संपादकीय: आकाशवाणी पुणे! जनरेट्यामुळे 'बंद'ला तात्पुरती स्थगिती, पण पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 07:11 AM2023-06-17T07:11:04+5:302023-06-17T07:12:03+5:30

जेव्हा एखादा उद्योग बंद करायचाच हे भांडवलदार अथवा सरकार ठरवते, तेव्हा त्या उद्योगातील सर्वात नफा करून देणारा विभाग बंद केला जातो.

Editorial Article on Akashvani Pune Temporary suspension of 'bandh' due to listneres but what next | संपादकीय: आकाशवाणी पुणे! जनरेट्यामुळे 'बंद'ला तात्पुरती स्थगिती, पण पुढे काय?

संपादकीय: आकाशवाणी पुणे! जनरेट्यामुळे 'बंद'ला तात्पुरती स्थगिती, पण पुढे काय?

googlenewsNext

जेव्हा एखादा उद्योग बंद करायचाच हे भांडवलदार अथवा सरकार ठरवते, तेव्हा त्या उद्योगातील सर्वात नफा करून देणारा विभाग बंद केला जातो. मुंबईतील कापड गिरण्या बंद करताना अनेक मालकांनी नफ्यातील युनिट बंद केली होती. आकाशवाणीच्या ज्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या बंद केल्या होत्या व जनरेट्यामुळे माहिती प्रसारण मंत्र्यांनी त्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली तो पुण्याचा प्रादेशिक वृत्त विभाग देशात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग आहे. पुण्यातील आकाशवाणीचा श्रोतृवृंद हे आकाशवाणीचे बलस्थान आहे. 'न्यूज ऑन एअर' या अॅपद्वारे पुणे केंद्रावरील बातम्या व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या २५ लाखांच्या घरात आहे. शक्तीस्थानांवर हल्ला केला की, तोट्यातील केंद्रांना कुलूप घालणे सोपे होते. पुण्यातील नफा करून देणारा विभाग बंद होतो, तर आपल्या विभागात अगोदरच तोटा आहे, तो बंद होण्यात नाविन्य नाही, अशी मानसिकता कर्मचाऱ्यांची तयार होते. मात्र, पुण्यातील काही राजकीय नेते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आकाशवाणीचे श्रोते यांनी कडाडून विरोध केल्याने शेतकरी, कुस्तीपटूंपुढे गुडघे न टेकणाऱ्यांना पुणेकरांपुढे मान तुकवावी लागली.

मुळात पुण्यातील हा वृत्त विभाग गुंडाळण्याचा प्रयत्न २०१५-१६ सालापासून म्हणजे पुणेकर प्रकाश जावडेकर माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री होते तेव्हापासून सुरू झाला. आता त्याच जावडेकर यांनी विद्यमान मंत्री अनुराग ठाकूर यांना निर्णय स्थगित करायला भाग पाडले हे वाचून अनेकांना धक्का बसला असेल, जावडेकर मंत्री असताना एक राज्य एक रेडिओ स्टेशन' हे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले. छोट्या राज्यात हे धोरण स्वीकारार्ह असू शकते. परंतु, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात हे धोरण श्रोत्यांवर अन्यायकारक आहे हे जावडेकर यांच्यासारख्या माध्यमस्नेही व्यक्तीच्या लक्षात कसे आले नाही, याचेच आश्चर्य वाटते. त्यावेळी विरोध झाल्याने थांबलेला निर्णय आता अमलात आणण्याचे प्रयत्न करताना पहिला घाव पुण्यावर घातला गेला. दिल्लीचे सकाळचे मराठी बातमीपत्रही आधीच बंद करण्यात आले आहे. पुण्यातील वृत्त विभागातील दोन महत्त्वाची पदे गेली कित्येक वर्षे रिक्त असून, तेच कारण हा विभाग बंद करण्याकरिता दिले गेले. कोरोनाच्या काळात याच पुण्याच्या वृत्त विभागातील कर्मचाऱ्यांनी १२ तासांच्या ड्युट्या करून राष्ट्रीय बातमीपत्रे देऊन मुंबई केंद्राची उणीव जाणवू दिली नव्हती.

पुण्यात इंडियन इन्फर्मेशन सर्व्हिसचा अधिकारी नसल्याने पुण्याचा वृत्त विभाग बंद करून छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे बातमीपत्राची जबाबदारी सोपविण्यात येणार होती, पण प्रत्यक्षात तिथेही वृत्त विभागाचा कार्यभार सांभाळणारा अधिकारी अस्तित्वात नसून तिथला कार्यभार मुंबईतील अधिकाऱ्याकडे सोपविलेला आहे. हा सर्व द्राविडी प्राणायम करूनही पुण्यातून वृत्त विभाग न हलण्याचे श्रेय पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे व काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांना जाते. हे तिघे पुण्यातील श्रोते व कर्मचारी यांच्या पाठीशी उभे राहिले. चक्रीवादळाची दृश्ये पडद्यावर दाखविण्यासाठी न्यूज अँकरला छत्री घेऊन भेलकांडत बातमीपत्र द्यायला लावण्याच्या सध्याच्या अविश्वासार्ह काळात अनेकजण आकाशवाणीच्या निर्भेळ बातम्या ऐकायला पसंती देतात, हे कौतुकास्पद आहे.

आकाशवाणीवरून ९० च्या आसपास बोलीभाषेतून बातम्या व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे प्रसारण सुरू असते हे माध्यमांच्या कोलाहलात आपण विसरून गेलो आहोत. आता यू ट्यूब, फेसबुकपासून अनेक व्यासपीठे उपलब्ध असली तरी नियम, शिष्टाचाराची चौकट पाळून आपल्या कलेचा अविष्कार सादर करणाऱ्या आकाशवाणीचे महत्त्व व मोठेपण तसूभरही कमी होत नाही. उलटपक्षी मनोरंजन अथवा मतस्वातंत्र्याच्या मर्यादांचा अनेक माध्यमांवर घडोघडी भंग होत असताना आकाशवाणीचे वेगळेपण उजळून निघते. देशभर मोक्याच्या जागी आकाशवाणीच्या मालमत्ता आहेत. जेव्हा आकाशवाणीला पर्याय नव्हता, तेव्हा देशभरात एक हजारपेक्षा अधिक निवेदक होते. त्यांचे आवाज ही त्यांची ओळख होती. आता निवेदकांची संख्या जेमतेम ३०० च्या घरात आहे. अनेक ठिकाणच्या यंत्रणांची देखभाल पांढरा हत्ती पोसण्यासारखी आहे. आकाशवाणीच्या या मालमत्ता कदाचित डोळ्यात सलत असतील, 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे आकाशवाणीचे घोषवाक्य आहे. भविष्यात एखाद्या उद्योगपती हिताय' आकाशवाणीच्या 'श्रोते सुखाय' धोरणाच्या मानेवर सुरी फिरवली जाऊ शकते.
Mumbai Main

Web Title: Editorial Article on Akashvani Pune Temporary suspension of 'bandh' due to listneres but what next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे