अग्रलेख: चकाके कोर चंद्राची.... भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 07:24 AM2023-08-25T07:24:30+5:302023-08-25T07:26:24+5:30

तरीदेखील भारताच्या संदर्भाने थोडेसे कटू असले तरी एक वास्तव नोंदवायलाच हवे...

Editorial article on Chandrayaan 3 The world that looked at India with evil eyes became speechless after Isro Success | अग्रलेख: चकाके कोर चंद्राची.... भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग झाले अवाक्

अग्रलेख: चकाके कोर चंद्राची.... भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग झाले अवाक्

googlenewsNext

राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स या मिथकामधील पक्ष्याप्रमाणे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चार वर्षांपूर्वीच्या अपयशातून पुन्हा नव्या उमेदीने चंद्राकडे झेप घेतली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या टापूवर विक्रम लंडर उतरविण्याचे अशक्य काम शक्य करून दाखविले. आधीच्या अंतराळ मोहिमा, विशेषतः चंद्रयान व मंगळयानावेळी भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग अवाक् झाले. बुधवारच्या चंद्रयान- ३ च्या यशाची दखल जगभरातल्या नामांकित वृत्तपत्रांनी घेतली. देशोदेशीची सरकारे व अंतराळ विज्ञान संस्थांनी इस्रो व भारत सरकारचे अभिनंदन केले. या अलौकिक व अद्भुत यशामुळे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ, यू. आर. राव उपग्रह केंद्राचे संचालक एम. शंकरन, चंद्रयान -३ चे प्रकल्प संचालक पी. वीरमुथ्थुवेल, सहयोगी प्रकल्प संचालक के कल्पना, मिशन ऑपरेशन संचालक श्रीकांत ही प्रमुख नावे जगभर पोहोचली.

मानवी स्वभावातील अज्ञाताबद्दलचे कुतूहल आणि जे जे अज्ञात त्याचा शोध घेण्याची मूलभूत मानवी प्रेरणा हाच विज्ञानाचा आधार असल्यामुळे तसेही या क्षेत्रात अपयश हा गुन्हा किंवा पाप मानले जात नाही. यशाच्या वाटेवरील तो नैसर्गिक विसावा मानला जातो. त्यामुळेच चंद्रयान- २ मोहिमेवेळचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन, तसेच अनेक निवृत्त शास्त्रज्ञही नव्या मोहिमेत सहभागी होते. या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांनीच सोनेरी इतिहास लिहिला गेला. आता, प्रियतमेला 'चौदवी का चांद'ची उपमा देणाऱ्या रसिक भारतीयांच्या नजरा पुढचे चौदा दिवस चंद्राकडे असतील. कारण, चंद्राचा एक दिवस आपल्या चौदा दिवसांच्या कालावधीचा असतो. विक्रम लँडरच्या कुशीतून वेगळा झालेला प्रग्यान रोव्हर चंद्रावर कोणत्या ना कोणत्या अवस्थेत पाणी उपलब्ध आहे का, याचा शोध घेईल. चंद्रावरील मानवी वस्तीचे वेध यापूर्वीच जगाला लागले आहेत; पण ती शक्यता पाण्याच्या उपलब्धतेवरच अवलंबून आहे.

सूर्यमालेतील अन्य ग्रहांच्या तुलनेत पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणून चंद्र खूप जवळ आहे. तो पृथ्वीभोवती फिरतो व सूर्याभोवतीही फिरतो. पृथ्वीभोवती फिरताना पुन्हा त्याच स्थितीत येण्यासाठी चंद्राला जवळपास १२८ दिवस लागतात. त्यामुळे चंद्रावर दिवस व रात्र पृथ्वीवरील १४ दिवसांच्या कालावधीची आहे. तसा फिरतानाच जेव्हा तो पृथ्वी व सूर्याच्या मध्ये अडथळा बनतो तेव्हा सूर्यग्रहण घडते तर जेव्हा चंद्र व सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण अनुभवास येते. चंद्र व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीवर समुद्राला भरती व ओहोटी येते. चंद्राचे परिवलन व परिभ्रमण थोडे कललेल्या स्थितीत असल्याने, तसेच स्वतःभोवती व पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी एकसारखा असल्याने त्याचा काही भाग कधीच पृथ्वीवरून दिसत नाही. चंद्राच्या ज्या भागात सूर्याची किरणे पोहोचतात तिथे प्रचंड तापमान, तर जिथे ती पोहोचत नाहीत तिथे प्रचंड थंडी असे विषम हवामान चंद्रावर आहे. कारण, पृथ्वीसारखा अतिनील सूर्यकिरणांपासून बचाव करणारा ओझोन थर चंद्रावर नाही. उष्णता व थंडीच्या अशा तीव्र हवामानाचा चंद्रावर रेडिओ लहरी परावर्तित करणारा आयनोस्पिअर, तसेच एकूण वातावरणावर होणारा परिणाम रोव्हरवरील 'रंभा' नावाचे उपकरण अभ्यासणार आहे. यातून निघणारे निष्कर्ष केवळ भारतच नव्हे, तर आपल्या सूर्यमालेच्या टोकापर्यंत, तसेच त्याहीपलीकडे अन्य सूर्यांच्या परिवाराचा अभ्यास करू पाहणाऱ्या जगाला एकूणच मानवी समुदायाला उपयोगी ठरतील. म्हणूनच, चंद्रयान-३ चे ऐतिहासिक यश केवळ भारताचे नाही, समस्त मानवजातीचे आहे.

तरीदेखील भारताच्या संदर्भाने थोडेसे कटू असले तरी एक वास्तव नोंदवायलाच हवे. चंद्रयान- ३ च्या रूपाने आपण देदीप्यमान यश मिळविले, प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली, ते स्वाभाविक आहे. कारण, असे अभिमानाचे क्षण आयुष्यात कधीतरीच येतात. देशप्रेम दाटून आल्यामुळे चंद्रावरील मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना, यज्ञ वगैरे ठीक असले तरी मिळालेले यश हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे, हे विसरायचे नाही. यशाचा जल्लोष करताना देशातील एकूणच वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काय, हा प्रश्न उपस्थित होतोच. अलीकडच्या काळात देशात छद्मविज्ञान जोरात आहे. प्राचीन भारतीय इतिहासाचे, संस्कृतीचे गोडवे गाताना आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाचा दुस्वास करण्याचे, ते नाकारण्याचे, अभ्यासक्रमातून चार्लस डार्विनचा उत्क्रांतीवाद किंवा तत्सम मूलभूत गोष्टी वगळण्याचे वेड वाढीस लागले आहे. हे असे होत राहिले, तर चंद्रयान- ३ सारख्या मोहिमांचे यश विद्यार्थी ढोल वाजवून साजरे करताना दिसतील. त्यामागील गणित, विज्ञान, तंत्रज्ञान त्यांना मुळात समजून घेता येणार नाही.

Web Title: Editorial article on Chandrayaan 3 The world that looked at India with evil eyes became speechless after Isro Success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.