खऱ्या-खोट्याची भेसळ, साफ खोटे, धादांत खोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 07:32 AM2024-05-04T07:32:36+5:302024-05-04T07:34:51+5:30

प्रत्यक्षात एखादी गोष्ट घडलीच नसली तरी ती घडली आहे असे डोळ्यांना आणि कानांना पटवू पाहणारे खोटे म्हणजे डीपफेक.. अर्थात मायावी भूलथाप !

Editorial articles AI is used in election campaigns | खऱ्या-खोट्याची भेसळ, साफ खोटे, धादांत खोटे

खऱ्या-खोट्याची भेसळ, साफ खोटे, धादांत खोटे

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक

‘राजकारण म्हणजे धूर्त आणि लबाडांचा शेवटचा आसरा’, असे म्हणतात. हे विधान नेमके कोणाचे याबाबत गोंधळ आहे, त्यात अतिशयोक्तीदेखील आहे. तरीही या विधानातील सत्यांश  नाकारता येत नाही. राजकारणात धूर्तपणा आणि लबाडीची चलती असते याचा प्रत्यय अनेकदा येतो. कधी ही लबाडी राजकारण्यांच्या कृतींमध्ये दिसते, कधी बोलण्यामध्ये तर कधी त्यांनी पसरविलेल्या माहितीमध्ये. लबाडी आणि खोटेपणाचे हे पीक तसे बारमाही असले तरी निवडणुका किंवा प्रचारमोहिमा आल्या की ते अधिक जोरात येते. निवडणुकीच्या काळात होणारे आरोप-प्रत्यारोप, आश्वासने- जाहीरनामे, राजकीय प्रचारात दिली जाणारी माहिती, संदर्भ अशा अनेक ठिकाणी खोटेपणाचे वेगवेगळे आविष्कार पाहायला मिळतात.

मूळ संदर्भ तोडून माहिती देणे, खऱ्या माहितीला मुद्दाम चुकीचा संदर्भ लावणे, गैरसोयीची माहिती दडवून फक्त सोयीची सादर करणे, माहिती अतिरंजित करणे, थोड्याशा खऱ्यामध्ये भरपूर खोट्याची भेसळ करणे आणि साफ खोटे बोलणे असा हा खोटेपणाचा पट्टा बराच मोठा आहे. या पिकात आलेले नवे वाण म्हणजे धादांत खोटे. इंग्रजी शब्द वापरायचा तर डीपफेक. प्रत्यक्षात एखादी गोष्ट घडलीच नसली तरी ती घडली आहे असे डोळ्यांना आणि कानांना पटवू पाहणारे खोटे म्हणजे डीपफेक. आपल्या फायद्यासाठी इतरांना फसवणे एवढाच डीपफेकचा रोकडा हेतू पण त्याचा आविष्कार मात्र रामायणातील मायावी सुवर्णमृगासारखा. मायावी तरी खराच वाटावा असा. ज्याची भुरळ किंवा भूल पडावी असा. त्या अर्थाने डीपफेक म्हणजे मायावी भूलथाप.

एरवी भूलथापा रचण्याची मानवी बुद्धीची क्षमता काही कमी नाही. पण, डीपफेकसाठी तेवढी पुरेशी नाही. तिला जोड लागते ती तंत्रज्ञानाची. एरवी छायाचित्रे किंवा चित्रपटांमधून तंत्रज्ञानाच्या साह्याने होणारे हे मायावी आविष्कार आपण पाहिले आहेत. त्याच्या पलीकडे जाणारी मायावी भूलथाप- अर्थात डीपफेक रचण्यासाठी आणि पसरविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान, डिजिटल विदा आणि समाजमाध्यमांची व्यवस्था लागते. हे डीपफेक म्हणजे फक्त छायाचित्रे, व्हिडीओ किंवा ध्वनीफितीमध्ये केलेली छेडछाड नसते. खऱ्याचा नमुना वापरून खऱ्यासारखी भासणारी ती एक धादांत खोटी नवीच रचना असते. अशा डीपफेकची कैक उदाहरणे तुम्ही गेल्या काही वर्षांत तुमच्या व्हॉटसॲप, फेसबुक, इन्स्टा किंवा यूट्यूबवर पाहिली असतील. त्यातील बऱ्याचशा भूलथापांचे मायावीपण तुमच्या लक्षातही आले नसेल. काहींना तर तुम्ही बळीही पडला असू शकाल. एका ताज्या उदाहरणाने ते तपासून पाहता येईल.  नेटफ्लिक्सवर ‘अमरसिंह चमकिला’ नावाचा एक चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. आणि अगदी काही दिवसांतच त्यातील ‘मैनु विदा करो’ या सुंदर गाण्याच्या दोन-तीन मायावी आवृत्त्याही बाहेर आल्या. म्हणजे असे की मूळ गाणे गायलेय अरिजित सिंग आणि जोनिता गांधी यांनी. पण, सोशल मीडियावर शोधले तर तुम्हाला अगदी या गाण्याच्या त्याच चालीत, त्याच वाद्यमेळामध्ये, त्याच शब्दांसह पण मोहम्मद रफी आणि जगजित सिंग यांच्या आवाजात गायलेल्या मायावी आवृत्त्याही ऐकायला मिळतील. हे दोन्ही महान गायक आता आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांनी हे गायले असण्याची शक्यताच नाही. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या डिजिटल सुविधा वापरून तरुण हौशी कलाकार-तंत्रज्ञांनी रफी आणि जगजितसिंग यांच्या आवाजाचा बऱ्यापैकी हुबेहूब आभास निर्माण केला आहे. मूळ गाणे माहीत नसताना हे आभासी गाणे ऐकले तर एखाद्या रसिकालाही आपण रफीचे किंवा जगजितचे इतके छान गाणे यापूर्वी कसे ऐकले नाही याची चुटपुट वाटावी इतके ते प्रत्ययकारी झाले आहे.

खरेतर अशी गाणी करण्यामागे या हौशी तंत्रज्ञ-कलाकाराचा कोणाला फसविण्याचा उद्देश नसतो. त्यामुळे ती रुढार्थाने किंवा हेतूने डीपफेक नाहीत. पण, त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या ताकदीचा काहीएक अंदाज येतो.

आपल्या डिजिटल संवादविश्वामध्ये अशा डीपफेकचा तसा बराच सुळसुळाट झाला आहे. विदा करो सारख्या गाण्याचे हे उदाहरण तसे किरकोळ आणि निष्पाप. या मायावी भूलथापा कधी व्हिडीओ बनून येतात, कधी ध्वनीचित्रफिती म्हणून तर कधी छायाचित्र म्हणून. आज पॉर्न फिल्मपासून ते माथी भडकविण्यासाठी केलेल्या व्हिडीओपर्यंत, आणि किरकोळ मनोरंजनाच्या उद्देशापासून ते भलाबुरा विचार बिंबविण्यासाठी केलेल्या प्रचारापर्यंत अनेक ठिकाणी या मायावी भूलथापांचा वापर होऊ लागला आहे. मग निवडणुकीचा प्रचार तरी त्यातून कसा सुटणार? उलट अतिशय आव्हानात्मक, अनिश्चित आणि खूप सारे डाव पणाला लावणाऱ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये लबाडांकडून या मायावी भूलथापांचा वापर होण्याची भीती अधिक. आणि जगभरातील गेल्या काही निवडणुकांमध्ये ते दिसूही लागले आहे. कशा तयार होतात या मायावी भूलथापा? कशा पसरतात? त्या ओळखणे किती अवघड असते? त्यांचे निवडणुकीवर आणि पर्यायाने लोकशाही राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात? लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना हे प्रश्न म्हणूनच महत्त्वाचे ठरतात. त्यातील काही प्रश्नांचा शोध पुढील लेखात घेऊच. - पण, तोवर चक्षुर्वै सत्यम्, किंवा सीइंग इज बिलिव्हिंग या आपल्या धारणांचा फेरविचार करा. अगदी दिसते तसे नसते या टोकाला जाण्याची गरज नाही. पण, डिजिटल विश्वात जे दिसते ते प्रत्येकच वेळी तसे नसते एवढा सावध विचार सोबत असू द्या.

Web Title: Editorial articles AI is used in election campaigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.