अकोला मतदारसंघात दोघात तिसरा येणार का?
By किरण अग्रवाल | Published: March 17, 2024 05:40 PM2024-03-17T17:40:05+5:302024-03-17T17:57:33+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन गेली तरी महाआघाडी व महायुतीअंतर्गत कोणती जागा कोण लढविणार हेच काही ठिकाणी स्पष्ट झालेले ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होऊन गेली तरी महाआघाडी व महायुतीअंतर्गत कोणती जागा कोण लढविणार हेच काही ठिकाणी स्पष्ट झालेले नाही, ते झाल्यावरच दुरंगी की बहुरंगी लढती याबाबतचे चित्र स्पष्ट होईल व प्रचारात रंग भरला जाईल.
लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्याने आता प्रचाराची रणधुमाळी वाढून जाणे स्वाभाविकच आहे. पारंपरिक किंवा हक्काच्या व खात्रीच्या जागांवरील उमेदवाऱ्याही घोषित झाल्या असून, महाआघाडी व महायुतीच्या जागा वाटपाचे घोंगडे जिथे अजूनही भिजत आहे तेथील पक्ष्यांच्या जागा ठरल्या की उमेदवार नक्की होतील त्यानंतर खरे चित्र स्पस्ट होईल; पण एकूण राजकीय स्थिती पाहता मतदारांचीच परीक्षा पाहणारी ही निवडणूक ठरणार आहे.
आपल्या पश्चिम वऱ्हाडापुरते बोलायचे झाल्यास, निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर फक्त अकोला लोकसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांची घोषणा झाली आहे. सर्वात अगोदर वंचित बहुजन आघाडीचे ऍड प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी जाहीर झाली व त्यानंतर भाजपतर्फे अनुप धोत्रे यांची उमेदवारी घोषित झाली. विद्यमान खासदार व मातब्बर नेते संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा अकोल्यात भाजपचा उमेदवार कोण याची सर्वांनाच मोठी उत्सुकता होती, पण खासदारपुत्र अनुप यांना उमेदवारी देऊन भाजपाने अन्य शक्यतांच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. दुसरीकडे महाआघाडीतील 'वंचित'च्या सहभागाची निश्चिती अजूनही झालेली नाही, किंबहुना ते गणित जुळून येईल याची शक्यता धूसर होत चालली आहे त्यामुळे आता आंबेडकर व धोत्रे या दोघात महाआघाडीचा तिसरा कोण? याची उत्कंठा अकोलेकरांना लागली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत महाआघाडीत वंचितच्या समावेशाची बोलणी सुरू आहे; पण रामटेक किंवा अकोल्यापैकी एका जागेवर दावा करून शिवसेना ठाकरे गटानेही साऱ्यांच्या भुवया उंचावून दिल्या आहेत. तसे पाहता अकोल्यात काँग्रेसच्या तिकिटासाठी डॉ. अभय पाटील यांनी मजबूत दावेदारी केली असून त्यांनी त्यादृष्टीने मतदारसंघही पिंजून काढला आहे. त्यामुळे महाआघाडीत वंचितचा समावेश होणार नसेल तर काँग्रेस ही जागा स्वतःकडेच ठेवणार हे नक्की, कारण दमदार उमेदवार त्यांच्याकडे आहे. असे झाले तर तिसऱ्या उमेदवाराने निवडणूक रिंगणात रंग नक्कीच भरला जाईल.
बुलढाणा व वाशिम - यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील दोन्हीही पातळीवर म्हणजे महाआघाडी व महायुतीत कोणती जागा कोणत्या पक्षाने लढायचे हेच नक्की नसल्याने उमेदवारांची निश्चिती अद्याप नाही. बुलढाण्यात शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर यांचे नाव नक्की झाल्याचे सांगितले गेले, पण खुद्द ठाकरे यांच्या सभा होऊनही त्याबाबतची स्पष्टता झालेली नाही. नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीकडे जागा ठेवली गेली तर डॉ. राजेंद्र शिंगणे की आणखी कोण? हे समोर आलेले नाही. काँग्रेसमधूनही जयश्री शेळके प्रतीक्षेत आहेत. पक्षाचे जागावाटप नक्की झाले की राजकीय तंबू बदलून उमेदवारी करू इच्छिणारेही तयारीत आहेत; पण अगोदर कोणता पक्ष लढणार हे ठरायला हवे. महायुतीतही 'मंथन'च चालू आहे. यंदा ही जागा भाजपा आपल्याकडे खेचणार अशी मोठी शक्यता वर्तवली जात असून त्यासाठी अन्य काही नावांसोबत राधेश्याम चांडक यांचेही नाव घेतले जात आहे. येथे काहींनी अपक्ष म्हणूनही लढण्याची तयारी सुरू करून दिली आहे. त्यामुळे बुलढाण्यातही तिरंगीच लढतीचे संकेत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा तालुके रावेर लोकसभा मतदारसंघात येतात. तेथे भाजपने रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित केल्यामुळे महाआघाडीतर्फे खडसे कुटुंबातीलच रोहिणी खडसे यांचे नाव पुढे आले होते, परंतु एकनाथ खडसे यांनीच याबाबत स्पष्टता केल्याने अशी लढत होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. तथापि मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असल्याने व लोकसभेसाठी पर जिल्ह्यातीलच उमेदवार प्रामुख्याने आमोरासमोर राहणार असल्याने त्यांच्या व्यक्तिगत संबंधावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.
वाशिमची स्थितीही बुलढाण्यासारखीच आहे, म्हणूनच तेथील कोणत्याच पक्षाचा कोणीही उमेदवार अद्याप घोषित होऊ शकलेला नाही. येथील जागाही महायुतीत भाजप आपल्याकडे ठेवण्याची शक्यता पाहता राजू पाटील राजे यांचे नाव चर्चेत आहे, परंतु अशा स्थितीत विद्यमान खासदारांची समजूत कशी काढली जाते, हे बघावे लागेल. महाआघाडीच्या बाबतीतही उमेदवारांची दावेदारी फलकबाजीतून केली जात आहे. अर्थात हे झाले वाशिमचे, सलग्नित असलेल्या यवतमाळमधील दावेदारांची यातील भर पाहता उमेदवाऱ्या घोषित होतील तेव्हाच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
सारांशात, निवडणुकीचा बिगुल वाजून गेला आहे; आता अकोल्यातील महाआघाडीचे पक्षीय जागावाटप व बुलढाणा आणि वाशिम या दोन्ही ठिकाणच्या दोन्ही म्हणजे महाआघाडी व महायुतीमधील पक्षीय निश्चिती एकदा झाली की संबंधित उमेदवारांचे मार्ग मोकळे होऊन खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला धार चढेल. या राजकीय सामिलकीच्या धबडग्यात मग निवडायचे कोणाला यासाठी मतदारांचीच कसोटी ठरेल.