...तेव्हा, घातपात समजूनच या बिपिन रावत हेलिकॉप्टर अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 06:51 AM2021-12-10T06:51:50+5:302021-12-10T06:52:06+5:30

चीनचा वारंवार उल्लेख हाेत असल्याने दोन वर्षांपूर्वी, २ जानेवारी २०२० ला, म्हणजे जनरल बिपीन रावत यांनी नवा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या एका अशाच अपघाताशी वेलिंंग्टनच्या अपघाताचे कमालीचे साम्य चर्चेत आले आहे.

Editorial On Bipin Rawat Helicopter Crash should be a thorough investigation | ...तेव्हा, घातपात समजूनच या बिपिन रावत हेलिकॉप्टर अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी

...तेव्हा, घातपात समजूनच या बिपिन रावत हेलिकॉप्टर अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी

Next

भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह तेरा जण तामिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यात हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडले. या घटनेने देशवासीय अक्षरश: सुन्न झाले आहेत. ब्रिगेडियर लखबिंदरसिंग लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरमिंदरसिंग आणि रावत यांच्या अन्य काही सहकाऱ्यांनाही या अपघातात प्राण गमवावे लागले. अशा अपघातात याआधी जनरल रावत यांनी मृत्यूला हुलकावणी दिलेली असल्याने बुधवारी दुपारी या अपघाताची बातमी येताच याही वेळी ते मृत्युंजय ठरतील, अशी प्रार्थना सुरू होती. तथापि, एमआय-१७ प्रकारचे अत्यंत सुरक्षित समजले जाणारे, सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरले जाणारे रशियन बनावटीचे हेलिकॉप्टर निलगिरी पर्वतरांगांमध्ये घनदाट जंगलात ज्या पद्धतीने कोसळले ते पाहता त्यातून कोणी वाचले नसावे, अशी शंकेची पाल कोट्यवधींच्या मनात चुकचुकत होतीच. दुर्दैवाने सायंकाळी उशिरा आता मृत्यूशी दोन हात करीत असलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह वगळता अन्य तेरा जणांच्या मृत्यूची वार्ता आली.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत केलेल्या निवेदनानुसार, सुलूर हवाईतळावरून साधारणपणे ९० किलोमीटर अंतरावरील वेलिंग्टनच्या दिशेने पावणेबारा वाजता झेपावलेले हे हेलिकॉप्टर अर्ध्या तासात पोहोचणे अपेक्षित होते. परंतु, वीस मिनिटांनी त्याचा हवाईतळाशी संपर्क तुटला आणि भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वाधिक दु:खद अशा प्रसंगाला देशाला सामोरे जावे लागले. जनरल रावत लष्करी सेवेचा तीन पिढ्यांचा वारसा ते पुढे चालवित होते. आधी सेनादलात व २०२० च्या १ जानेवारीला पहिले संरक्षण दलप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सोबतच वायुसेना व नौसेनेमध्ये ते जवानांचे जनरल म्हणून ओळखले जात. ‘मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची’, असा लष्करी सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे जनरल रावत शत्रूच्या डोळ्याला थेट डोळा भिडविणारे होते.  नॉर्दर्न व ईस्टर्न कमांडमध्ये विविध पदांवर काम करताना त्यांनी गाजविलेले शौर्य, विशेषत: आधी मैदानात सेनाधिकारी म्हणून व नंतर सैन्यशक्तीचे धोरणकर्ते म्हणून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद निपटण्यात त्यांनी मिळविलेले यश, घुसखोर अतिरेक्यांना जमिनीत गाडण्याची उक्ती व कृती ही लष्करी पराक्रमाच्या इतिहासातील सुवर्णाक्षरे आहेत.  

चीनच्या आगळिकीचा धैर्याने सामना करणाऱ्या भारतीय जवानांची थेट आघाडीवर जाऊन उमेद वाढविणारे, पाकिस्तानपेक्षा चीनकडूनच भारताला अधिक धोका आहे, हे कुणाचीही भीडमुर्वत न राखता परखडपणे सांगणारे जनरल बिपीन रावत यांचे निधन अत्यंत दु:खदायक आहे. लष्करी महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताच्या सामरिक तयारीला त्यामुळे धक्का बसणार आहे. अत्यंत मजबूत, सुरक्षित हेलिकॉप्टर कोसळण्याच्या घटनेची तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशीची घोषणा सरकारने केली आहे. हा अपघात नसून घातपात असू शकतो, असे मानणाऱ्यांची संख्या माेठी आहे आणि त्यात केवळ राजकीय नेते नव्हे तर तिन्ही संरक्षण दलांमधून निवृत्त झालेले अधिकारीही आहेत. या अनुषंगाने चीनचा वारंवार उल्लेख हाेत असल्याने दोन वर्षांपूर्वी, २ जानेवारी २०२० ला, म्हणजे जनरल बिपीन रावत यांनी नवा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या एका अशाच अपघाताशी वेलिंंग्टनच्या अपघाताचे कमालीचे साम्य चर्चेत आले आहे.

तैवानचे लष्करप्रमुख शेन यि-मिंग यांच्यासह आठ सेनाधिकाऱ्यांचा त्या अपघातात मृत्यू झाला होता. जनरल रावत जसे वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी जात होते, तसेच शेन यि-मिंग हे तैपेईच्या ईशान्येकडील यिलान प्रांतातील डोंगाव वायुसेनेच्या तळावर पाहणीसाठी जात असताना त्यांचे ब्लॅक हाॅक हेलिकॉप्टर डोंगराळ भागात नादुरुस्त झाले. पायलटने एका रिकाम्या जागेत ते उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तसे करताना ते कोसळले आणि यि-मिंग यांच्यासह आठ लष्करी अधिकारी त्या अपघातात ठार झाले. तैवान आणि चीनमधील वाद संपूर्ण जगाला माहिती आहे. ही बेटे आपलीच असल्याचा दावा करणाऱ्या चीनचा तैवानी जनता प्राणपणाने प्रतिकार करीत आली आहे. चीन सीमेवर असाच तणाव गेली दोन वर्षे भारत अनुभवतो आहे. राष्ट्रप्रमुख, लष्करप्रमुख किंवा बड्या शास्त्रज्ञांचे असे संशयास्पद मृत्यू किंवा त्यामागे रचले गेलेले आंतरराष्ट्रीय कट जगाला नवे नाहीत. तेव्हा, घातपात समजूनच या अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी. सगळ्या शंकाकुशंका दूर व्हायला हव्यात.

Web Title: Editorial On Bipin Rawat Helicopter Crash should be a thorough investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.