विजयी मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात हताश भाजप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 07:03 AM2024-07-18T07:03:47+5:302024-07-18T07:04:31+5:30

पोटनिवडणुका आणि लोकसभेत मोठा फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आता विरोधी पक्षांना हाताळण्यासाठी नवे डावपेच आखण्यात गुंतला आहे.

Editorial articles Desperate BJP trying to find a winning way | विजयी मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात हताश भाजप

विजयी मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात हताश भाजप

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

विरोधी पक्षांना हाताळण्याचे नवे डावपेच तयार करण्याच्या प्रक्रियेत भाजप गुंतला आहे असे दिसते. पोटनिवडणुकांत बसलेला मोठा फटका, तसेच लोकसभा निवडणुकीत झालेले मोठे नुकसान या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्व आता विरोधी पक्षांशी वेगळ्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक राज्यानुसार हे धोरण वेगळे असेल. समाजवादी पक्ष तसेच इतरांसह इंडिया आघाडीतील पक्षांचे मन वळविणे हा त्या धोरणाचा एक भाग आहे. पहिले उदाहरण द्यावयाचे तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून केंद्रीय तपास संस्थांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात पाठविले होते. तरीही  पंतप्रधानांनी अलीकडेच सोरेन यांना भेट दिली. त्याआधी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला मोदी यांनी अशी भेट दिली नव्हती. सोरेन यांच्याविरुद्ध प्रकरणांचा पाठपुरावा सीबीआय आणि ईडी अद्यापही करत आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. झारखंडमधील भाजप नेते या भेटीमुळे बुचकळ्यात पडले असून कसा प्रतिसाद द्यावा हे त्यांना कळलेले नाही.

याआधी लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या उत्तर प्रदेशात भाजप नेतृत्वाने एक धक्का दिला. मागच्या वेळी ६२  जागा जिंकणाऱ्या या राज्यात पक्षाला केवळ ३३ जागा मिळाल्या. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने ३७ जागा मिळवल्या आणि काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत पक्षाने जागा का गमावल्या हे समजून घेण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा राज्या-राज्यांचे दौरे करत आहेत. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी सख्य साधण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याने पक्षाची हताशा लक्षात आली. काँग्रेसला ‘परजीवी’ असे संबोधन वापरून नड्डा यांनी समाजवादी पक्षाला एक प्रकारे सदिच्छा दिल्या. ‘तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात तर बुडाल’ असा इशाराही नड्डा आणि अन्य भाजप नेत्यांनी दिला. काँग्रेस इतर पक्षांच्या मदतीने जिंकतो याचा अर्थ तो परजीवी पक्ष आहे असा होतो; जो इतरांच्या जिवावर जगतो आणि ज्यांच्यावर अवलंबून आहे त्यांना संपवतो. वाढण्यासाठी या पक्षाला इतरांची मदत लागते.

महाराष्ट्राबाबत राहुल ठरवणार

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९९ जागा जिंकून आपले संख्याबळ जवळपास दुप्पट केले. त्यामुळे पक्ष सध्या हवेत  आहे. महाराष्ट्रातील उत्साहित काँग्रेस नेते स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या गोष्टी करीत असून विधानसभा निवडणुकीत पक्षाला सुमारे १२० जागा मिळतील, असे सांगत आहेत. राज्यात काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या १७ जागा लढवल्या. यातल्या १३ जिंकल्या. २१  जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना लढली. त्या पक्षाला नऊ जागा मिळाल्या तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १०  जागा लढवून आठ जागा जिंकल्या.

परंतु राज्यातील महाविकास आघाडीतील ऐक्य राखण्याबाबत केंद्रीय नेतृत्व अत्यंत स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो, विधानसभा निवडणुकीत आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष प्रत्येकी ९६ जागा लढवण्याचे  या  आघाडीने निवडणुकीपूर्वी ठरवले होते, असे सांगण्यात येते; परंतु निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळा सूर लावला. काँग्रेस आता आघाडीतला मोठा भाऊ झालेला आहे असे ते म्हणू लागले. पक्षश्रेष्ठी यावर रागावले आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी पटोले यांचे कान धरले.

विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने फाटाफूट लक्षात घेऊन गरजेनुसार काही जागा इकडच्या तिकडे झाल्या तर ते मान्य केले पाहिजे असे म्हटले जात आहे. निवडणुका सामूहिक नेतृत्वाच्या निकषावर लढवल्या जातील; कोणाचेही नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे केले जाणार नाही, असेही ठरविण्यात आलेले होते. काँग्रेस पक्ष १२० जागा लढवू इच्छितो. राजकीय परिस्थिती प्रवाही असते असा पक्षाचा युक्तिवाद आहे. मात्र, आता मविआ दुर्बल होईल, अशी विधाने करू नका, अशा कानपिचक्या परदेश दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी दिल्याचे कळते.

पोप भारतात येणार काय?

कर्नाटक, तेलंगणा आणि काही प्रमाणात आंध्र प्रदेशमध्ये शिरकाव केल्यानंतर भाजप दक्षिणेत केरळवर  लक्ष ठेवून आहे. या राज्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत  पक्षाला १५.५६  टक्के मते मिळाली होती. यंदा ती १९.२४  टक्क्यांपर्यंत वाढली. थ्रिसूरमध्ये पक्षाचा उमेदवार निवडून आला, तसेच तिरुवनंतपुरममध्ये राजीव चंद्रशेखर शशी थरूर यांच्याकडून केवळ १६,०७७  मतांनी हरले. ११ विधानसभा मतदारसंघात भाजप पहिल्या तर आठ मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर आला. मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळत नसल्याने आता ख्रिश्चनांची  मने वळवायची, असे भाजपने ठरविलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच इटलीमध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटले. या गोष्टीला यासंदर्भात खूपच महत्त्व दिले जात आहे. मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले. दोघे एकमेकांना आलिंगन देत असल्याची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर प्रसृत झाली. २०२१  सालीही मोदी पोप यांना भेटले होते. भारत भेटीचे निमंत्रण त्यांना दिले होते; पण काहीच घडले नाही. मात्र, आता गंगेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मार्च २०२६ मध्ये केरळमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप मुख्य विरोधी पक्ष होऊ शकतो, असे आता नेतृत्वाला वाटत  आहे. पोप भारतात आले तर केरळमध्ये पक्षाचा पाया व्यापक करण्यास त्याची मदतच होईल, असे भाजपचे केरळमधील प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी कळविल्याचे समजते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना १९९९ साली पोप जॉन पॉल द्वितीय यांच्या भारतभेटीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हरकत घेतली होती. त्यामुळे पोप यांच्या आगामी भेटीबाबत सरकार द्विधा मनस्थितीत आहे. ख्रिश्चन मिशनरीज आदिवासी आणि गोरगरीब लोकांना धर्मांतरित करून घेण्यात गुंतलेले आहेत, असे संघाचे म्हणणे आहे.

Web Title: Editorial articles Desperate BJP trying to find a winning way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.