज् पाहण्याचे व्यसन लागते. विविध स्वरूपाच्या जाहिराती,  टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील सीरिअल्स आणि   चित्रपट याचाही घातक परिणाम होतोच. पौगंडावस्थेतील मुले आपल्या मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या गरजा  भागवू पाहतात, मागण्या पुरवू लागतात. त्यासाठी चोऱ्यामाऱ्या करायलाही ती मागेपुढे पाहत नाहीत. 

अल्पवयीन आरोपींच्या जबाबांच्या विश्लेषणातून एक गोष्ट उघडच दिसून येते की, यातील बहुतेक मुले ही वंचित पार्श्वभूमीतूनच आलेली असतात. या सर्वांनीच शाळा मध्येच सोडून दिलेली असते. व्यावसायिक कौशल्य पदरी नसल्यामुळे त्यांच्यापैकी अनेक जण रोजंदारीवर काम करीत असतात. कुटुंबच धड नसल्यामुळे या मुलांना मानसिक किंवा सामाजिक आधार लाभण्याचा मार्ग बंदच असतो. दारिद्र्य, लहान वयातच कामाला लावणे, पालकांकडून आबाळ हेच या मुलांच्या कौटुंबिक परिस्थितीचे चित्र असते. काही वेळा आकस्मिक मृत्यू, कुटुंबातील कुणाचा तरी गृहत्याग अशाही धक्कादायक गोष्टी या मुलांच्या बाबतीत घडलेल्या असतात. निर्घृण कृत्यात सहभागी होणाऱ्या मुलांच्या यादीत आता पालकांसमवेत राहत असलेल्या सधन कुटुंबातील मुलांची संख्या वाढतच असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्डने संकलित केलेल्या माहितीतून अधोरेखित होते. अमली पदार्थांचे व्यसन याला मुख्यत: कारणीभूत असते.

पोलिस अधिकाऱ्यांनी या मुलांबाबत संवेदनशील राहायला हवे. स्वयंसेवी संघटना, बाल मानसोपचार तज्ज्ञ, समाजसेवी कार्यकर्ते यांचे साहाय्य घ्यायला हवे. नागपूर येथे पोलिस आयुक्त म्हणून काम करीत असताना या मुलांना योग्य ते समुपदेशन लाभावे अशी खात्रीलायक व्यवस्था मी करून घेतली होती. जे शाळेत जाण्याच्या वयाचे होते त्यांना शाळेत दाखल करण्यात येई. इतरांना ड्रायव्हिंगसारख्या काही व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाई. अशा प्रशिक्षणानंतर ही मुले जबाबदार बनल्याचे दिसून आले. आपल्या कुटुंबाच्या मिळकतीत ती भर घालू  लागली. गुन्हेगारी मार्गाला लागू शकतील, अशा परिस्थितीतील मुलांचा शोध घेण्याचे प्रयत्नही पोलिसांनी करीत राहिले पाहिजे. एखाद्या शहरात गुन्हेगारीची निर्मिती केंद्रे असलेली काही विशिष्ट भौगोलिक क्षेत्रे असतात. त्यांचा छडा लावून त्या प्रदेशात नियमित गस्त घातली गेली पाहिजे. क्रीडा स्पर्धा, सुटीतील शिबिरे, जाहीर बँड वादन असे अनेक रंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात पोलिस आयुक्त या नात्याने मी पुढाकार घेतला होता. त्यामुळे एकजात सर्वांच्याच मनात उत्साह संचारल्याचा सुखद अनुभव मी घेतला आहे.

Web Title: editorial artical Can unsuspecting children be saved before they become 'criminals'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.