वास्तुशास्त्राच्या नावाने वास्तूची वाताहत नको
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 09:22 AM2024-09-18T09:22:21+5:302024-09-18T09:22:45+5:30
अगं अग्नीची दिशा आहे तिथे तुमची बेडरूम आहे. तुम्हा नवरा बायकोत रोज वाद, भांडणे होतील त्यामुळे...' ते ऐकताच आमच्या सौभाग्यवतीने मंद स्मित केले.
अॅड. राजेश नार्वेकर, निवृत्त अध्यक्ष प्रशासकीय लवाद
घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी जमिनीचे परीक्षण करणे आवश्यक असते. भूकंप झाला तरी घर सुरक्षित राहील, असा पाया घालण्याचे तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. जमिनीवर मार्बल किंवा टाइल्स बसवता येतात. राजस्थानहून मार्बल आणावेत. पण इथल्या तज्ज्ञ मार्बल फिटरला सोबत न्यावे. मोठमोठे मार्बल असतात. काहींना सूक्ष्म भेगा असतात. सामान्य नजरेला त्या दिसत नाहीत. प्रवासात मार्बलवरील भेगा रुंदावतात. गोव्यात पोहोचेपर्यंत काही मार्बल फुटून तुकडे पडतात. व्यापाऱ्याने आपला 'माल' बदलला, खराब माल पाठवला अशी तक्रार करतात. मार्बल बसवायला फिटर अव्वाच्या सव्वा दाम आकारतात. बसवल्यावर पॉलीश करायला आणखी खर्च येतो. मार्बल हा नैसर्गिक दगड असल्यामुळे त्याला डाग पडतातच. उलट टाइल्स बसवल्यास कमी वेळ व कमी खर्च येतो. घरात रंगसंगती आपल्या आवडीनुसार करावी. टिकावू रंग वापरावेत. घर तयार झाल्यावर सभोवती कंपाउंड बांधल्यास उत्तम. तुळशी वृंदावन बांधावे, पण मुख्य प्रवेशद्वाराची वाट अडवणारे, फार मोठे असू नये. वास्तुशास्त्रानुसार घर बांधले की पुढे काही कटकटींना सामोरे जावे लागत नाही, असे काही जण सांगतात. वास्तुशास्त्र नेमके किती खरे हे मला माहीत नाही. ज्या विषयातलं मला गम्य नाही त्यावर बोलणे योग्य नाही. वास्तुशास्त्राचा एक अनुभव मात्र मी सांगू शकतो. खूप वर्षांपूर्वी माझ्या एका अशिलाने पणजीत फ्लॅट विकत घेतला. राहायला आल्यावर काही दिवसांनी आजारी पडला.
औषधोपचारापेक्षा वास्तुशास्त्रावर त्याचा जास्त विश्वास. त्याने पैसे खर्च करून वास्तुशास्त्रज्ञाला बोलावले. त्याने फ्लॅटमध्ये 'दोष' असल्याचे निदान करून एक खिडकी बंद ठेवणे, दरवाजा उघडण्याची दिशा बदलणे, गॅलरीतील कुंड्यांतील फुलझाडे बदलणे, जमिनीवरील टाइल्स काढून दुसऱ्या रंगाचे टाइल्स बसवणे असे उपाय सुचवले. ते करताना माझ्या अशिलाला लाखभर रुपये मोजावे लागले. फ्लॅटची मोडतोड झाली ती वेगळीच. ही सगळी 'अदलाबदली' झाल्यावर आता आपण वास्तुशास्त्रानुसार सुरक्षित झालो, पुढे सगळे सुरळीत होईल, असे माझ्या अशिलाला वाटले. पण दुर्दैवाने वर्षाच्या आत त्याचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या मुलाने फ्लॅटच विकून टाकला.
खूप वर्षांनी एका जुन्या अशिलाची भेट झाली. आता काय करता? विचारल्यावर म्हणाला, वास्तुशास्त्राचा कोर्स केला आहे. कुणी घर बांधत असेल किंवा फ्लॅट घेत असेल तर मी सल्ला देतो. 'आता कुठे राहाता?' विचारल्यावर म्हणाला, एक फ्लॅट घेतलाय, तिथेच राहातो. काही दिवसांपूर्वी सकाळी वृत्तपत्र चाळताना बँकेची नोटीस वाचली होती. त्यात या अशिलाचे व त्याच्या बायकोचे नाव कर्जदार म्हणून छापले होते. फ्लॅट घेताना काढलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेने फ्लॅटवर जप्ती आणली होती. त्याची पावणी होणार होती. मनात विचार आला, फ्लॅट घेताना तो वास्तुशास्त्रानुसार योग्य नव्हता हे वास्तुशास्त्राचा कोर्स केलेल्या या अशिलाला कसे कळले नाही?
एक स्वानुभव असा की माझं लग्न झाल्यावर एका वर्षात मी दुसरा फ्लॅट घेतला. नव्या वास्तूत पत्नी, आई व बहिणींसह राहायला गेलो. एक दिवस एक गृहस्थ आमच्या घरी आले. ते पत्नीला ती शाळेत असताना गणित शिकवायचे. त्यांना वास्तुशास्त्राचेही ज्ञान असल्याचे बायकोने मला सांगितले. नेहमीप्रमाणे माझी परवानगी न घेता तिने आपल्या सरांना नवीन फ्लॅट सगळीकडे फिरवून दाखवला.
फ्लॅटचे निरीक्षण केल्यावर सर गंभीर चेहरा करत म्हणाले, फ्लॅट वास्तुशास्त्रानुसार नसून त्यात गंभीर स्वरूपाचा दोष आहे. त्यांच्या मते आमची बेडरूम 'अग्नी'च्या जागी तर स्वयंपाकघर 'जल' म्हणजे पाण्याच्या जागी होते. कितीही मोडतोड केली तरी आता बेडरूम व स्वयंपाकघराची अदलाबदली करता येणार नव्हती. तेव्हा काळजीच्या स्वरात हिने सरांना विचारले की, आता फ्लॅट आहे तसाच ठेवला तर आमच्यावर संकट येईल का?' सर चहाचा घोट घेत म्हणाले, 'अगं अग्नीची दिशा आहे तिथे तुमची बेडरूम आहे. तुम्हा नवरा बायकोत रोज वाद, भांडणे होणार.' ते ऐकताच आमच्या सौभाग्यवतीने मंद स्मित केले. त्याला कारणही तसेच होते. लग्न झाल्यापासून माझ्याशी भांडण उकरून काढण्यात ती इतकी तरबेज झाली होती की नेहमी तीच जिंकायची. कोर्ट सोडल्यास इतर कुठेही, कुणाबरोबरही वाद न घालण्याची माझी वृत्ती. त्यामुळे प्रत्येक भांडणात तीच जिंकत असे. आजही माझी ती वृत्ती कायम आहे. त्यामुळेच वास्तूत एवढा 'दाहक' दोष असतानासुद्धा माझ्या शांत, संयमी वृत्तीने वास्तुशास्त्रावर विजय मिळवला असे मला वाटते. तुम्हाला काय वाटतं?