मुलांचे 'तसे' व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकता आहात? - थोडे थांबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 09:47 AM2024-09-17T09:47:23+5:302024-09-17T09:47:43+5:30

आसाममधल्या एका शाळेत शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात एका छोटुकल्या मुलीने केलेला नाच सध्या नको त्या कारणासाठी व्हायरल होत आहे, त्यानिमित्ताने !

Editorial articles Posting 'so' videos of kids on Instagram? | मुलांचे 'तसे' व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकता आहात? - थोडे थांबा

मुलांचे 'तसे' व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकता आहात? - थोडे थांबा

डॉ. श्रुती पानसे, मेंदू व शिक्षण अभ्यासक

लहान मुलं आणि झपाट्याने व्हायरल होणारे त्यांचे व्हिडीओज हा एक वेगळाच विषय आहे. लहान मुलं खूप गोड दिसतात, निरागस असतात. त्यांचा आवाज खूप कोवळा असतो. मोठ्यांच्या जगात एखादं लहान मूल दिसलं की, त्यांच्याकडे आकर्षित न होता राहणं अवघड असतं. म्हणूनच, मोठ्यांच्या रीलमध्ये एखादं लहान मूल गात आहे, नाच करत आहे, श्लोक म्हणत आहे, असं दिसलं की, त्याकडे लक्ष वेधलं जाते. पुनः पुन्हा ते पाहिलं जातं. इतरांना पाठवलं जातं. एकूणात सगळ्यांना छान वाटतं. इतकंच काय, पण मूल रडत आहे, कुठूनतरी धप्पकन पडत आहे, चिडतं आहे, तक्रारी करत आहे, हेही व्हिडीओज तुफान चालतात.

कधीतरी दोन-तीन वर्षांच्या मुलाचा/मुलीचा आई अभ्यास घेत आहे, त्या मुलाला काही येत नाही, आई रागावते, चिडते. मूल घाबरतं, काहीतरी बोलतं, अशा गोष्टी बघून कळवळायला होतं. इतक्या लहान मुलांचा अभ्यास घेतला जातो, म्हणजेच ते मूल 'गंभीर धोक्या'त आहे याची त्या आईला काहीच कल्पना नाही, तरीही आई आणि बघणारे अन्य लोक त्या रडवेल्या-त्रासलेल्या मुलांची मजा घेत आहेत, हे खूप दुःखद आहे. आपली मुलं आपल्याला निष्पाप वाटतात, दिसायला छान असतात, पण ते आपल्यासाठी, जगासाठी नाही, हे वाक्य अधोरेखित करून लक्षात ठेवावं. जग त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघतं, बघू शकतं, हे आपल्याला माहीतही नसतं. कोणत्याही कार्यक्रमात आपल्या मुलाने विशेषतः मुलीने काय सादर करावं, कोणत्या गाण्यावर नाच करावा, त्यावेळी सिनेमातल्या हिरोइनप्रमाणे हावभाव असावेत का, हा प्रश्न केवळ त्या मुलीचा आणि आई-बाबांचा नसतो. आसाममधल्या एका शाळेत शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात एक छोटुकल्या मुलीने केलेला नाच सध्या व्हायरल होत आहे. हा नाच तिच्या वयाला साजेसा नव्हता. ते गाणं, नाच, हावभाव आणि पोशाख हे जवळपास कॅबरे नृत्य होतं. ते व्हायरल झालं. शाळेची बदनामी झाली. शाळेने यासंदर्भात माफी मागितली. त्यात लिहिलं की, ते गाणं, नाच, हावभाव आणि पोशाख हे सर्व तिच्या आईने ठरवलं होतं.

अन्य मुलींचा सरावही तिनेच करून घेतला होता. तसंच हा व्हिडीओ शूट करून तिनेच स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकला. लहान मुलांच्या अशा नृत्याकडे कला म्हणून बघावं, अशी अपेक्षा असेल, तर ही नक्कीच चुकीची अपेक्षा आहे. कारण, याचा परिणाम आधी त्या मुलीच्या मानसिकतेवर होणार आहे. मग, तिच्या वयाच्या इतर मुलींच्या, मुलांच्या आणि अन्य समाजावर होणार आहे. आपण कोणत्या गाण्यावर नाचत आहोत, याचा अर्थ मुलांना माहीत नसला, तरी ती भावना आपणच त्यांच्या मनात कशासाठी निर्माण करायची, हा विचार आई-बाबांनी आधी करायला हवा. मालिकांच्या जाहिरातीत, मालिकांमध्ये लहान मुलं असतील, तर लोकांचं लक्ष खेचलं जातं. मार्केटिंग टीमचं काम सोपं होतं. मुलांसाठी मोठ्या संख्येने चांगली पुस्तकं नाहीत, त्यांच्यासाठी कार्टून सोडून चांगल्या गोष्टी नाहीत, असं आपण म्हणतो. पण, मोठ्यांच्या प्रेमकथा, सासू-सून सवती अशा विषयांवरच्या मालिकांमध्ये लहान मुलांना अक्षरशः वापरलं जातं.

मुलांच्या तोंडी जे संवाद असतात, ते या वयातली मुलं बोलतील का, असे विचार त्यांच्या मनात येतील का, याचा विचार करून पाहा ! ज्या आई-बाबांना वाटतं की, आपल्या मुला-मुलींनी काहीतरी चमकदार, धमाकेदार करावं. त्यांनी पुन्हा एकदा स्वतःची मतं तपासून घ्यावीत. मुलांच्या नृत्य स्पर्धेतही अशी गाणी दाखवू नयेत, निवडू नयेत. त्याचं कौतुक होऊ नये. हा एकूण प्रकार मुलांच्या मानसिकतेसाठी योग्य नाही. आपली हौस मुलांवर लादू नये. लहान मुलांच्या पोर्न फिल्म्सचाही खूप मोठा बाजार आहे, हे विसरून चालणार नाही. आपल्या प्रिय मुलांचे फोटो अशांच्या हातात आपणच देत नाही ना? काही झालं, तरी मुलांचे फोटो पालकांनी आणि शाळेने सोशल मीडियावर कधीच टाकू नयेत. टाकलेच तर ते अस्पष्ट करून, पाठमोरे, बाजूने किंवा समूहातले असावेत. ही काळजी सगळ्यांनी घ्यायलाच हवी.

Web Title: Editorial articles Posting 'so' videos of kids on Instagram?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.