Editorial: कोरोनाच्या शेवटाची सुरुवात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 07:27 AM2022-01-03T07:27:58+5:302022-01-03T07:28:38+5:30
लसीकरणावर जोर कायमच ठेवावा लागणार , मास्क वापरावेच लागणार आणि शारीरिक अंतर राखण्याची दक्षता घ्यावीच लागणार आहे; कारण फ्लू अथवा स्पॅनिश फ्लूप्रमाणे कोविड-१९ हा आजारदेखील अवघ्या काही दिवसात सर्वसाधारण औषधांनी बरा होण्याची स्थिती निर्माण होण्यास अजून किमान एक वर्ष लागू शकते.
सुमारे तीन वर्षांपासून अवघ्या जगाला त्राही त्राही करून सोडलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या अवताराने आता भारतातही हात-पाय पसरायला प्रारंभ केला आहे. रविवारी उपलब्ध झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात एकाच दिवसात २७ हजार ५५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि २८४ रुग्णांचा मृत्यू झाला. उर्वरित जगाशी तुलना केल्यास, भारतात सध्या तरी रुग्ण आणि मृत्यूची संख्या खूप कमी आहे; पण, अमेरिका व युरोपसारख्या विकसित भागांमध्येही कोरोनाने नव्याने हाहाकार माजविण्यास प्रारंभ केला आहे. नुकतीच कुठे जागतिक अर्थव्यवस्था सावरू लागली होती, तोच पुन्हा नव्याने ओमायक्रॉनच्या रूपाने संकट पुढ्यात उभे ठाकले आहे.
सुदैवाने जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओकडून एक दिलासादायक बातमी आली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रीयासस यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ हे वर्ष कोविड-१९ महासाथीचे अखेरचे वर्ष सिद्ध होऊ शकते. सध्याच्या घडीला जगासाठी यापेक्षा अधिक आनंददायक वार्ता दुसरी कोणतीही असू शकत नाही. अर्थात डॉ. घेब्रीयासस यांनी दिलेली ही सुवार्ता विनाशर्त नाही. कोविड-१९ महासाथीचा अंत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असल्यास, विकसित देशांनी अविकसित देशांना मोठ्या प्रमाणात कोविड लसी पुरवायला हव्यात, असे डॉ. घेब्रीयासस यांचे म्हणणे आहे. यापूर्वी इतरही काही तज्ज्ञांनी, कोविड-१९ महासाथीच्या अंतासाठी ओमायक्रॉन विषाणू शिडीची पहिली पायरी सिद्ध होऊ शकतो, अशी आशा जागवली होती. कोरोना विषाणूचे आजवर जेवढे अवतार समोर आले आहेत, त्यामध्ये ओमायक्रॉन हा सर्वात वेगाने संसर्ग पसरवणारा अवतार आहे; परंतु इतर अवतारांच्या तुलनेत तो बराच कमी घातक आहे, असे संशोधनातून समोर आले आहे. ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वेगाने आणि मोठ्या प्रमाणात प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार होतात, असेही सिद्ध झाले आहे. त्यामुळेच ओमायक्रॉनच्या माध्यमातून या महासाथीचा अंत घडवून आणता येईल, असा विश्वास संशोधकांना वाटू लागला आहे.
एका शतकापूर्वी अशाचप्रकारे जगाला विळखा घातलेल्या स्पॅनिश फ्लू या महासाथीचा अंतही अशाचप्रकारे झाला होता आणि आता तो एक अत्यंत सर्वसाधारण आजार म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच नजीकच्या भविष्यात कोविड-१९ हादेखील घातक नसलेला सर्वसाधारण आजार म्हणून ओळखला जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे. कोणताही साथरोग येतो, तेव्हा त्यासाठी कारणीभूत ठरणारा विषाणू स्वत:मध्ये सातत्याने बदल घडवून आणत, नवी रूपे धारण करीत असतो. त्या विषाणूमुळे बाधित व्यक्तींमध्ये त्या विषाणूसोबत लढण्यासाठी नैसर्गिकरित्या प्रतिपिंड तयार होत असतात. लसदेखील शरीरात प्रतिपिंड तयार करण्याचेच काम करते. विषाणूची बाधा झाल्यामुळे अथवा लस घेतल्यामुळे प्रतिपिंड तयार झालेल्या व्यक्तींचे लोकसंख्येतील प्रमाण ६० ते ७० टक्क्यांदरम्यान पोहोचते, तेव्हा विषाणूची नवी रूपे सुरुवातीच्या अवतारांएवढी घातक राहत नाहीत आणि शेवटी साध्या औषधांनीही रुग्णांवर उपचार शक्य होतो. कोरोना आता त्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. काळजी करण्याची, दक्षता घेण्याची गरज संपली, असा त्याचा अर्थ नव्हे ! जोपर्यंत जगभरात हा आजार आटोक्यात येत नाही, तोपर्यंत सर्वतोपरी काळजी घ्यावीच लागणार आहे.
लसीकरणावर जोर कायमच ठेवावा लागणार , मास्क वापरावेच लागणार आणि शारीरिक अंतर राखण्याची दक्षता घ्यावीच लागणार आहे; कारण फ्लू अथवा स्पॅनिश फ्लूप्रमाणे कोविड-१९ हा आजारदेखील अवघ्या काही दिवसात सर्वसाधारण औषधांनी बरा होण्याची स्थिती निर्माण होण्यास अजून किमान एक वर्ष लागू शकते. जग हे आता एक वैश्विक खेडे (ग्लोबल व्हिलेज) बनले आहे, असे आपण म्हणतो; कोविड-१९ महासाथीने त्याचा प्रत्यय आणून दिला . आज एखाद्या देशाने शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट जरी साध्य केले, तरी तो देश संपूर्णपणे कोविडच्या छायेतून मुक्त होऊ शकत नाही; कारण दररोज प्रत्येकच देशात जगभरातून हजारो प्रवासी येत असतात आणि त्यापैकी कोण कोरोना विषाणूचा नवा अवतार घेऊन येईल, याचा नेम नसतो. त्यामुळे संपूर्ण जगाचे लसीकरण, हाच भीतीचा लवलेश शिल्लक न राहू देण्याचा खरा उपाय आहे. त्यासाठी विकसित देशांनी जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. ते झाले तरच जग या महासंकटावर मात करू शकेल!