संपादकीय: एक ट्रम्प, बारा भानगडी! गोपनीय कागदपत्र हे डोनाल्ड ट्रम्पचं नवं प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 10:28 AM2023-06-15T10:28:16+5:302023-06-15T10:28:30+5:30

फेडरल कोर्टरूममध्ये हजेरी लावल्यानंतर बहुचर्चित माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यू जर्सीला परतले. तेव्हा त्यांचे समर्थकांनी जोरदार स्वागत केले.

Editorial Article on Donald Trump and allegations about leaking secrets of USA | संपादकीय: एक ट्रम्प, बारा भानगडी! गोपनीय कागदपत्र हे डोनाल्ड ट्रम्पचं नवं प्रकरण

संपादकीय: एक ट्रम्प, बारा भानगडी! गोपनीय कागदपत्र हे डोनाल्ड ट्रम्पचं नवं प्रकरण

googlenewsNext

अमेरिकेच्या ध्येयधोरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांची हेळसांड केल्याच्या प्रकरणात मियामीच्या फेडरल कोर्टरूममध्ये हजेरी लावल्यानंतर बहुचर्चित माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प न्यू जर्सीला परतले. तेव्हा त्यांचे समर्थकांनी जोरदार स्वागत केले. त्यांच्यासमोर बोलताना ट्रम्प यांनी राजकीय सुडापोटीच आपल्याविरुद्ध खटले भरले जात असल्याचा, अध्यक्ष जोबा यांचे प्रशासन एखाद्या फॅसिस्ट, कम्युनिस्ट सरकारसारखे वागत असल्याचा आरोप केला. गोपनीय कागदपत्र प्रकरणातील तपास अधिकारी जॅक स्मिथ ठग व वेडा असल्याची टीका केली आणि त्याचबरोबर या षडयंत्राविरुद्ध पूर्ण ताकदीने लढणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला.

ट्रम्प म्हणतात, तसे हे सुडाचे राजकारण असो की त्यांच्या चुका असोत, हा मामला गंभीर आणि एक प्रकारे राष्ट्रद्रोह आहे, हे निश्चित. अमेरिकेची व जगाची अण्वस्त्रे, त्यांचा वापर, शस्त्रसज्जता, परराष्ट्र धोरण अशा संवेदनशील विषयांशी संबंधित कागदपत्रे ट्रम्प यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवली. एकवेळ तेदेखील ठीक; पण त्यांनी ती आपल्या खासगी मालमत्तांमध्ये अस्ताव्यस्त ठेवली. त्याचमुळे ते अपराधांच्या जंजाळात गुरफटत चालले आहेत. अध्यक्षपदाच्या गेल्या निवडणुकीतील नाट्यमय पराभवानंतर समर्थकांचा कॅपिटॉल या अमेरिकन संसदेवरील ६ जानेवारीचा हल्ला आणि नंतर वेगवेगळ्या आरोपांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढील संकटे वाढत चालली आहेत.

कॅपिटॉल हल्ल्यानंतर त्यांच्यावर सर्व प्रकारची सार्वजनिक बंदी घालावी, अशा आशयाचे विधेयक पुढे आले होते. त्यासाठी १४ वी घटनादुरुस्ती करण्याची तयारी झाली होती. काही कारणास्तव ते वेळीच सादर झाले नाही आणि नंतर अमेरिकन काँग्रेसवर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आले. परिणामी तो प्रयत्न बारगळला. त्यानंतर गेल्या एप्रिलमध्ये व्यवसायातील गडबडीबद्दल ट्रम्प यांच्यावर गुन्हा दाखल झाला. न्यूयॉर्कमध्ये ते पोलिसांपुढे शरण आले. वेगवेगळ्या ३४ प्रकारचे आरोप त्यांच्यावर ठेवले गेले. अर्थातच, ट्रम्प यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला. त्यानंतर गेल्या मे महिन्याच्या पूर्वार्धात ई जीन कॅरोल नावाच्या स्तंभलेखिकेने ट्रम्प यांच्यावर लैंगिक छळ व बलात्काराचा आरोप केला. न्यायालयात बलात्काराचा आरोप सिद्ध झाला नाही. तथापि, लैंगिक छळाबद्दल ट्रम्प यांनी कॅरोलला जवळपास ५ दशलक्ष डॉलर्सची भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. गोपनीय कागदपत्रांचे हे प्रकरण तिसरे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती व धोरणात्मक बाबींचा समावेश असलेली अत्यंत महत्त्वाची गोपनीय कागदपत्रे अध्यक्षांच्या अखत्यारीत येतात हे सर्वांनाच माहिती आहे; परंतु ती कागदपत्रे योग्यरीत्या सांभाळली गेली नाहीत. त्या कागदपत्रांनी भरललेल्या ट्रंका डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवल्या. काही कागदपत्रे तर फ्लोरिडा राज्यातील ट्रम्प यांच्या मार-ए-लागो नावाच्या आलिशान इस्टेटमधील टॉयलेटजवळ ठेवल्याचे आढळले. ही निव्वळ अनागोंदी असून ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली नाही, असा संदेश या प्रकारातून जगभर गेला. असा हा भानगडींचा ससेमिरा ट्रम्प यांच्या मागे लागल्यामुळे साहजिकच रिपब्लिकन पक्षाकडून ते अध्यक्षपदाची पुढची निवडणूक लढविणार का, हा प्रश्न चर्चेत आला आहे.

ही तीन किंवा आणखीही काही प्रकरणे उघडकीस आली तरी त्यामुळे ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या स्वप्नांना काही अडथळा निर्माण होणार नाही, असे दिसते. अमेरिकन कायद्यानुसार, अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने नैसर्गिकरीत्या जन्म, वयाची ३५ वर्षे पूर्ण व अमेरिकेचे किमान १४ वर्षे नागरिकत्व या तीनच अटी पूर्ण करायच्या आहेत. न्यायालयाने दोषी ठरविलेली किंवा कारावास भोगणारी व्यक्ती अमेरिकेत मतदान करू शकत नाही; परंतु ती निवडणूक लढवू शकते. अध्यक्षपदाची पुढची निवडणूक ५ नोव्हेंबर २०१४ ला होणार आहे. म्हणजे जेमतेम सोळा महिने शिल्लक असताना अमेरिकेची सत्ता स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे दिसते. ट्रम्प यांच्या स्वभावानुसार ते गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्यांना सामोरे जातानाही नमते घेणार नाहीत. गोपनीय कागदपत्रांविषयी त्यांचा युक्तिवाद त्याचे उदाहरण आहे. आपण खूप व्यस्त असतो. कागदपत्रे पाहण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही आणि ती न पाहताच पुरातन संदर्भ विभागाला पाठवून देणे योग्य नव्हते, असा हास्यास्पद खुलासा त्यांनी केला आहे. तेव्हा यापुढेही ते असाच उद्दामपणा दाखविणार आणि कायदा, परंपरांचा कसलाही विधिनिषेध न बाळगता बायडेन यांच्याशी दोन हात करणार, यात शंका नाही.

 

 

Web Title: Editorial Article on Donald Trump and allegations about leaking secrets of USA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.