गोव्यात स्थानिक विरुद्ध पर्यटक असा नवा संघर्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 07:54 AM2023-12-16T07:54:50+5:302023-12-16T07:55:59+5:30
जगभरातील पर्यटकांचा ओढा असलेले गोवा राज्य सध्या दारू, ड्रग्ज, ध्वनिप्रदूषण, बेकायदेशीर पार्त्या आणि नियमबाह्य वर्तन या गोष्टींमुळे अधिक गाजते आहे.
सदगुरु पाटील निवासी संपादक, लोकमत, गोवा
शांत व सुंदर राज्य अशी गोव्याची जगभर ख्याती. वार्षिक सरासरी ८० लाख पर्यटक गोवा राज्याला भेट देऊन जातात. नववर्ष साजरे करण्यासाठी तर एक कोटीहून अधिक पर्यटक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यात असतात. फेसाळणाऱ्या लाटा, स्वस्त मिळणारे मद्य, युरोपियन संस्कृतीचा पगडा असलेली किनारी भागातील जीवनशैली यामुळे जगभरातील पर्यटक ह्या चिमुकल्या राज्याच्या प्रेमात पडतो. मात्र अलीकडे देशी व विदेशी पर्यटक गोव्यात धिंगाणा घालू लागलेत, उपद्रव निर्माण करू लागलेत. यामुळे स्थानिक विरुद्ध पर्यटक असा नवा संघर्ष उभा राहू लागला आहे.
गेल्याच आठवड्यात उत्तर गोव्यात भीषण वाहन अपघात झाला. त्या एका अपघातात तिघे पर्यटक जागीच ठार झाले. अपघाताला कारण ठरलेला वाहनचालक विदेशी पर्यटक होता. दर दोन महिन्यांनी पर्यटकांचे अपघात सुरूच असतात. वाहतूक नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जाते. उधाणलेला समुद्र आयुष्यात प्रथमच
पाहणारे अनेक देशी पर्यटक स्वतःला पाण्यात झोकून देतात. काहीजण दुपारी मद्य प्राशन करून स्नान करण्यासाठी समुद्राच्या जबड्यात शिरतात व मरण पावतात.
पर्यटकांना आवरणे गोवा पोलिसांसाठी आव्हानात्मक झाले आहे. दारू पिऊन वाहन चालवू नका, अशी सूचना हॉटेल व्यावसायिकांकडून पर्यटकांना केली जाते. पोलिसांकडूनही तसेच पर्यटकांना बजावले जाते. मात्र अनेकदा तरुण पर्यटक ऐकत नाहीत.
गोव्यात 'रेन्ट अ कार' व 'रेन्ट अ बाइक'ची पद्धत आहे. भाड्याने चारचाकी व दुचाकी वाहने मिळतात. जिवाचा गोवा करावा अशा हेतूने पर्यटक वागतात. हेल्मेट न घालता दुचाकी चालवली जाते. वन वेमध्ये गाडी हाकली जाते. समुद्रकिनाऱ्यांवर वाहन चालविता येत नाही, त्यासाठी मोठा दंड असतो हे ठाऊक असूनही थ्रील म्हणून चक्क वाळूमध्ये चारचाकी नेली जाते. किनाऱ्यांवरून स्थानिक व पर्यटक फिरत असतात. तिथेच चारचाकी वाहन मुद्दाम नेऊन नियमभंग केला जातो. उत्तर गोव्याच्या किनारी भागात या महिन्याच्या अखेरीस सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल होणार आहे. जगभरातून हजारो पर्यटक त्यात सहभागी होतील. या शिवाय विविध क्लब व पबकडून पार्यांचे आयोजन केले जाईल. त्याबाबतची तयारी जोरात सुरू आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी बॉलिवूड स्टार, राष्ट्रीय ख्यातीचे काही क्रीडापटू, देशातील अनेक बड़े उद्योगपती, राजकीय नेते गोव्यात येणार आहेत.
नाताळ व नववर्ष पार्टी म्हणजे गोव्यात मोठी धूम असते. सध्या उत्तर व दक्षिण गोव्याची किनारपट्टी त्यासाठी नव्या नवरीप्रमाणे सजू लागली आहे. रोषणाईची सुरुवात होऊ लागली आहे. अशावेळी पर्यटकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात हैदराबादचे तिघे पर्यटक अपघातात ठार झाल्यानंतर पोलिसांनी पर्यटक वाहनांविरुद्ध तसेच मद्यपी चालकांविरुद्ध कडक भूमिका घेणे सुरू केले आहे.
गोव्यात उघड्यावर स्वयंपाक करण्यास बंदी आहे; पण पर्यटकांकडून मिरामार, दोनापावल, बागा, कळंगूट अशा ठिकाणी उघड्यावर स्वयंपाक केला जातो. शेतात खाद्यपदार्थ शिजविले जातात. याविरुद्धही दंडात्मक कारवाई पोलिस करू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी आहे; पण रस्त्याच्या बाजूला उघड्यावर बसून बिअर व अन्य दारू पिणारे पर्यटक कमी नाहीत. पणजीत हे चित्र जास्त दिसते. फुटपाथवरच मग दारूच्या बाटल्या टाकल्या जातात किंवा रस्त्याकडेलाच त्या बाटल्या फोडल्या जातात. अशा पर्यटकांविरुद्धही पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. ड्रग्जच्या अतिसेवनाने गोव्यात पर्यटकांचा मृत्यू होत आहे. मध्यंतरी हरयाणामधील टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाल्यानंतर पूर्ण देशाचे लक्ष गोव्याच्या ड्रग्ज धंद्याकडे गेले होते. ध्वनिप्रदूषण करून पर्यटक पार्चा करतात. यामुळेही वाद निर्माण होत आहेत. मद्य पिऊन वाहन चालविणारे पर्यटक ही तर मोठी डोकेदुखी झाली असल्याचे पोलिसही मान्य करतात.