‘संवेदना’च नाहीशी होणार असेल तर ‘जिवंत माणसाचं काम काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:08 IST2025-02-22T08:07:28+5:302025-02-22T08:08:20+5:30
मी काही जाणकार लोकांना विचारलं ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स- ही कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची काय गोष्ट आहे?

‘संवेदना’च नाहीशी होणार असेल तर ‘जिवंत माणसाचं काम काय?
मी काही जाणकार लोकांना विचारलं ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स- ही कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची काय गोष्ट आहे?’ त्या त्या क्षेत्रातल्या काही लोकांनी मला जे सांगितले, त्याचे सार मग मी माझ्या अल्प मतीप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?- आजपर्यंत सजीव माणूस आपलं डोकं चालवून जे काही नवं जुनं असेल ते ठरवत होता. मी लेखक असेन तर माझं लेखन जे काही बरं वाईट असेल ते माझं मी करीत असे. आता माणसाच्या कर्तृत्वशक्तीची बंधने संपणार आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स नावाची गोष्ट तुमच्या बुद्धिच्यापेक्षा जास्त क्षमतेने काम करणार... त्यामुळे ती तुमच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाणार. आर्टिफिशियल इंटिलिजन्सपुढे माणूस तोकडा पडणार. म्हणजे मला स्थानच नाही काही.
मी एक लेखक असेन, मी काही बरा वाईट अनुभव घेऊन समजा एखादी कथा लिहिली तर आर्टिफिशियल इंटिलिजन्स त्याच्याहीपेक्षा मोठ्या गोष्टी आपोआप लिहू शकेल म्हणतात. म्हणजे तारा भवाळकर यांनी केले त्याला काहीच अर्थ नाहीये, मोडीत गेली ती! मग माणसाच्या अस्तित्वाला किंमत राहणार की नाही? माणसाच्या हरेक कृतीमागे त्याचा अभ्यास, विचार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची संवेदना असते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जर ती संवेदनाच नाहीशी होणार असेल तर मग जिवंत माणसाचं काम काय?