प्रा. तेलतुंबडे यांनी एवढा गंभीर कोणता गुन्हा केलाय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 11:23 AM2019-01-18T11:23:35+5:302019-01-18T11:32:24+5:30
प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात बनावट गुन्हा नोंदविला गेल्याची चर्चा सुरू असतानाच, त्यांना कोणत्याही क्षणी अत्यंत प्रतिगामी मानल्या गेलेल्या कायद्याखाली अटक होण्याची शक्यता असल्याने पुरोगामी विचारवंतांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
- राजू नायक
प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात बनावट गुन्हा नोंदविला गेल्याची चर्चा सुरू असतानाच, त्यांना कोणत्याही क्षणी अत्यंत प्रतिगामी मानल्या गेलेल्या कायद्याखाली अटक होण्याची शक्यता असल्याने पुरोगामी विचारवंतांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
प्रा. आनंद तेलतुंबडे गोव्यातील साखळी येथील देशातील एक प्रमुख व्यवस्थापकीय संस्था मानल्या गेलेल्या गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक आहेत. ‘अर्बन नक्षल’ म्हणून पुणे पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केल्यापासून देशातील विचारवंतांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणात पोलीस अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज कायद्यांतर्गत त्यांना अटक करू इच्छित असल्याने त्यांच्याबरोबरच देशातील बुद्धिवाद्यांमध्ये असलेले चिंतेचे वातावरण रागात परावर्तीत होऊ लागले आहे, शिवाय स्वत: प्रा. तेलतुंबडे यांनी आपल्या समर्थनासाठी जनतेला भावनिक हाक दिल्याने तर या प्रश्नाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले तर आश्चर्य नाही.
लेखिका अरुंधती रॉयसह अनेक जणांनी प्रा. तेलतुंबडे यांचा चालू असलेला राजकीय छळ व अत्यंत जुलमी कायद्याखाली त्यांना अटक होण्याची शक्यता याचा निषेध नोंदविताना देशातील आजची स्थिती व उच्चार स्वातंत्र्याबरोबर कमकुवत समाजांना नेस्तनाबूत करण्याचा चाललेला प्रयत्न याचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले आहे. एक गोष्ट खरी आहेय की कन्हैया कुमार, उमर खलिद व अनिर्बान भट्टाचार्य आदी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्यांविरुद्ध देशविरोधी कारस्थान रचल्याचा आरोप ठेवल्यानंतर प्रा. तेलतुंबडे यांनाही गंभीर आरोपात गोवण्याचा प्रयत्न प्रागतिक विचारवंत सहन करणारच नाहीत. एका बाजूला सतत हिंदुधार्जिण्या गटांनी प्रागतिक विचारवंतांना लक्ष्य बनविणे, सनातनी प्रवृत्तींकडून त्यांच्या झालेल्या हत्या आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडून त्यांचे होणारे दमन हा नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय चिंतेचाही विषय होऊ शकतो, त्यामुळे तर जगभर भारतीय राजकारणाची छी: थू: होऊ शकते व काही जण हिटलर राजवटीशी आपली तुलना करू लागले तर त्यांना दोष देता येणार नाही. यापूर्वी गुजरात हत्याकांडाच्या विषयावरून भारताचे नाव जगभर बदनाम झाले होते.
प्रश्न आहे तो, विद्यार्थ्यांविरोधात देशविरोधी कारस्थानाचे गुन्हे नोंदविले जावेत का आणि प्रा. तेलतुंबडे यांच्यासारख्या असामान्य शिक्षक व अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथांच्या लेखकाविरोधात- केवळ त्यांनी जळजळीत लिहून सत्तेला आव्हान दिले म्हणून अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन कायद्याखाली त्यांना अटक करावी का? या कायद्याखाली अटक झाली तर प्रा. तेलतुंबडे यांना जामीन न मिळता कित्येक महिने तुरुंगात डांबले जाऊ शकते.
स्वत: प्रा. तेलतुंबडे यांनी जे वैयक्तिक आवाहन केले आहे, त्यात आपल्या संशोधनाचा उल्लेख करून आपल्या या विद्यार्थीस्नेही कार्यात अडथळे येणार असल्याचे नोंदविले आहे. मी ज्ञानाशी संबंधित महाविद्यालयात काम करतो, तेथे विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन करतो, माझे ग्रंथलेखन अव्याहत चालू आहे, त्यासाठी वाचनालयात, ग्रंथ वाचन, लॅपटॉपशी काम असे कार्य सतत होत असते. त्याला आडकाठी येऊ शकते. माझ्या व्यावसायिक कारकिर्दीला डाग लागू शकतो आणि कुटुंब, माझी पत्नी जी बाबासाहेब आंबेडकरांची नात आहे, माझ्या मुली ज्या यापूर्वीच अस्वस्थ झाल्या आहेत, त्यांची बेचैनी वाढेल व माझे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते...
प्रा. तेलतुंबडे म्हणतात, मी गरीब कुटुंबातून आलो, देशातील सर्वोत्तम संस्थांमधून चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण झालो व अहमदाबाद आयआयएममधून शिकल्यानंतर मी सहज आरामी पद्धतीने जीवन जगू शकलो असतो; परंतु त्यासाठी मला आजूबाजूला घडणाºया सामाजिक अन्यायापासून तोंड वळवावे लागले असते.
परंतु समाजापासून फटकून वागण्याचा माझा पिंडच नाही, म्हणून मी अनेक बाबतीत त्याग करून अशी जीवनशैली अवलंबिली ज्यात कमी खर्चात चरितार्थ चालवत बौद्धिक कामाला वाहून घेतले, ज्यात लोकांवरच्या अन्यायाचे थोडे तरी निवारण करणे शक्य होईल. विद्यार्थीदशेपासून मी कार्यकर्ता चळवळीत असल्याने पुढे मी लोकशाही हक्क संरक्षण समिती (सीपीडीआर), शिक्षण हक्क मंच या संस्थांसाठी काम केले व त्यांचा मी सध्या अनुक्रमे सरचिटणीस व अध्यक्षीय मंडळाचा सदस्य आहे. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत प्रामाणिक व सचोटीने कार्य केले, त्यामुळे एक गुन्हेगार म्हणून सरकारी यंत्रणा माझ्याकडे पाहू शकते याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.
पुण्यातील एल्गार परिषदेच्या विरोधात ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून चिरडण्याचा प्रयत्न झाला व मानवी हक्कांचे पुरस्कर्ते, विचारवंत व कार्यकर्ते यांचे दमन करणे व लोकचळवळीचा नि:पात करण्यासाठी ज्या प्रकारे ही यंत्रणा कामाला लागली आहे, तो इतिहासात यापूर्वी घडला नव्हता. ही सत्ता एका बाजूला चोर व दरोडेखोरांना पाठीशी घालून निष्पाप लोकांना गुन्हेगारीच्या चक्रात अडकवत असल्याचे जगात सतत सामोरे आलेय. मुक्त भारतातील लोकशाही मार्गाचा अवलंब न करता विचारवंतांचे दमन करण्याचा हा प्रयत्न असा पहिलाच प्रकार मानावा लागेल.
भीमा-कोरेगाव येथील मेळावा न्या. पी. टी. सावंत व न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्याच संकल्पनेतून तयार झाला व त्यासाठी जे कार्यकर्ते व पुरोगामी विचारवंत बोलवले गेले, त्यात मीही होतो; परंतु कार्यभारामुळे मी त्यात सहभागी होऊ शकलो नव्हतो. तेथे ज्या कारणासाठी मेळावा घेतला, जुलमी पेशवेशाहीचा शेवट आणि ज्या महारांनी बलिदान दिले त्यांचा गौरव करणे- तो मला मान्य आहे; परंतु पेशव्यांच्या ब्राह्मणी राजवटीतील आपल्या छळाचा सूड उगविण्यासाठी महारांनी ही लढाई जिंकली होती हे ठसविण्यासाठी जाणूनबुजून एल्गार परिषदेचा वापर करणे मला पटत नव्हते. अशा पद्धतीने विपर्यास्त इतिहास सांगितला तर दलितांचे इतरांशी मनोमीलन होण्यास अडथळे निर्माण होतील असे मला वाटले व मी तशी स्पष्ट भूमिका मांडणारा लेख ‘द वायर’मध्ये लिहिला, ज्याला दलितांकडून अत्यंत क्रोधपूर्वक प्रतिसाद मिळाला; परंतु मी त्या माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. वास्तवात माझी ही भूमिका व त्याला लाभलेल्या प्रतिक्रिया पाहाता कोणीही मी दलितांना भडकावले असा आरोप दुरान्वयानेही करू शकणार नाही; परंतु माझ्याविरुद्ध अविवेकी पद्धतीने आरोप ठेवायचेच म्हटल्यावर अशा लोकांना कोण रोखू शकणार? दलितांबरोबर कधी नव्हत्या अशा मराठा लोकांच्या व एकूण २५० संघटना त्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. भाजपा-सेना सरकार स्थापन होऊन राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री बनल्यापासून मराठ्यांचा असंतोष वेगवेगळ्या पद्धतीने प्रगट होताना दिसतोय, त्याचे एक रूप मराठा मोर्चाच्या रूपाने सामोरे आले- ज्याचे कारण झाले एका मराठा मुलीवरचा बलात्कार व हत्या- ज्यांनी हे कृत्य केले त्यात काही समाजकंटकांसह एक दलितही होता. प्रशासनाने खरे म्हणजे या प्रकरणात वेगाने कारवाई केली होती. परंतु या त्यांच्या ऐक्यातून मराठा राखीवतेची मागणी पुढे आली. मराठ्यांना पुढे राज्यातील ब्राह्मणी वर्चस्वाचा मुकाबला करण्यासाठी दलितांबरोबर ऐक्य करावेसे वाटले. त्यातून एल्गार परिषदेत काही युवा संघटना सहभागी झाल्या व त्यातून एक घोषणा दिली गेली, ‘पेशवाई गाडून टाका!’ हा प्रतिकार प्रतिकात्मक असला तरी तो भाजपाची राजवट फेकून देऊ पाहातो असे चित्र निर्माण झाले. त्यानंतर दलित-मराठा यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न झाले....
प्रा. तेलतुंबडे यांनी या घटनांचा उल्लेख करून आपण कसे एल्गार परिषदेला उपस्थित नव्हतो व आपल्या कुटुंबीयांच्या लग्नासाठी ३१ डिसेंबर रोजी पुण्यात गेलो व त्यानंतर नातेवाईकांना भेटलो अशी माहिती दिली आहे, जी पटणारी आहे. ते म्हणतात, पुण्यात असल्याने मी सहज परिषदेला उपस्थित राहू शकलो असतो; परंतु मलाच त्याच्याविषयी किंतु असल्याने व गोव्यात संस्थेत मला कामही असल्याने मी ती चुकविली व गोव्यात परतलो.
परंतु माओवाद्यांची या सर्व प्रकरणाला फूस होती व त्यांनी निधी पुरवला असा नागपूर, मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनाव रचला व अनेकांच्या घरावर धाडी टाकल्या व अनेकांना अटक केली. हा कट पंतप्रधानांची हत्या करण्यापर्यंत जात असल्याचाही हा त्यांचा बनाव म्हणतो. त्यातून आमच्याविरोधात अत्यंत जुलमी यूएपीए सारखे कायदे लागू करण्याची मजल त्यांनी गाठली आहे. पोलिसांनी ज्या पद्धतीने धाडी टाकल्या त्याही संशयाला वाव देणाºया आहेत. पोलीस बनावट पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न हरेक प्रकारे करीत आहेत. मी माझ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते; परंतु न्यायालय म्हणाले की या प्रसंगी ते पोलीस तपासात हस्तक्षेप करू इच्छित नाहीत व मी संबंधित कोर्टातच अटकपूर्व जामिनासाठी जावे. मला आता पुणे कोर्टात त्यासाठी जावे लागेल.
प्रा. तेलतुंबडे यांची व्यथा वाचून मीही अस्वस्थ झालो. जर ते या परिषदेस हजर नव्हते तर एक बनावट प्रकरण तयार करून पोलिसांनी अशा प्रकारे कुभांड रचणे आपल्या लोकशाही व उच्चार स्वातंत्र्याची कास धरणाऱ्या देशासाठी अत्यंत घातक मानले पाहिजे.