‘सहीपुरत्या सरपंच’ महिला पूर्वी होत्या, आता दबाव झुगारता येतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 07:38 AM2024-05-04T07:38:34+5:302024-05-04T07:39:20+5:30
सर्वपक्षीय स्त्री खासदारांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री! या प्रकल्पात नंदुरबार येथील खासदार हिना गावित यांच्याशी झालेल्या गप्पांचा सारांश.
शायना एन. सी. भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या
सोळाव्या लोकसभेत तुम्ही सर्वात कमी वयाच्या खासदार होतात. एकीकडे एमबीबीएस, एमडी आणि नंतर एलएलबी असे शिक्षण आणि दुसरीकडे राजकारण; हे कसे जमवले?
मी आदिवासी भागातली आहे. नंदुरबारमध्ये माझे शिक्षण झाले. माझ्या मतदारसंघातले आरोग्याचे अनेक प्रश्न मी लहानपणापासून पाहत आले आणि तेव्हाच ठरवले की, आपण डॉक्टर होऊन इथे काम करायचे. या भागात आरोग्य शिबिरे घेत असताना अन्य प्रश्नही मला समजत गेले, केवळ डॉक्टर म्हणून मी ते सोडवू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर मी राजकारणात यायचे ठरवले, जाणीवपूर्वक राजकारणात आले आणि निवडणूक लढवली.
संसदेत तुम्ही केलेल्या भाषणाचे कौतुक झाले होते. त्या अनुभवाबद्दल काय सांगाल?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मी एक अनुभव सांगितला होता. नंदुरबार जिल्ह्यातल्या आरोग्य शिबिरात एका वृद्ध व्यक्तीवर आम्ही शस्त्रक्रिया केली. ते मला म्हणाले, ‘या मोफत शस्त्रक्रिया शिबिरामुळे माझ्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली; आता तुम्ही माझ्या घरी या.’ शिबिर संपल्यावर माझ्या गाडीतून त्यांच्या पाड्याकडे त्यांना घेऊन मी निघाले. एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवायला सांगितले. म्हणाले, ‘गाव आले!’- पण तिथे तर काहीच नव्हते. ते म्हणाले, ‘तुम्ही माझ्याबरोबर चला, मी दाखवतो तुम्हाला’- मग काही अंतर गेल्यावर त्यांनी दरीत असलेले त्यांचे गाव मला दाखवले. तिथे जायला रस्ताच नव्हता! त्यानंतर मग रस्त्याचे काम सुरू झाले!
आदिवासी क्षेत्रातील महिलांना कुपोषणाचा सामना करावा लागतो. इतक्या वर्षांमध्ये आपण हा प्रश्न सोडवू शकलेलो नाही. त्याबाबत तुमचे अनुभव, निरीक्षणे आणि मत काय आहे?
नंदुरबार जिल्ह्याचे नाव घेतल्यावर कुपोषणाचा प्रश्न समोर येतो. मी डॉक्टर आणि खासदार या नात्याने असे ठरवले होते की, आपण आरोग्य आणि त्यातही कुपोषणाला प्राधान्य दिले पाहिजे. कुपोषण हटविण्यासाठी भारत सरकारच्या योजना लोकांपर्यंत न्यायच्या होत्या. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. याबाबत आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांमध्ये जागृती करणे फार महत्त्वाचे आहे. आदिवासी क्षेत्रातील महिला गर्भवती असताना नियमित चाचण्या करून घेत नाहीत. हिमोग्लोबिन तपासले जात नाही. अनेकदा बाळंतपणही घरीच होते. यात बालक कुपोषित असेल तर लक्षात येत नाही. त्याची प्रकृती गंभीर झाल्यावर कळते.
महिला बालविकास खात्याच्या योजना अधिकाधिक महिला आणि त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम महत्त्वाचे आहे. त्या दिशेने बरेच प्रयत्न झाले. परिणामी पाचव्या कुटुंबकल्याण आरोग्य सर्वेक्षणात नंदुरबारची कामगिरी सर्वात चांगली झाल्याचे नोंदले गेले. कुपोषणावर देशातील उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सध्या नंदुरबारचा समावेश होतो.
तुम्ही तरुण आहात. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन ज्या तरुणींना राजकारणात यावेसे वाटत असेल, त्यांना काय सांगाल?
जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात आले पाहिजे. महिला अत्यंत प्रामाणिकपणे प्रत्येक काम सर्वोत्तम करू शकतात म्हणून त्यांनी राजकारणात येण्याची खरी गरज आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्व स्तरांवर महिलांचा सहभाग बरेच महत्त्वाचे बदल घडवून आणू शकेल. सध्या राजकारणात असलेल्या महिलांनीच ही जबाबदारी उचलली पाहिजे आणि ही प्रक्रिया सुरू झालेली मी पाहते आहे. पूर्वी महिला सरपंच व्हायची, पण सहीपुरती... आता शिकलेल्या महिला ही परिस्थिती जिद्दीने बदलत आहेत!