उगवतीचे सुवर्णरंग! बांगलादेशाचा जन्मच मुळी भारताच्या धाडसाची, पराक्रमाची, शौर्याची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 06:30 AM2021-03-27T06:30:26+5:302021-03-27T06:30:54+5:30

वाटाघाटींचा प्रस्ताव फेटाळून लष्करी दडपशाही आरंभिली. तेव्हा शेख मुजीबूर यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला. वंगमुक्तीच्या स्वातंत्र्यवेदीवर तीस लाखांहून अधिक बांगलादेशींचा बळी गेला. जवळपास नऊ महिने तो प्रांत रक्तपातात न्हाऊन निघाला.

Editorial on birth of Bangladesh is the root of India success story of courage, prowess and bravery | उगवतीचे सुवर्णरंग! बांगलादेशाचा जन्मच मुळी भारताच्या धाडसाची, पराक्रमाची, शौर्याची यशोगाथा

उगवतीचे सुवर्णरंग! बांगलादेशाचा जन्मच मुळी भारताच्या धाडसाची, पराक्रमाची, शौर्याची यशोगाथा

Next

स्वतंत्र भारताच्या सात-साडेसात दशकांच्या इतिहासात सामरिक पराक्रमाचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेला बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करतो आहे. ज्या दिवशी पाकिस्तानपासून संपूर्ण स्वातंत्र्याची, वंगमुक्तीची घोषणा दिली गेली, त्या २६ मार्च १९७१ची आठवण आणि सोबत वंगबंधू शेख मुजीबर रहमान यांची जन्मशताब्दी अशा दहा दिवसांच्या संयुक्त साेहळ्याला गेल्या १७ मार्चला प्रारंभ झाला. श्रीलंका, नेपाळ, भुतान, मालदीवच्या नेत्यांनी त्याला हजेरी लावली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा संपन्न झाला. कोरोना विषाणू संक्रमणामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर वर्षभरानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी या दोन दिवसांच्या विदेश दौऱ्यावर गेले. १९७०च्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवूनही जनरल याह्या खान व झुल्फीकार अली भुट्टो यांनी बांगलादेशाला स्वयंनिर्णयाचा अधिकार नाकारला.

PM Narendra Modi Bangladesh 2 Day Visit LIVE Updates, Dhaka tour, Bangladesh PM Sheikh Hasina | PM Modi Bangladesh Visit LIVE: पीएम मोदी बांग्लादेश के लिए रवाना, पहली बार ढाका से बाहर

वाटाघाटींचा प्रस्ताव फेटाळून लष्करी दडपशाही आरंभिली. तेव्हा शेख मुजीबूर यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला. वंगमुक्तीच्या स्वातंत्र्यवेदीवर तीस लाखांहून अधिक बांगलादेशींचा बळी गेला. जवळपास नऊ महिने तो प्रांत रक्तपातात न्हाऊन निघाला. पाक लष्कर व रझाकारांच्या जुलुमांमुळे लाखो निर्वासित भारतीय सीमा ओलांडून आश्रयाला आले. त्यांच्या सांभाळाचा नवा ताण निर्माण झाला. तेव्हा भारताच्या आयर्न लेडी पंतप्रधान इंदिरा गांधी व लष्करप्रमुख फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी पाकिस्तानविरुद्ध आघाडी उघडली. बांगलादेश मुक्तीवाहिनीला आधार दिला. १६ डिसेंबर १९७१ला पाकिस्तानचे जनरल नियाझी यांनी लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा यांच्यासमोर शरणागती पत्करली. पाकिस्तानचे तुकडे झाले. स्वतंत्र बांगलादेश जगाच्या नकाशावर अवतरला. केवळ धर्म राष्ट्रीयत्वाचा आधार होऊ शकत नाही, हे अधोरेखित झाले. याचा अर्थ गेली पाच दशके बांगलादेशात सारे काही आलबेल राहिले असे नाही. तिथेही सत्तेसाठी संघर्ष होत राहिला.

PM Modi

१९७५ मध्ये वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांची कुटुंबीयांसह हत्या झाली. त्यांची कन्या, विद्यमान पंतप्रधान शेख हसीना परदेशात असल्याने वाचल्या. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये भारतासह जगातल्या अनेक देशांना हेवा वाटावा, अशी प्रगती बांगलादेशाने केली आहे. जेमतेम सोळा-सतरा कोटींच्या या देशातल्या कष्टाळू लोकांनी विकासाची नवी शिखरे गाठली आहेत. सकल, तसेच दरडोई उत्पन्नाचे नवे विक्रम नोंदविले आहेत. मोहम्मद युनुस यांच्या ग्रामीण बँकेच्या मदतीने असंघटित महिलांच्या कर्तबगारीचा नवा इतिहास या देशाने जगापुढे ठेवला.  भारत-बांगलादेशाची मैत्रीदेखील ही पाच दशके एकाच उच्च स्तरावर राहिली असे नाही. काहीवेळा ताणतणावही निर्माण झाले. कधी बांगलादेशी नागरिकांच्या भारतातील घुसखोरीच्या मुद्द्यावर, कधी तीस्ता व अन्य नद्यांच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावर तरी कधी पश्चिम बंगाल, आसाम आदी भारतीय राज्यांमधील छोट्यामोठ्या घटनांमुळे दोन्ही देशांना पुन्हा पुन्हा समोर बसून चर्चा करावी लागली.

अलीकडे नागरिकत्व कायद्यामुळेही तशी वेळ आली. तरीदेखील पश्चिमेकडील पाकिस्तानच्या तुलनेत या पूर्वाश्रमीच्या पूर्व पाकिस्तानबद्दल तमाम भारतीयांच्या मनात बऱ्यापैकी आपुलकी आहे, हेच खरे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्याच्या निमित्ताने द डेली स्टार वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभामध्ये दोन्ही देशांमधील मैत्रीच्या सुवर्णमहोत्सवाचाही आढावा घेतला. भविष्यात हे मैत्र कोणकोणत्या अंगाने विस्तारले जाऊ शकते, याचे संकेत दिले. बांगलादेशातून निघणारी मालवाहू जहाजे गंगा नदीतून थेट वाराणसीपर्यंत येऊन तिथून नेपाळ, भुतान या देशांना पुरवठा करू शकतील. त्रिपुराची राजधानी आगरताळा येथून भारत रेल्वेनेही बांगलादेशाशी जोडला जाऊ शकतो. दक्षिण आशियातील सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा हा टापू लघुउद्योग, कुटीरोद्योग, आर्थिक सहकार्य आदींच्या माध्यमातून संपन्नता व समृद्धीची नवी क्षितिजे गाठू शकतो, हा नरेंद्र मोदींचा आशावाद महत्त्वाचा आहे.

4 killed in Bangladesh as Islamic fundamentalist group, students protest against Modi

जगाच्या अन्य भागात अलीकडच्या काळात अशी देशादेशांमधील घट्ट मैत्रीची, त्यांच्यातील परस्पर स्नेह व सहकार्याची उदाहरणे कमी झाली आहेत. काही अपवाद वगळता भारतालाही असा प्रेमाचा शेजार फारसा नाही. बांगलादेश हा त्यापैकी महत्त्वाचा अपवाद आहे. अशावेळी ज्या देशाचा जन्मच मुळी भारताच्या धाडसाची, पराक्रमाची, शौर्याची यशोगाथा आहे, अशा बांगलादेशासोबतची मैत्री अनेक दृष्टींनी वेगळी ठरते. तिला उजाळा देताना याची काळजी घेणे गरजेचे आहे, की दोन्ही देशांनी आपापल्या समाजात धार्मिक सौहार्द्र व शांतता राखायला हवी. तरच भविष्यातील जटिल आव्हानेही लीलया पेलता येतील.

 

Web Title: Editorial on birth of Bangladesh is the root of India success story of courage, prowess and bravery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.