संपादकीय: अभिजात मराठी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 08:55 AM2024-10-05T08:55:40+5:302024-10-05T08:56:26+5:30

अभिजात भाषा ठरवण्यासाठी प्रामुख्याने चार निकष लावले जातात. त्या भाषेचे वय सांगणारे दस्तऐवज सादर करावे लागतात.

Editorial: Classic Marathi! | संपादकीय: अभिजात मराठी!

संपादकीय: अभिजात मराठी!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला आणि राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वसंध्येला ही घोषणा झाली. या निर्णयाचे स्वागत करताना अवघ्या मराठी माणसांना आनंद होणे स्वाभाविक आहे. अमृतकालात ही ‘अमृताहूनि गोड’ बातमी आली आहे! २०१२ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारला अहवाल सादर करावा यासाठीची ही समिती होती. या समितीने फेब्रुवारी २०१३ मध्ये आपला अहवाल सादर केला. तो अहवाल मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठीचा भरभक्कम स्वरूपाचा दस्तऐवज आहे.

अभिजात भाषा ठरवण्यासाठी प्रामुख्याने चार निकष लावले जातात. त्या भाषेचे वय सांगणारे दस्तऐवज सादर करावे लागतात. ते किमान दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे असावे लागतात. काळाच्या ओघात भाषा बदलली असेल, पण तिचा गाभा, चौकट बदलता कामा नये. वेगवेगळ्या काळात भाषेची संपूर्ण वेगळी रुपे असू नयेत. भाषेतील साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असावे. इतर भाषांचा प्रभाव चालेल, पण ती स्वतंत्र भाषा असावी. हे चारही निकष मराठी भाषा पूर्ण करते, असे ठोस पुरावे या समितीच्या अहवालाने दिले. पठारे समितीने एक हजारांवर ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट आदींचा संदर्भ देत मराठीचे अभिजातपण सिद्ध केले. मूळ विदर्भातील वाशिमच्या असलेल्या गुणाढ्य नावाच्या व्यक्तीने उत्तरेत जाऊन ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ ‘पैशाची’ या प्राकृत भाषेत लिहिला. दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथात अनेक प्रकरणे मराठी भाषेतील आहेत, तसेच श्रीलंकेत दोन हजार वर्षांपूर्वी ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ हे दोन ग्रंथ लिहिले गेले. त्यात अनेक मराठी भाषकांचा उल्लेख आहे. ‘गाथा सप्तशती’चा उल्लेख तर आवर्जून करायला हवा. ‘गाथा सप्तशती’ हा प्राकृत वाङ्‌मयातील आद्य व अग्रगण्य ग्रंथ आहे, असे अनेक संशोधक मानतात. ‘विनयपिटक’ या अडीच हजार वर्षांपूर्वी उत्तर भारतात लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात ‘महाराष्ट्र’ हा प्रदेशवाचक उल्लेख आहे.

या अहवालात म्हटले आहे की, वैदिकपूर्व भाषांमधून संस्कृतचा जन्म झाला, तसाच मराठीचाही झाला. जुन्नरच्या नाणेघाटात प्राचीन शिलालेख आढळला आहे. तो ब्राह्मी लिपीत आणि महाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे. २२२० वर्षांपूर्वीच्या या शिलालेखात मराठी बोलणाऱ्यांचा उल्लेख ‘मराहठीनो’ असा करण्यात आला आहे. संस्कृतपासून प्राकृत भाषा आली आणि त्यातून पुढे मराठी जन्माला आली. या गैरसमजाला यात पुराव्यासहित छेद दिला आहे. प्राकृत मराठी, महारठी, मरहट्टी, देशी, महाराष्ट्री आणि मराठी असे मराठी भाषेचे वेगवेगळे नामोल्लेख करण्यात आले असले तरी ती एकच भाषा होती, हे या अहवालाने स्पष्ट केले. मराठीच्या ज्ञात बावन्न बोलीभाषा आहेत. त्या सर्व तेवढ्याच समृद्ध आहेत. ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. बहात्तर देशांत ती बोलली जाते. या सर्व भरभक्कम पुराव्यांच्या आधारे मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर मराठी भाषेतील संशोधन, विकास आदी बाबींसाठी आता भरभक्कम निधी उपलब्ध होऊ शकतो. देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. मराठीतील दस्तावेजीकरण आदी कामे वेग घेतील. या सर्व उपक्रमांमध्ये मराठी तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मराठीच्या अभिजात दर्जामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा प्रभाव वाढेल. हे सारे आहे छानच. मात्र, हे सर्व जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे आपोआप होईल, असे मानण्याचे कारण नाही. कोणतीही भाषा जागतिक स्तरावर पसरण्यासाठी त्या भाषेत ज्ञानाची निर्मिती होणे आवश्यक असते.

आज जगातील बहुतांश ज्ञान इंग्रजी भाषेत आहे. कारण वेगवेगळे शोध इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांनी लावलेले आहेत. उद्या मराठीला ते वैभव लाभायचे असेल तर विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र यात नवनवे शोध मराठी भाषकांनी लावले पाहिजेत. जगाला त्यांच्या भाषांमध्ये मराठी शब्द सामावून घ्यावे लागतील किंवा त्यासाठी प्रतिशब्द तयार करावे लागतील, असे मूलभूत संशोधन इथे व्हावे लागेल. बाजारपेठेत दिमाखात उभी ठाकल्याशिवाय भाषेचे तेज वाढत नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठांपर्यंत आणि ग्रंथालयांपासून ते प्रयोगशाळांपर्यंत सर्वदूर धोरणात्मक बदल करावे लागतील. तरच, ‘अमृताते पैजा जिंकणारी’ अक्षरे भविष्याच्या पाटीवर गिरवता येतील.

Web Title: Editorial: Classic Marathi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी