महाराष्ट्रातील भाजपाच्या कामगिरीवर संघ व्यथित; विदर्भातही निराशाजनक अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:49 AM2019-10-29T00:49:18+5:302019-10-29T06:32:02+5:30

आताची माघार जेवढी भाजपला जखमी करणारी त्याहून अधिक ती संघाला घायाळ करणारी आहे. संघाचे नेते व प्रवक्ते बोलत नाहीत किंवा वक्तव्ये देत नाहीत. पराभव मुकाट्याने पचविण्याची त्यांना सवय असली तरी त्यांची वेदना समजून घेता यावी अशी आहे.

Editorial On BJP performance is not good in election, RSS is Upset | महाराष्ट्रातील भाजपाच्या कामगिरीवर संघ व्यथित; विदर्भातही निराशाजनक अपयश

महाराष्ट्रातील भाजपाच्या कामगिरीवर संघ व्यथित; विदर्भातही निराशाजनक अपयश

googlenewsNext

भाजपा-शिवसेना युतीने राज्यात पुन: विजय मिळविला असला तरी तिने विदर्भातील अनेक जागी पराभव पत्करला आहे. गेल्या निवडणुकीत तेथील एकूण ६२ जागांपैकी ४४ जागी विजयी झालेल्या या युतीतील एकट्या भाजपनेच आपल्या वाट्याच्या १५ जागा गमावल्या आहेत. विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा मतकिल्ला असलेला भाग मधल्या काळात जवळजवळ भाजपमय झाला होता. १९६७ पासूनच त्या पक्षाने आपले बळ वाढवित ते २०१४ मध्ये ४४ पर्यंत नेले होते. आपल्याला जन्म देणाऱ्या रा.स्व. संघाचे मुख्यालय नागपुरात आहे आणि गेल्या निवडणुकीत त्या जिल्ह्यातील १२ पैकी ११ जागा काबीज करणाऱ्या त्या पक्षाने यावेळी फक्त सहाच जागा राखल्या आहेत.

Image result for devendra fadnavis RSS

ज्या पक्षाला त्यात एकही जागा गेल्या निवडणुकीत मिळविता आली नव्हती त्या काँग्रेसने ३, राष्ट्रवादीने १ तर अपक्षाने १ जागा जिंकली आहे. नितीन गडकरी हे केंद्रातील वजनदार मंत्री व देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री याच जिल्ह्यातून आले आहेत. शिवाय सुधीर मुनगंटीवार हे अर्थ व वनमंत्री असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत पाचही जागा मिळविणाऱ्या या पक्षाला तेथे फक्त दोन जागी विजय मिळविता आला आहे.

Image result for devendra fadnavis RSS

अमरावती जिल्ह्यात आठपैकी एक जागा त्याने राखली तर गडचिरोलीत एक व गोंदियातही दोन जागा त्याने गमावल्या आहेत. संघाच्या कार्यकर्त्यांनी थेट स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठ्या कष्टाने विदर्भात पक्ष वाढविला. पुढल्या काळातही त्याला निष्ठावान कार्यकर्ते मिळत राहिले. मध्यंतरी तो जनतेचाच पक्ष झाला व त्याने काँग्रेसला विदर्भात फारसे स्थान राखू दिले नाही. या पार्श्वभूमीवर त्याची आताची माघार जेवढी भाजपला जखमी करणारी त्याहून अधिक ती संघाला घायाळ करणारी आहे. संघाचे नेते व प्रवक्ते बोलत नाहीत किंवा वक्तव्ये देत नाहीत. पराभव मुकाट्याने पचविण्याची त्यांना सवय असली तरी त्यांची वेदना समजून घेता यावी अशी आहे. तसाही आज संघ भाजपकडून दुर्लक्षित होतानाच दिसत आहे. गेल्या सहा वर्षांत मोदींनी संघ मुख्यालयाला एकदाही भेट दिली नाही. दोनदा नागपूरला आल्यानंतरही ते संघस्थानी गेले नाहीत. एकदा तर पावसामुळे नागपूर विमानतळावर दोन तास अडकून असतानाही ते तिकडे फिरकले नाहीत आणि एकदा भाजपच्या एक ज्येष्ठ मंत्र्याने विनवूनही त्यांनी त्यासाठी नकार दिला. आपली ही उपेक्षा संघाला समजते. काही वर्षांपूर्वी नितीन गडकरींना पक्षाध्यक्षपद देऊन त्याने मोदींचा रोष ओढवून घेतला होता. ज्या काळात अटलबिहारी मोदींवर संतापले होते त्याही काळात संघाने मोदींची पाठराखण केली नव्हती. या गोष्टी अर्थातच त्यांना विसरता आल्या नसणार. परंतु, आपण स्थापन केलेल्या पक्षामागून जाण्याखेरीज संघाला समोरही दुसरा पर्याय नाही आणि तो मोदींना काही ऐकवील तर ते मोदी मनावर घेतीलच असेही नाही.

Related image

या स्थितीत किमान विदर्भात भाजपला चांगले यश मिळावे व त्याचा वाटा आपल्याकडेही यावा असे त्यातील काहींना वाटत असेल तर ते स्वाभाविक म्हणावे लागेल. विदर्भातील भाजपच्या आत्ताच्या माघारीने त्याची तीही संभावना संपली आहे. ‘मी पुन: येईन’ असे म्हणत असतानाच देवेंद्र फडणवीस ‘२२० च्या पुढे जाण्याची’ भाषा बोलत होते. तसे बोलताना त्यांनाही विदर्भात आपण आपले भक्कम बहुमत राखू शकू असे वाटत असणार. मात्र तसे झाले नाही. सेनेने तिच्या जागा टिकविल्या तरी भाजपलाच आपल्या जागा राखता आल्या नाहीत. ही बाब भाजपला जेवढी निराश करणारी त्याहूनही संघाला अधिक व्यथित करणारी आहे.

Web Title: Editorial On BJP performance is not good in election, RSS is Upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.