आजचा अग्रलेख : भीती नको, खबरदारी हवी! ‘ह्युमन मेटाप्युमोव्हायरस’चे संक्रमण आपणच रोखणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:25 IST2025-01-07T10:25:31+5:302025-01-07T10:25:50+5:30

न घाबरता प्रत्येकाने प्रत्येक स्तरावर घेतलेली खबरदारी हेच नव्या संकटापासून देशाचे संरक्षण असेल!

Editorial Article on Human Metapneumovirus No need for fear just be careful | आजचा अग्रलेख : भीती नको, खबरदारी हवी! ‘ह्युमन मेटाप्युमोव्हायरस’चे संक्रमण आपणच रोखणार!

आजचा अग्रलेख : भीती नको, खबरदारी हवी! ‘ह्युमन मेटाप्युमोव्हायरस’चे संक्रमण आपणच रोखणार!

‘कोरोना’ म्हटले की आजही जग भयभीत होते. या जागतिक महामारीने कित्येकांना संपवले, अनेकांना देशोधडीला लावले. होत्याचे नव्हते केले. आता कुठे या सावटातून जग सावरत असताना पुन्हा एकदा एक बातमी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. एक नवा विषाणू जगभर पोहोचत असल्याच्या बातम्या उमटताहेत. जागतिकीकरण केवळ ज्ञानाचे आणि संधींचे झाले नाही. ते विषाणूंचेही झाले. साथीचे आजार पूर्वीही होतेच, मात्र, आता या साथीही ‘ग्लोबल’ झाल्या. १८९२ मध्ये प्लेगच्या साथीने पुण्यासह भारतात धुमाकूळ घातला होता. त्याविषयी आजही बोलले जाते. प्लेगच्या रुग्णांची सेवा करतानाच सावित्रीबाई फुले काळाच्या पडद्याआड गेल्या.

जागतिकीकरणानंतर तर अनेक साथींनी जगाला हादरवले. एका साथीतून सावरेपर्यंत नवा संसर्ग पुढे येतो. स्वाइन फ्लू, इबोला, झिका यानंतर आलेल्या ‘कोरोना’ने मानवी जनजीवन उद्ध्वस्त करून टाकले. त्याच रांगेत आता नवा विषाणू आल्याच्या बातमीने चिंता वाढणे अगदीच स्वाभाविक आहे. त्याला कारणही तसेच आहे. ९ मार्च २०२० चा तो दिवस. महाराष्ट्रातील कोरोनाचे पहिले दोन रुग्ण त्या दिवशी पुण्यात आढळले होते. या घटनेला जवळपास पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा चीनमध्ये ‘ह्युमन मेटाप्युमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) नावाच्या नव्या व्हायरसने धुमाकूळ घातलाय. याच व्हायरसचा देशातील पहिला रुग्ण काल बंगळुरूमध्ये आढळला. आठ महिन्यांच्या चिमुकलीला या विषाणूने गाठले आहे. आता या विषाणूचे देशातील संक्रमण रोखण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असणार आहे. यात यंत्रणा आणि नागरिकांची भूमिका महत्त्वाची. मुळात घाबरून जावे, असे अजिबात नाही. कोरोनाच्या परिस्थितीशी तुलना करण्याचेही कारण नाही. तेव्हा उद्भवलेल्या परिस्थितीला अनाठायी भीती आणि चुकीच्या पद्धतीने हाताळणी ही दोन कारणेही होती.

भीतीला दूर सारत, योग्य ती खबरदारी घेत नव्या विषाणूचे संक्रमण देशाच्या मातीत होणार नाही, याची काळजी आता प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. चीनमधून २०२० मध्ये आलेल्या ‘कोरोना’नं आरोग्य यंत्रणा सक्षम असणं किती महत्त्वाचं आहे, ते शिकवलं. नंतरच्या जवळपास पाच वर्षांच्या काळात देशातील आरोग्य यंत्रणेतही अनेक महत्त्वाचे आणि चांगले बदल झाले. तरीही चीनमधील ‘ह्युमन मेटाप्युमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) आता भारतात आल्यामुळे आरोग्यासह प्रशासकीय यंत्रणेने सजग असणे आवश्यक आहे. कारण ‘एचएमपीव्ही’ हा सर्वांत पहिल्यांदा श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे तो पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानेदेखील तो वेगाने पसरतो.

या विषाणूचा प्रभाव सामान्यत: हिवाळा आणि पावसाळ्यात जास्त असल्याचे सांगितले जाते. ‘कोविड १९’ प्रमाणेच ‘एचएमपीव्ही’ या विषाणूमुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये श्वसनाचे आजार होतात. लहान मुले, वृद्ध, प्रौढ आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना या विषाणूचा सर्वांत जास्त धोका आहे. आता चीनमध्ये ‘एचएमपीव्ही’च्या संक्रमणामुळे परिस्थिती बिघडली आहे. लाखो चिनी नागरिकांना या विषाणूचे संक्रमण झाल्यामुळे चीनमधील रुग्णालये भरून गेली आहेत. स्मशानभूमीतही मोठ्या रांगा लागल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. या ‘एचएमपीव्ही’च्या प्रादुर्भावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतासह अनेक देश या विषाणूवर आणि त्याच्या प्रसारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

बऱ्याच देशात या नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. ज्या प्रशासकीय चुकांनी कोरोनात मृतांचा आकडा वाढवला, त्या चुका आता टाळाव्या लागतील. नव्या विषाणूसंदर्भातील संपूर्ण माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल. नेत्यांचा ‘पीआर’ करण्यात व्यस्त असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाला स्वतःला सिद्ध करावे लागेल. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग घेऊन या विषाणूसंदर्भात त्यांना अधिक शिक्षित करावे लागेल. राज्यकर्त्यांनीही आता निवडणुका संपल्या, हे लक्षात घेऊन येऊ पाहणाऱ्या संकटाकडे बघायला हवे. कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाण्याच्या वृत्तीमुळे भारताने अवघ्या काही महिन्यांत कोविडवरील लस जगाला दिली. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, तेव्हा देशात फक्त पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत निदान करणे शक्य होते. त्यानंतर काही दिवसांत जागोजागी सरकारी, खासगी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या. अगदी दूरवरच्या गावखेड्यात प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. त्यामुळे हा विषाणू आता भारतात शिरला असला तरी त्याला हद्दपार करण्याची क्षमता इथल्या यंत्रणेत आहे. म्हणूनच न घाबरता प्रत्येकाने प्रत्येक स्तरावर घेतलेली खबरदारी हेच नव्या संकटापासून देशाचे संरक्षण असेल!

Web Title: Editorial Article on Human Metapneumovirus No need for fear just be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.